नवीन लेखन...

हृदय – प्रत्यारोपणाची पन्नास वर्षे

जगातील पहिली हृद्य-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे डॉ ख्रिश्चन बर्नार्ड

सुप्रसिद्ध हृदयशल्य चिकित्सक   डॉ. हेमंत पाठारे यांच्यासोबत डॉ अनुराधा मालशे यांनी लिहिलेला हा लेख म्हणजे या विषयावरील अनेक लेखांच्या महत्त्वपूर्ण मालिकेतील एक मुख्य टप्पा. 

डॉ. हेमंत पाठारे हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा व परीक्षणही ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत.

डॉक्टर अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.


सामान्यतः जे रोग जंतु-संसर्गामुळे होत नाहीत म्हणजे नॉन-कम्युनिकेबल असतात त्यांचा स्वतंत्रपणे विचार केला जातो. हृदयरोग, उच्च-रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मूत्रपिंडाचे काही विकार यात मोडतात.

हृदयरोगावर सतत संशोधन चालू आहे. हृदय, फुफ्फुसे, मेंदू, मूत्रपिंड, यकृत हे मानवी शरीरातील अती-महत्त्वाचे व त्याचबरोबर अती-संवेदनाशील अवयव आहेत. त्यांच्याशी संबंधीत विकार बऱ्याचदा गंभीर स्वरूप धारण करू शकतात. वैद्यकशास्त्रात या संवेदनाशील अवयवांशी संबंधीत विकारांवर प्राधान्याने संशोधन चालू असते. मानवी शरीर गुंतागुंतीचे आहे आणि मानवी आरोग्याशी निगडीत प्रश्नांनी तज्ञांना कायमच आव्हान दिले आहे. आज आधुनिक वैद्यकशास्त्राने विलक्षण प्रगती केली आहे. शंभर वर्षांपूर्वी आज अगदी साध्यासुध्या वाटणाऱ्या व्याधींनी माणसे दगावत होती. शस्त्रक्रिया सहज-साध्य नव्हत्या व प्रतिजैवकांअभावी जंतूसंसर्ग होणे नेहमीचे होते व त्यामुळे देखील दगावण्याची शक्यता वाढत असे. परंतु आज परिस्थिती खूप बदलली आहे. अगदी पन्नास वर्षांपूर्वीसुद्धा अवघड वाटणाऱ्या, असाध्य वाटणाऱ्या रोगांवर सहजपणे उपचार होऊ शकतात. आधुनिक वैद्यकशास्त्राने विज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या प्रगतीची ही पावती आहे. रोग झाल्यावर त्यावर उपचार करणे ही एक बाब झाली. परंतु काही काही वेळेस अशी परिस्थिती उद्भवते की एखादा अवयव पूर्ण निकामी होतो; उपचार करून दुरुस्त करण्यापलीकडे जातो अशा वेळेस प्रत्यारोपण (ट्रान्स्प्लांट) हा एक पर्याय असू शकतो. आज आपण हार्ट- ट्रान्स्प्लांट (हृद्य-प्रत्यारोपण) बद्दल बोलतो. अगदी साध्या भाषेत बोलायचे तर एका जिवंत माणसाच्या शरीरातील निकामी हृदय काढून त्याजागी दुसरे सुस्थितीतील हृदय बसविणे व ते चालते करणे ही प्रक्रिया म्हणजे हृदय-प्रत्यारोपण!

जगातील पहिली हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे डॉ ख्रिश्चन बर्नार्ड
जगातील पहिली हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे डॉ ख्रिश्चन बर्नार्ड

३ डिसेंबर १९६७ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात, ग्रुटे शुर रुग्णालयात, डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी पहिली हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली त्या घटनेला या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. दुर्दैवाने शस्त्रक्रियेनंतर १८ दिवसांनी त्या रुग्णाचे निधन झाले. परंतु यामुळे वैद्यक क्षेत्रात जणूकाही क्रांती झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी या विषयावर काम चालू होते पण मानवी रुग्णावर प्रयोग झाला नव्हता. आज पन्नास वर्षानंतर तंत्रज्ञानाने आणखीन प्रगती केली आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या कक्षा रुंदावल्या आहेत. हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आज अधिक सहजतेने होतात व शस्त्रक्रियेनंतरची (पोस्ट-ऑप्रेटीव्ह केअर) घेण्यात येणारी खबरदारीची उपाययोजना यातही खूप प्रगती झाली आहे त्यामुळे रुग्णांचे आयुष्यमान सुधारले आहे. पण हा टप्पा गाठण्यासाठीचा प्रवास खूप मोठा होता व अजिबात सोपा नव्हता. या संपूर्ण प्रवासाचा इतिहास अतिशय रोचक म्हणावा असा आहे.
पन्नास वर्षांपूर्वी परिस्थिती अगदी वेगळी होती. हृदय-प्रत्यारोपण ही तर फार दूरची गोष्ट झाली. दुसऱ्या महायुद्धापूर्वी हृदय शस्त्रक्रियाच अभावाने होत असत. कारण एकच की अशा शस्त्रक्रिया फार गुंतागुंतीच्या व त्याचप्रमाणे फार जोखमीच्याही असतात. त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांचा व तंत्रज्ञानाचा विचार करता त्यामध्ये असलेली जोखीम कित्येक पटीने जास्त होती. तेव्हा डॉ डवाईट हार्केन यांनी मात्र ही जोखीम पत्करली. कितीतरी जखमी सैनिकांवर हृदय शस्त्रक्रिया केल्या. डॉ डवाईट हार्केन लष्करात शल्यचिकित्सक होते. युद्धात, बॉम्बस्फोटात हृदयात श्रापनेलचे तुकडे घुसल्यामुळे जखमी झालेल्या सैनिकांवर शस्त्रक्रिया करून डॉ डवाईट हार्केन ते तुकडे काढून टाकीत असत. त्यांचे कौशल्य असे की त्यांनी शस्त्रक्रिया केलेले रुग्ण दगावण्याची शक्यता अगदी नगण्य होती. हृदयावरील शस्त्रक्रियांची ही सुरुवातीची वर्षे होती.

डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी म्हणजे १९४० व ५०च्या दशकातदेखील या विषयावर काम चालू होते. कोलंबिया विद्यापीठाच्या वैद्यकशास्त्र विभागाचे अध्यक्ष डॉ डीकीनसन रिचर्डस व श्री आंद्रे कुर्नो यांना १९५८ साली कार्डीअॅक कॅथेटरचा उपयोग करून मानवी हृदयाची समग्र शरीरक्रियाविज्ञान प्रक्रिया जाणून घेण्यासाठी नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते.
अर्थात अजूनही बरेच काम बाकी होते. मानवी हृदय-प्रत्यारोपणा आधी, इतरही उपचार प्रणाली विकसित होत होत्या. हृदय-प्रत्यारोपण ही उपचार प्रणालीतील सर्वात वर असलेली पायरी होती. तेथपर्यंत पोहोचण्यापूर्वी इतर बरेच काम, संशोधन झाले. हृद्याच्या झडपांचे काम सुधारणारी, दुरुस्त करणारी यांत्रिक प्रणाली विकसित करण्यात अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील डॉ नॉर्मन शुमवे, डॉ रिचर्ड लोवर आणि त्यांच्या सहकार्यांना यश आले.

१९६७मध्ये अमेरिकेतील ह्युस्टन येथील बेयलर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ मायकेल डिबेकी यांनी एका रुग्णाला कृत्रिम ‘लेफ्ट व्हेंट्रिकल डिव्हाईस’ किंवा डाव्या व्हेंट्रिकलचे कार्य नियंत्रित करणारे कृत्रिम यंत्र बसविले. ही देखील हृदय-प्रत्यारोपणा आधीची एक पायरीच होती. नवीन हृदय उपलब्ध होईपर्यंत रुग्णाला या यंत्राचा उपयोग होतो.

मानवी हृदय-प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया प्रत्यक्षात येण्यापूर्वी त्यादिशेने बरेच काम चालू होते. वर उल्लेख केलेले तंत्रज्ञान हे सर्व त्याआधीचे टप्पे होते. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील डॉ नॉर्मन शुमवे यांना या विषयावर पथदर्शी संशोधन व कार्य करण्याचे श्रेय जाते. खरेतर डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात डॉ नॉर्मन शुमवे यांच्याकडे हृदय-प्रत्यारोपणाचे प्रशिक्षण घेतले. मानवी हृदय-प्रत्यारोपणाची पूर्वतयारी करण्यासाठी डॉ नॉर्मन शुमवे बरेच प्रयत्नशील होते. त्यांनी प्राण्यांवर विशेषतः श्वान-हृद्यांवर पुष्कळ काम केले होते. १९५८मध्ये त्यांनी एका श्वानावर यशस्वीपणे हृदय-प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. परंतु रशियामध्ये डॉ डेमीखाव्ह यांनी मात्र १९५१मध्ये एका श्वानावर हृदय व फुफ्फुस-प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली होती पण अजूनही मानवी हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली नव्हती.

डॉ ख्रिश्चन बर्नार्ड

या सगळ्यावर अर्थातच कडी केली ती डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी! अमेरिकेहून दक्षिण आफ्रिकेला परत गेल्यावर केप टाउन येथील रुग्णालयात त्यांनी जगातील पहिली मानवी हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. लुईस वाशकान्स्की नावाचा ५५ वर्षांचा एक रुग्ण हृद्यरोगाने ग्रस्त होवून मृत्यूपंथाला लागला होता. त्यावेळी त्याच्यावर मानवी हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी त्याला जीवदान दिले. डेनिस डार्व्हाल या नावाची २५ वर्षांची तरुणी मोटार अपघातात अतिशय गंभीररीत्या जखमी झाली होती. तिच्या जगण्याची काहीच आशा नव्हती. डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी तिचे हृदय काढून, लुईस वाशकान्स्कीच्या शरीरात त्याचे प्रत्यारोपण केले.

कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर जंतूसंसर्गाचा जसा धोका संभवतो त्याच प्रमाणे आणखी एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ‘रिजेक्शन’चा! मानवी शरीराची एक अशी नैसर्गिक प्रकृती असते की ते कोणतीही शरीराच्या बाहेरची गोष्ट स्वीकार करीत नाही. त्यामुळे बाहेरून एखादी वस्तू अथवा उपकरण शरीरात बसवावयाचे असल्यास फार काळजी घ्यावी लागते. अशा उपकरणाचा शरीराने स्वीकार करावा यासाठी शरीराची विरोध करण्याची शक्ती कमकुवत करावी लागते. त्यासाठी रुग्णाला विशेष औषध-योजना (इम्युनोसप्रेसंटस) द्यावी लागते. त्याचा एक मोठा धोका असा असतो की त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते व जंतूसंसर्गाचा धोका वाढतो. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर १८ दिवसांनी लुईस वाशकान्स्कीचा मृत्यू ओढविला परंतु तो हृदयाशी निगडीत आजारामुळे नाही. अखेरपर्यंत त्याचे नविन हृद्य अतिशय उत्तम काम करीत होते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे तो दगावला.

डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांच्या या शस्त्रक्रियेनंतर वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. जणूकाही क्रांती व्हावी इतकी ही महत्वाची घटना होती. त्यानंतर अशा शस्त्रक्रिया करण्याकडे हृद्यशल्यचिकित्सकांचा ओढा वाढला. परंतु १९८० च्या दशकात ‘अँटी- रिजेक्शन’ (शरीराने नवीन बसविलेले हृद्य नाकारू नये म्हणून देण्यात येणारी औषधे) औषधांमध्ये नवीन संशोधन होवून अधिक परिणामकारी औषधे विकसित झाली (सायक्लोस्पोरिन). त्यामुळे हृद्य-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अधिक सुकर झाल्या.

डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांच्या पहिल्या हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी ६ डिसेंबर १९६७ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये डॉ अॅडम कँट्रोविटझ यांनी १७ दिवसाच्या नवजात अर्भकावर हृद्य-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. फक्त १९६८मध्ये जगभरातील ५२ ठिकाणी १०२ हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या. फेब्रुवारी १९६८मध्ये मुंबई येथील के.इ.एम. रुग्णालयात डॉ प्रफुल्ल कुमार सेन, डॉ जी. बी. परूळकर आणि डॉ शरद पांडे यांनी मिळून दोन हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या. दुर्दैवाने ते दोन्ही रुग्ण शस्त्रक्रियेनंतर काही तासातच दगावले. यामागचे प्रमुख कारण असे होते की बहुतांश वेळा ‘ब्रेन-डेड’ रुग्णाचे हृद्य न घेता, रुग्णाची हृदय-क्रिया पूर्णपणे थांबेपर्यंत वाट पाहिली जात असे व मगच त्याचे हृदय काढण्यात येत असे, तोपर्यंत बराच उशीर होत असे.

आज आपल्या देशात आपण फक्त ‘ब्रेन-डेड’ रुग्णांचे हृद्य वापरून प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करतो. वास्तविक मृत व्यक्तीचे (कॅडॅव्हर ट्रान्स्प्लांट) हृदय काढून ते प्रत्यारोपीत करण्याचे तंत्रज्ञानही विकसित झाले आहे. (येथे हे नमूद करावयास पाहिजे की हे तंत्रज्ञान अतिशय महाग व खर्चिक आहे). २०१४ मध्ये मी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील नामवंत सेंट व्हिन्सेंट रुग्णालयात याविषयात अधिक प्रशिक्षण घेत होतो. तेव्हा मी डॉ कुमुद धीताल यांच्याबरोबर जगातील पहिल्या तीन कॅडॅव्हरीक हार्ट ट्रान्स्प्लांट शस्त्रक्रिया – ट्रान्समेडीक्स ऑरगन केअर सिस्टीम्सचा वापर करून केल्या. या संदर्भातील अतिशय अभिमानाची व आनंदाची बाब म्हणजे या शस्त्रक्रियेनंतर त्या तीनही रुग्णांचे आयुष्य सुधारले व आज ते आनंदाने त्यांचे जीवन जगत आहेत.

— डॉ हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे


डॉ. हेमंत पाठारे हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा व परीक्षणही ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत.

डॉक्टर अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

(पूर्व प्रसिद्धी सामना ३१ डिसेंबर, २०१७)

Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..