नवीन लेखन...

१९६५ च्या भारत-पाक युद्धाची पन्नाशी

धैर्य आणि शौर्याच्या बळावर भारतीय सैन्याने पाकिस्तानचा केला निर्णायक पराभव

चीनविरोधात १९६२च्या युद्धात मोठी हार पत्करावी लागल्यानंतर भारतीय सैन्याचे मनोधैर्य खचलेले होते. याच काळात १९६५च्या पहिल्याच महिन्यात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करून भारताविरोधात अघोषित युध्द पुकारले. जुनाट शस्त्रसाठा असलेल्या भारतीय सैन्याचा आपल्यापुढे निभाव लागणार नाही, असा विचार करून पाकिस्तानने अत्याधुनिक पॅटन’ रणगाडे आणि सेबर जेट विमान आणि आधुनिक हत्यारांसह भारतीय लष्करावर हल्ला केला. मात्र भारतीय सैन्याने आपल्या युध्दकौशल्य, आणि शौर्याच्या बळावर पाकिस्तानचा हल्ला केवळ परतवूनच लावला नाही, तर पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोट या महत्त्वाच्या शहरांपर्यंत मजल मारली. यामुळे घाबरून गेलेल्या पाकिस्तानने पंजाबच्या खेमकरण भागात रणगाड्यांनी हल्ला केला. मात्र भारतीय सैन्याच्या युध्द डावपेचामुळे त्यांना आपल्या शेकडो आधुनिक रणगाड्यांवर पाणी सोडावे लागले. १९६२च्या युद्धात हार पत्करावी लागल्यानंतर १९६५च्या युद्धात मोठा विजय मिळविल्याने भारतीय लष्कराने आपली इज्जत परत मिळवली. या युद्धानंतर खर्या अर्थाने भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाने वेग पकडला. याचा परिणाम म्हणून भारतीय लष्कराने १९७१च्या युद्धात निर्णायक विजय मिळवला.

नेत्रुत्व भारत आणि पाकिस्तानचे

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू खूपच शांतताप्रिय असल्याने त्यांनी सैन्याच्या आधुनिकिकरणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. १९६१ साली तत्कालीन लष्करप्रमुख जनरल थिमैय्या यांनी ‘भारताच्या सुरक्षेसमोरची आव्हाने असा प्रबंध पंडीत नेहरू यांच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला असता, नेहरुंना राग आला. ‘‘आम्ही शांततावादी आहोत, आमच्यावरती कोणताही देश हल्ला करणार नाही. आम्हाला सैन्याची गरज नाही. भारताच्या रक्षणाकरीता भारतीय पोलीस सक्षम आहेत. युध्द होणे शक्य नाही. युध्द झाले तरी मी एकटा मुत्सद्देगिरी करून हे युध्द थांबवू शकतो,असे नेहरू त्यावेळी म्हणाले होते.

त्यामुळे ज्यावेळी १९६५चे युध्द लढले गेले, त्यावेळी भारताकडे जुनाट विमाने होती. याच्या तुलनेत पाकिस्तानकडे सेबर जेटसारखी अत्याधुनिक विमाने होती. भारताकडे दुसर्या महायुद्धात वापरण्यात आलेले शेरमन आणि सेंच्यूरीयन हे रणगाडे होते. तर पाकिस्तानकडे अत्याधुनिक ‘पॅटन’ रणगाडे होते. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘सेंटो या संघटनेचा सदस्य असल्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रे मिळाली होती.

पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे १९६४ साली निधन झाले. त्यानंतर पंतप्रधान झालेले लालबहादूर शास्त्री यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतेही महत्त्व दिले जात नव्हते. त्यांचा प्रशासकिय अनुभवही कमी होता. त्यामुळे जेंव्हा पाकिस्तानचे फिल्डमार्शल आयुबखान लालबहादूर शास्त्रींना भेटले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री हे आमच्याविरोधात काय लढणार असे त्यांना वाटले होते.आयूबखान यांनी आपले शिक्षण यूनायटेड किंग्डमच्या सँडर्ह्स्ट मिलीटरी अॅकॅडमीमध्ये पूर्ण केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरतीही ब्रिटनचे पंतप्रधान, अमेरिकेचे राष्ट्रपती यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. त्या तुलनेत भारताच्या नेतृत्वाचे जागतिक महासत्तांसोबतचे संबंध अतिशय कमकुवत होते. या सगळ्या परिस्थितीमुळे भारताशी युध्द करून काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची योग्य वेळ असल्याचा विचार जनरल आयुब खान यांनी केला होता. आयुब खान हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख होते.

१९६२चे युध्दानंतर भारताच्या लष्करप्रमुखांना काढून टाकण्यात आले होते व निम्मे भारतीय लष्कर चीनच्या सीमेवर पाठविण्यात आले होते. यामुळे काश्मीर आणि पंजाबच्या पाकिस्तानी सीमेवरील सैन्य कमी झाले होते. कच्छच्या वाळवंटात भारतीय सैन्याची संख्या अत्यल्प होती. जनरल चौधरी यांना सेनाप्रमुख बनविण्यात आले होते. भारताचे वेस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग हे एक अनुभवी सेनापती होते.या युद्धातील सर्वात महत्त्वाचा पैलू हा त्यावेळचे भारताचे कमकुवत(??) नेतृत्व आणि त्यावेळची भारताची परिस्थिती हा होता.याचाच फायदा घेऊन पाकिस्तानने हल्ले केले.

‘ऑपरेशन डेझर्ट होक” ऑपरेशन कच्छच्या रणात

१९६५च्या युध्दाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.या युध्दाचा अवधी खूप मोठा होता. हे युध्द जानेवारी ते सप्टेंबर १९६५ मधे चार वेगवेगळ्या काळात लढले गेले. जानेवारी महिन्यात पाकिस्तानने भारताविरोधात ‘ऑपरेशन डेझर्ट होक कच्छच्या रणात जानेवारीच्या महिन्यामध्ये कच्छच्या वाळवंटात सुरू झाली.हा भाग वाळवंटी तसेच समुद्राचे पाणी आतपर्यंत येत असल्याने तिथे रणगाडे पाठविणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या भागातल्या सगळ्या लढाया पायदळाच्या सैनिकांनी लढल्या. पाकिस्तानच्या १५ ते २० हजार सैन्याने भारतीय चौक्यांवरती तीन हल्ले केले. ते हल्ले परतवून लावण्याला भारतीय सैन्याला यश मिळाले. यानंतर या युद्धात आपल्याला यश मिळणार नाही असे समजल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत घेऊन हे युध्द ३० जूनला थांबविण्यात आले. मात्र या काळात युध्द म्हणून घोषीत झाले नव्हते.

काश्मीरमध्ये ऑपरेशन जिब्राल्टर

एप्रिल महिन्यात पाकिस्तानने काश्मीरमध्ये दुसरी आघाडी उघडली. याला ऑपरेशन जिब्राल्टर असे म्हणण्यात आले. अघोषीत युध्दाच्या पुढचा भाग एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरु झाला. जनरल अख्तर हुसेन यांनी ३० हजार पाकिस्तानी सैन्याबरोबर टोळीवाल्यांच्या रूपात काश्मीरमध्ये घुसखोरी केली व भारतीय सैन्यावर हल्ले करणे सुरू केले. काश्मिरी जनता भारताविरोधात उभी राहिल्याचे दाखवून काश्मिरी जनतेला मदत करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य काश्मीरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार होते.

त्यांनी काश्मीरमधल्या उरी, पुंच, अखनुर अशा महत्त्वाच्या गावांमध्ये सैन्याला घुसविले. हे सगळे सैन्य साध्या कपड्यांमध्ये असल्याने ते काश्मीरचेच रहिवासी आहेत असे दाखविण्यात आले. त्यावेळचे काश्मीरचे मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांनीही आपल्या देशद्रोही कारवायांना मोठा वेग दिला होता. १९६४ मध्ये शेख अब्दुल्ला यांनी अनेक वेगवेगळ्या देशांचा दौरा करून काश्मीरला भारतापासून वेगळे केले पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न केला. भारतात परतल्यानंतर शेख अब्दुल्ला यांना लागलीच तुरुंगात डांबण्यात आले होते. यामुळे काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु झाला होता. हीच संधी साधून पाकिस्तानने आपले सैन्य काश्मीरमध्ये पाठविले. तीन ते साडेतीन महिने चाललेल्या या अघोषित युद्धात भारतीय सैन्याने केलेल्या उत्क्रुष्ट कामगीरीमुळे अनेक पाकिस्तानी सैनिकांना पकडण्यात यश आले. काश्मिरी जनेतेनेही भारतीय सैन्याला मदत केली. त्यानंतर उरलेल्या पाकिस्तानी सैन्याने पळ काढला.

पाकव्याप्त काश्मीरच्या हाजीपिर खिंडीतून पाकिस्तानी सैन्य घुसखोरी करत असल्यामुळे भारतीय कमांडोंना ही खिंड आपल्या ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले.मेजर रणजीतसिंग दयाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कमांडोंनी या अतिशय खोलवर असलेल्या खिंडीवर हल्ला करून तिथे कब्जा केला. यानंतर जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याने तेथून पळ काढला. हाजीपीर खिंड ताब्यात घेण्याचे भारतीय कमांडोंचे शौर्य पाहून मेजर रणजीतसिंग दयाल यांना महावीरचक्र प्रदान करण्यात आले. यामुळे काश्मीरमधील घुसखोरी थांबविण्यात आपल्याला यश मिळाले

यानंतर सप्टेंबर महिन्यात खर्या युध्दाला सुरुवात झाली. या युद्धात पाकिस्तानने सर्वात आधी जम्मूच्या छांब या गावात भारतीयांवर हल्ले केले. या सीमेचे रक्षण कठीण असल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय लष्कराने पंजाबच्या सीमेवर लष्कराची दुसरी आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला. भारतीय सैन्याने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून लाहोरच्या दिशेने कूच केले. पहिला हल्ला लाहोरवर, तर दुसरा हल्ला सियालकोट भागात करण्यात आला.त्यानंतर भारतीय सैन्याला लाहोरवरती हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने पंजाबमधल्या खेमकरण आणि असल उत्तर या गावांमध्ये हल्ला केला. येथे रणगाड्यांची मोठी लढाई झाली.

‘ऑपरेशन ग्रँडस्लॅम

या युद्धामध्ये छांब भागात झालेल्या लढाईचे नाव ‘ऑपरेशन ग्रँडस्लॅम हे होते. काश्मीरमध्ये अपारंपारीक युध्द करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने जम्मुमधील छांब या भागातील भारतीय सैन्यावर हल्ला केला. त्यानंतर २ सप्टेंबर १९६५ला भारत-पाकिस्तानचे पारंपारीक युध्द सुरु झाले. ६ सप्टेंबरपर्यंत पाकिस्तान सैन्याने छांबवर विजय मिळवून अखनूरच्या दिशेने आगेकुच केली. अखनूर गावावर त्यांना विजय मिळवता असता तर जम्मू-अखनूर-पुंच हा रस्ता कापला गेला असता. यामुळे पुंच राजौरीसारखे जिल्हे पाकिस्तानला भारतापासून वेगळे करता आले असते. यामुळे पाकिस्तानी सैन्याचे आक्रमण थांबविण्याकरता भारतीय लष्कराने हवाई दलाचा वापर करावा असा प्रस्ताव संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे दिला. यावर निर्णय घेण्यात वेळ लागला असता तर अखनूर रस्ता कापला गेला असता. मात्र, चव्हाण यांनी केवळ पाच मिनिटांत निर्णय घेऊन भारतीय सैन्याची मदत करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे छांबमध्ये झालेला पाकिस्तानी हल्ला थांबविण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले. यशवंतराव चव्हाण यांनी
दिलेले युध्दनेतृत्व वाखाणण्याजोगे आहे.

दुसर्या महायुद्धानंतरचे रणगाड्यांमधले सर्वात मोठे युध्द

छांबमधला हल्ला थांबविण्यात यश मिळाले असले, तरी अखनूर रस्त्याला मोठा धोका असल्याने जनरल हरबक्षसिंग यांनी आपल्याला पाकिस्तानची या भागातील ताकद कमी करण्यासाठी पंजाबमध्ये नविन आघाडी उभारण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांना सांगितले. पंजाब सीमेवरून भारतीय सैन्याकडून लाहोर आणि सियालकोटवर हल्ला करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याची गरज होती. हे युध्द अजून वाढू नये यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडू नये म्हणून संपूर्ण जगाने भारतावर दबाव आणला होता. परंतु भारताचे पंतप्रधान जगाचा दबाव झुगारून लावत पंजाबमध्ये दुसरी आघाडी उघडण्यासाठी परवानगी दिली. यामुळे स्वांतत्र्यानंतर पहिल्यांदा भारतीय सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून लाहोरच्या दिशेने कुच केले. भारतीय सैन्याला वेळीच थांबविले नाही, तर लाहोरसारखे दुसरे सर्वात महत्त्वाचे शहर भारताच्या ताब्यात जाऊ शकते हे फिल्डमार्शल आयुब खान यांना कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी त्या भागात मोठ्या संख्येने रणगाड्यांचा वापर केला. सियालकोट भागामध्ये भारतीय आणि पाकिस्तानी रणगाड्यांमध्ये दुसर्या महायुद्धानंतरचे रणगाड्यांमधले सर्वात मोठे युध्द झाले.

इचोगील कालवा ओलांडून लाहोरपर्यंत पोहोचण्याची कामगीरी ३ जाट या बटालियनने केली. त्यांनी पाकिस्तानी सैन्याला मात देऊन इचोगील कालव्याची लढाई जिंकली. यामुळे लाहोर शहरालाच मोठा धोका निर्माण झाला होता. याकरीता ३ जाट बटालियनचे कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल हाईड यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आले. इचोगील कालव्याची लढाई ही १९६५च्या युद्धातील एक महत्त्वाची लढाई होती. याच भागात पुण्याचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल ए. एस. वैद्य (नंतर सैन्य प्रमुख) यांच्या रेजीमेंटनेही मोठा पराक्रम गाजवला. त्यांना महावीर चक्र प्रदान करून गौरविण्यात आले. याच भागात पुण्याचे दुसरे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल ए. बि तारापोर यांच्या रेजीमेंटनेही मोठा पराक्रम गाजवला.त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करून गौरविण्यात आले. सियालकोट आणि लाहोर भागात केलेल्या कामगीरीमुळे मेजर जनरल राजेंदरसिंग स्पॅरो यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आले.

अब्दुल हमीदनी पाकिस्तानचे पाच रणगाडे उद्धवस्त केले

भारतीय सैन्याला लाहोर आणि सियालकोट भागात रोखु शकत नाही हे समजल्यानंतर पाकिस्तानने तिसरी आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भारताच्या खेमकरण भागात रणगाड्यांच्या मदतीने प्रवेश केला. लाहोर आणि सियालकोट भागात पुढे जाणार्या भारतीय सैन्याला परत भारतात येण्यास प्रवृत्त करणे हे या हल्ल्याचे उद्दीष्ट होते. खेमकरण येथे भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या रणगाड्यांना भारताच्या सीमेत येऊ दिले. यानंतर खेमकरण भागात कालव्यांचे पाणी सोडून चिखल निर्माण करण्यात आला. त्यामुळे हे रणगाडे या भागातील शेतांमध्ये अडकले. त्यांच्यावरती हल्ला करून मोठ्या संख्येने हे ‘पॅटन’ रणगाडे नष्ट करण्यात आले. याच भागात ४ ग्रेनेडीयरच्या सी. क्यू. एम. एच. अब्दुल हमीद यांनी एकट्याने पाकिस्तानचे पाच रणगाडे आरसीएल गनच्या मदतीने उद्धवस्त केले. या कामगीरीसाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. असलउतर आणि खेमकरण भागात झालेल्या लढाईला पाकिस्तानच्या ‘पॅटन’ रणगाड्यांची स्मशानभूमी समजले जाते. केवळ धैर्य आणि शौर्याच्या बळावर जुनाट हत्यारे वापरूनही भारतीय सैन्याने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला. कोणत्याही लढाईमध्ये शस्त्र आणि शस्त्र चालविणारा सैनिक सगळ्यात महत्त्वाचा असतो. भारताकडे शस्त्र जुनाट असली तरी ती चालवणारे सैनिक शूर होते. त्यामुळेच अत्याधुनिक शस्त्रे असूनही या लढाईत पाकिस्तानचा पराभव झाला होता.

तीन आठवडे हे युध्द सुरू राहिल्यानंतर सगळ्या जगाने भारत आणि पाकिस्तानवर दबाव आणून हे युध्द थांबविण्याची मागणी केली. त्यानंतर हे युध्द थांबविण्यात आले. अजून काही दिवस हे युध्द सुरु राहिले असते, तर लाहोर शहर भारताच्या हाती लागले असते.

या २२ दिवसांच्या युद्धात भारतीय नौदलाचा उपयोग झाला नव्हता. पाकिस्तानी नौदलाने भारताच्या द्वारका शहरावर तोफांचा हल्ला केला.पुर्व पाकिस्तान आणि सध्याच्या बांगलादेशमध्येही लढाई झाली नव्हती.

युध्द संपण्याच्या वेळी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील महत्वाच्या जमीनीवर कब्जा केला होता. त्यामानाने पाकिस्तानने कच्छच्या वाळवंटातील कमी महत्वाच्या जमीनीवरती कब्जा केला होता. भारतीय सैन्याने आपल्या नुकसानीपेक्षा पाकिस्तानच्या रणगाड्यांचे मोठे नुकसान केले होते. हवाई लढाईतही पाकिस्तानच्या सेबरजेटचही मोठे नुकसान झाले होते.या युद्धात भारताने पाकिस्तानचा १,९२०; तर पाकिस्तानने भारताचा ५५० चौरस किलोमीटर प्रदेश जिंकला, भारताची जीवितहानी २,८६२ आणि पाकिस्तानची ५,८०० एवढी मानली जाते. भारताचे ९७ रणगाडे, तर पाकिस्तानकडे अमेरिकेचे अधिक दर्जेदार ‘पॅटन’ रणगाडे असूनही, त्यांचे ४५० रणगाडे नष्ट झाले.या युद्धाचे पारडे उत्तरार्धात भारताच्या बाजूनेच झुकले होते, ही वस्तुस्थिती आहे.

ताश्कंदला भारताची हार

युध्द थांबविण्यात आल्यानंतर रशियाच्या मदतीने ताश्कंद येथे ताश्कंद करार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताने जिंकलेली हाजीपीर खिंड पाकिस्तानला परत द्यावी लागली. ही भारताची मोठी चूक होती. लाल बहादूर शास्त्री यांनी युद्धामध्ये अतिशय चांगले नेतृत्व दिले होते, पण वाटाघाटीमध्ये त्यांना अपयश आले. याचा त्रास झाल्यामुळे त्यांचा ताश्कंद येथे संशयास्पद मृत्यू झाला असावा.१९६२च्या युद्धानंतर यशवंतराव चव्हाणांना संरक्षणमंत्री बनविण्यात आले होते. तेव्हापासून त्यांनी संरक्षण विभागाला चांगले नेतृत्व दिले.यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण सुरु करण्यात आले. याचा परिणाम म्हणून भारतीय सैन्याने १९७१चे युध्द निर्णायक पद्धतीने जिंकले. यशवंतराव चव्हाण यांनी सैन्य आणि संरक्षणमंत्रालयाला दिलेल्या चांगल्या नेतृत्वामुळे युद्धात भारताला यश मिळाले.१९६२ साली झालेल्या पराभवामुळे मानहानी सहन कराव्या लागलेल्या भारतीय सैन्याच्या दृष्टीने १९६५ सालचे युध्द महत्त्वाचे युध्द आहे. या युद्धात मिळालेल्या विजयामुळे भारतीय सैन्याने आपल्यावरील डाग पुसून काढला. त्यामुळे या युद्धात धारातीर्थी पडलेल्या अधिकारी आणि जवानांना संपूर्ण देशाने मानवंदना दिली पाहिजे.१९६५च्या युद्धाच्या पन्नाशीनिमित्त या शूरवीर सैनिकांचे स्मरण करणे जरुरी आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..