द गॉडफादर या कादंबरीची प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊन त्यावर पॅरामाऊंट पिक्चर्सने चित्रपट निर्मिती करायची असे ठरवले. अल रुडी हा या चित्रपटाचा निर्माता होता. तर दिग्दर्शनाची जबाबदारी फ्रान्सिस फोर्ड कोपोला याने स्वीकारली होती. या चित्रपटात मार्लन ब्रँण्डो, रॉबर्ट डी निरो, जेम्स कान, अल पचिनो आणि रॉबर्ट डूवाल यांनी भूमिका केली आहे.
चित्रपटाची पटकथा आणि संवाद कोपोलाने मारिया पुझोच्या मदतीने लिहिले. यासाठी कोपोलाने त्याला दर आठवड्याला 500 डॉलर आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याच्या नफ्यातील 2 टक्के लाभ देणार असल्याचे कबूल केले होते.
सिटीझन केन सारख्या जगप्रसिध्द चित्रपटांच्या यादीत गॉडफादरचा समावेश होऊ लागला. आणि त्याने पुढे इतिहास घडवला. त्यावेळी जगात सर्वाधिक व्यवसाय करणारा सिनेमा म्हणून गॉडफादरचे नाव घेतले जाऊ लागले. केवळ अमेरिकाच नाहीतर फ्रान्स, इंग्लंड, इटलीत हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड संख्येने गर्दी करु लागले.
खरं सांगायचं तर सुरुवातीला पॅरामाऊंटला या चित्रपटात मार्लन ब्रॅण्डो नको होता. डॉनच्या भूमिकेसाठी पॅरामाऊंटने ब्रिटीश कलावंत सर लॉरेन्स ऑलिव्हर यांचे नाव सुचवले होते. मात्र ज्यावेळी कोपोलाने मार्लनची स्क्रीन टेस्ट घेतली त्य़ावेळी त्याने आपल्याला डॉनच्या भूमिकेसाठी हाच अभिनेता हवा असल्याचे सांगितले.
मायकेल कार्लिओनच्या भूमिकेसाठीही अल पचिनो हा काही फस्ट चॉईस नव्हता. मेथड ॲक्टिंग यासाठी प्रसिध्द असणाऱ्या पचिनो समोर रॉबर्ट रेडफोर्ड. जॅक निकोल्सन, डस्टिन हॉफमन आणि वॉरन बेटी यांचे नाव होते. मात्र शेवटी या भूमिकेची माळ पचिनोच्या गळ्यात येऊन पडली. त्यानेही या भूमिकेचे सोने केले.
द गॉडफादर ही कादंबरी लिहिलेल्या पुझोचा साहित्यिक प्रवास पुढे सुरु राहिला असला तरी त्याला गॉडफादरने जितकी प्रसिध्दी मिळवून दिली तशी ती त्याच्या अन्य कुठल्या साहित्यकृतीने दिली नाही. गॉडफादरच्या तिन्ही भागांना वेगवेगळ्या क्षेत्रात ऑस्कर मिळाले आहेत.
चित्रपटात दाखविण्यात आलेले ते घोड्याचे मुंडके खरे होते की खोटे याविषयी नेहमीच चर्चा होते. मात्र याबाबत निर्माता जॅक वुल्झ याने ही गोष्ट लपविण्याचे काही कारण नाही असे सांगितले. कुत्र्यांकरिता अन्न बनविणारी एक कंपनी होती त्यांच्याकडून हे घोड्याचे मुंडके आणल्याचे सांगितले जाते. आपण खरोखरच या चित्रपटात घोड्याचे मुंडके कापले नसल्याचे जॅकने सांगितले होते.
मार्लन ब्रॅण्डोची मोठी अडचण अशी होती की, त्याला त्याचे डायलॉगच लक्षात राहत नव्हते. अशावेळी त्याच्यासाठी सतत क्यु कार्डचा वापर करावा लागत होता. सेटवर त्याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर असे क्यु कार्ड पसरुवून ठेवण्यात आले होते. मार्लनला आपले संवाद लक्षात ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागत होता.
कदाचित या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही पण चित्रपटात माफिया, भाईगिरी, मॉब यासारखे शब्द ऐकायला येत नाहीत. विशेष म्हणजे ज्या गुन्हेगारी विश्वावर हा चित्रपट आधारित आहे त्याबद्दल माहिती देणारे शब्दच या चित्रपटांत नाहीत. हे शब्द पटकथेतून काढण्यात आले होते.
ब्रॅण्डोला या त्याच्या चित्रपटातील भूमिकेसाठी ऑस्कर मिळाले होते. मात्र त्याने ते स्वीकारण्यास नकार दिला. याची चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात रंगली होती. मोठमोठ्या दैनिकांनी त्य़ाची हेडलाईन केली होती. त्याने शेवटी ते ॲवॉर्ड स्वीकारण्यासाठी एका सहकाऱ्याला पाठवले.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply