१२ मार्च १९७१ रोजी आनंद चित्रपट प्रदर्शित झाला.
‘ आनंद ; विषयी आणखी थोडे …
1. राज कपूर –आनंद, दिलीपकुमार — डॉ. भास्कर आणि देव आनंद — डॉ. कुलकर्णी; अशा भूमिका हृषीदांच्या मनात असलेला हा चित्रपट ” मुसाफिर ” अगोदर निर्माण होऊन ” अनाडी ” सारखा लोकप्रिय झाला असता तर ? डॉ. कुलकर्णी ही मराठी नाव असलेली भूमिका कोणाकडून करून घ्यायची याची चर्चा हृषीदा आपल्या सहकाऱ्यांबरोबर करत असतांना काही कामासाठी ( खरं म्हणजे हृषिदांच्या आगामी चित्रपटात एखादी भूमिका मिळते आहे की नाही हे पहाण्यासाठी ) रमेश देव हृषीदांकडे आला होता. त्याच क्षणी ‘ आपला डॉ. कुलकर्णी सापडला ‘ असे उत्स्फूर्त उद्गार हृषीदा यांनी काढले, आणि ती भूमिका रमेश देवला दिली गेली; असे खुद्द रमेश देवने मला सांगितले. मग त्याने हृषिदांना विनंती करून पत्नी सीमासाठी पण त्यात एक भूमिका पदरात पाडून घेतली !
2. आनंदची व्यक्तीरेखा राज कपूरवरून बेतली होती; तर डॉ. भास्करची व्यक्तीरेखा खुद्द हृषीकेश मुखर्जींवर बेतलेली होती. मात्र, केवळ तिसऱ्याच चित्रपटात अभिनय करत असलेल्या अमिताभ बच्चनने ती हृषिदांना अपेक्षित होती, त्याप्रमाणेच साकारली होती; याबद्दल हृषिदा कमालीचे खूष होते. मात्र, या चित्रपट निर्मितीची वेळ आली तेव्हा राज कपूर पन्नाशीजवळ पोचलेला होता. त्याने त्याचे सर्व आयुष्य श्रीमंतीत काढलेले होते; म्हणून तो म्हणाला की, ही भूमिका मला देण्यापेक्षा ऐन तारुण्यात असलेल्या उमेदीच्या राजेश खन्नाला द्या.
3. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन लता मंगेशकर यांनी करावे अशी हृषीकेश मुखर्जीञ्ची इच्छा होती. तसे झाले असते तर चित्रपटाचे नाव ‘ आनंद ‘ आणि सं. दि. चे नाव ‘ आनंदघन ‘ ( कारण याच नावाने लताबाई सं. दिग्दर्शन करतात. ) असे दृश्य दिसले असते. 1961 साली ‘ सखी रॉबिन ‘ नावाचा चित्रपट आला होता; त्याच्या सं. दि. चे नाव होते ‘ रॉबिन ! ‘ याचीच पुनरावृत्ती झाली असती; नाही का ?
4. जरी स्वत: हृषिदांचे हा चित्रपट पूर्ण झाल्यावर समाधान झाले होते, तरी हा चित्रपट ‘ तिकीट बारी ‘ वर किती चालेल या बद्दल ते साशंकच होते. मात्र, रमेश देव आणि सीमा हे पती पत्नी या चित्रपटाबद्दल इतका आत्मविश्वास बाळगून होते की, हा चित्रपट सहज रौप्य महोत्सव साजरा करेल अशी खात्री त्यांनी हृषिदांना दिली होती. असे झाले तर मी तुम्हा दोघांना प्रत्येकी रु. दहा हजार खास बक्षिशी म्हणून देईन असा शब्द हृषिदांनी या दंपतीला दिला. मात्र, ‘ आनंद ‘ने रौप्य महोत्सव साजरा करताच हृषिदांनी कबूल केल्याप्रमाणे या जोडप्याला रु. वीस हजार पाठवून दिले. हे मला सांगताना या दम्पतीचा चेहेरा उजळून निघाला होता.
5. त्या वेळेस आर्थिकदृष्ट्या किशोरकुमार अडचणीत होता हे पाहून हृषीदानी किशोरकुमारला या चित्रपटात नायकाची भूमिका दिली होती. मात्र, हे किशोरकुमारला कळताच त्याचे डोके सटकलेच; आणि हा आपला अपमान समजून त्याने चित्रीकरणाचा एक हप्ता पुरा झालेला असतांना काहीही कारण न सांगता चित्रपटातून आपले अंग काढून घेतले ! किशोर कुमारने या चित्रपटातील भूमिका न स्वीकारण्याचे एक कारण असेही सांगितले जाते की, एका बंगाली चित्रपट निर्मात्याने त्याला त्याच्या चित्रपटात भूमिका देतो असे सांगून फसवले होते. याचा किशोरकुमारला एव्हढा राग आला की, माझ्याकडे कोणी बंगाली निर्माता पुन्हा आला तर त्याला घरात घ्यायचे नाही, असे किशोरकुमारने त्याच्या माणसाला सांगितले होते. त्यामुळे हृषिदा ‘ आनंद ‘ च्या भूमिकेचा देकार घेऊन आले तेव्हा त्यांना किशोरकुमारच्या घरात प्रवेश मिळाला नाही.
6. मूळ कथा राज कपूरसाठी बेतलेली असल्यामुळे हा चित्रपट हृषीदानी राज कपूर आणि मुंबई शहर यांना अर्पण केला होता; आणि तसा उल्लेखही त्यांनी चित्रपटाच्या श्रेय नामावलीत केला होता. मात्र, त्या वेळच्या वैचारिक साप्ताहिक ” माणूस ” च्या समीक्षकाने या चित्रपटाच्या सुरवातीला राज कपूरचा उल्लेख असूनही तो चित्रपटात कोठेच न दिसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते !
काय म्हणावे या समीक्षकाला ?
7.याच कथानकावर तात्यासाहेब शिरवाडकरांनी मराठी नाटक लिहावे, असा प्रस्ताव मराठीतील एक जबरदस्त नाट्य निर्माते मोहन वाघ यांनी मांडला होता. मात्र, हा चित्रपट तात्यासाहेबांनी पाहिलेला नसल्यामुळे त्यांच्यासाठी या चित्रपटाचा एक खास ‘ शो ‘ नासिकमध्ये आयोजित केला होता. त्याला हृषीदा यांच्याबरोबर गुलजारही हजर होते. इथपासून गुलजार आणि तात्यासाहेबांची दोस्ती सुरू झाली, असे खुद्द गुलजारनी मला सांगितले. नाटकात आनंदची भूमिका मराठीतील सशक्त अभिनेते डॉ. सतीश दुभाषी यांनी खास त्यांच्या पद्धतीने केली होती. मात्र, शिरवाडकर, ‘ आनंद ‘ सारखे कथानक, सतीश दुभाषी सारखे अभिनेते आणि मोहन वाघांसारखे तालेवार नाट्य निर्माते असूनदेखील नाटक म्हणावे तितके लोकप्रिय झाले नाही.
8. या चित्रपटात सुरवातीला लता मंगेशकरने गायलेले ‘ ना, जिया लागे ना “, हे गीत होते. परंतु, लवकरच हे गीत चित्रपटात रसभंग करते म्हणून चांगले झालेले असूनही कापण्यात आले.
9. या चित्रपटाच्या ‘ प्रीमीयर शो ‘ नंतर झालेल्या पार्टीत, ‘ अमिताभ बच्चन हा केवळ आपल्या आवाजाच्या जोरावर तुझा प्रतिस्पर्धी ठरू शकण्याचा मोठा धोका आहे ‘, असे फटकळ देवयानी चौबळने त्या वेळचा तिचा परम मित्र राजेश खन्ना ( उर्फ ‘ काला मांजा’) याला बजावल्याचे तेथे हजर असलेल्या सुधीर गाडगीळने नमूद करून ठेवले आहे.
10. या चित्रपटाच्या पुण्यातील प्रसिद्धीचे काम ‘ हेम्बोल पब्लिसिटी ‘ करत होते. प्रदर्शनाच्या पूर्वी राजेश खन्नाचे — जो झपाट्याने प्रसिद्ध होत होता – फोटो ताब्यात घेण्यासाठी राजन खरे आणि श्रीकांत धोंडगे गेले होते. त्यांनी त्यांना हवे असलेले राजेश खन्नाचे फोटो घेतले. चित्रपटाचे पी. आर. ओ. कॉलीन पॉल यांनी त्या फोटोंत अमिताभ बच्चनचे दोन फोटो टाकले. ‘ याची गरज नाही ‘ असे राजन खरे म्हणाले. ‘ पण कदाचित चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या फोटोंची गरज भासेल ‘; असे पॉल म्हणाले. त्यांचे म्हणणे खरे ठरले. चित्रपट प्रदर्शित झाला. लवकरच अमिताभच्या फोटोंची मागणी वर्तमानपत्रवाल्यांनी करावयास सुरवात केली ! श्रीकांत धोंडगे यांनी हा प्रसंग त्यांच्या ‘ साठवणीतील आठवणी ‘ या पुस्तकात नोंदवला आहे.
11. त्या वेळेस शशी कपूरने नाकारलेले ” आनंद ” आणि ” हाथी मेरे साथी ” हे दोन्ही चित्रपट राजेश खन्नाने क्षणाचाही विलंब न लावता स्वीकारले. या दोन्ही चित्रपटांनी राजेश खन्नाची लोकप्रियता कळसाला पोचली !
12. ‘ आनंद ‘ हा चित्रपट हृषीदांनी ‘ आर. के. ‘ साठी दिग्दर्शित करावा या बद्दल राजकपूर खूपच आग्रही होता. पण हृषीदा आणि राजकपूर यांची कामाची पद्धतच वेगळी असल्याने आणि आपल्याला ‘ आर. के .’ पद्धतीने काम करता येणार नाही याची खात्री असल्यामुळे हृषीदांनी त्या गोष्टीला निग्रहाने नकार दिला.
13. आनंद हा अखेरीस मृत्यू पावतो. राज कपूरवर नितांत प्रेम करणार्या हृषीदांना राजकपूरचा पडद्यावरचा मृत्यूही सहन झाला नसता, म्हणून त्यांनी राज कपूरला घेऊन ‘ आनंद ‘ चित्रपट करण्याचे टाळले; असे त्या काळात तबस्सुमने दूरदर्शनवरच्या एका मुलाखतीत सांगितले होते. मात्र, ‘ संगम ‘ चे चित्रिकरण लंडनला चालले असतांना हृषीदा तेथल्याच एका रुग्णालयात उपचार घेत होते. चित्रीकरणातून वेळ काढून राजकपूर हृषीदांची सेवा करण्यासाठी रुग्णालयात मुद्दाम यायचा. तो हृषीदांना ‘ बाबू मोशाय ‘ अशी प्रेमाने हाक मारायचा. म्हणूनच ‘ आनंद ‘ मध्ये एका व्यक्तीरेखेचे नावच हृषीदांनी ‘ बाबू मोशाय ‘ असे ठेवले !
14. अमिताभ हा विनोदी अभिनेता मेहमूदच्या धाकट्या भावाचा – अन्वरचा – मित्र. अमिताभबद्दल मेहमूदला आस्था असल्यामुळे त्याने अमिताभला ‘ आनंद ‘ चा पुरेपूर लाभ उठवण्याचा आणि शेवटच्या दृश्यात स्वत:चे प्राण ओतण्यास सांगितले. त्याप्रमाणे अमिताभने ते दृश्य साकारल्यावर, या चित्रपटात तशी नगण्य भूमिका असूनही अमिताभकडे सामान्य प्रेक्षक आणि जाणकारांचे लक्ष गेले.
15. अमिताभच्या याच भूमिकेने कथा लेखक सलीम याच्या मनात त्याच्या अभिनय क्षमतेबद्दल विश्वास उत्पन्न केला. त्यामुळेच, काही काळाने, प्रथम ‘ जंजीर ‘ आणि त्याच्या नंतर ‘ शोले ‘ मधील भूमिकांसाठी सलीमने अमिताभची जोरदार शिफारस केली. मात्र, याच ‘ आनंद ‘ मधील भूमिकेमुळे त्याला एक भूमिका गमवावी लागली; आणि ती ही खुद्द हृषिदांच्या चित्रपटातील !
16. ‘ आनंद ‘च्या बरोबरीनेच हृषिदा त्यांच्या आगामी चित्रपट ‘ गुड्डी ‘ ची जुळवाजुळव करत होते. त्यांना गुड्डीच्या प्रियकराच्या भूमिकेसाठी एखादा अप्रसिद्ध आणि कोणतीही प्रतिमा नसलेला अभिनेता हवा होता. त्यामुळे त्यांनी अगोदर अमिताभला या भूमिकेसाठी मुक्रर करून काही चित्रिकरणही केले होते. परंतु, ‘ आनंद ‘ मुळे लोक त्याला ओळखू लागले; आणि त्याला अनपेक्षितपने खूपच लोकप्रियता लाभली. पण त्यामुळेच हृषिदांनी त्याला ‘ गुड्डी ‘ मधून काढण्याचा निर्णय घेतला. खरं तर अभिनेत्याला लोकप्रियतेमुळे नवीन भूमिका मिळतात. पण लोकप्रियतेमुळे भूमिका गमावली जाण्याचे हे अपवादात्मक उदाहरण असावे !
17. जया बहादुरी अमिताभला प्रथम ‘ गुड्डी ‘च्याच सेटवर भेटली, पण ‘ आनंद ‘ चित्रपटामुळे अमिताभला लोकप्रियता लाभली; आणि जयाला अमिताभ आवडू लागला. मात्र, त्यावेळेस राजेश खन्ना लागोपाठ लोकप्रिय होणाऱ्या चित्रपटांमुळे झपाट्याने लोकप्रियतेच्या पायऱ्या चढत होता; तर अमिताभ ‘ सात हिंदुस्तानी ‘ या पडेल चित्रपटाचा एक सप्तमांश नायक होता. त्यामुळे चित्रीकरणाच्या वेळेस राजेश खन्ना अमिताभची अजिबात दखल घेत नसे. ‘ वो आया क्या ‘, ‘ दुसरा आया क्या ‘अशा उपहासात्मक शब्दांत राजेश खन्ना अमिताभचा उल्लेख करत असे.
18. या चित्रपटात प्रथम दोनच गाणी होती. युनिट मधल्या लोकांच्या आग्रहामुळे आणखी एक गाणे वाढवले. मग सलीलदा म्हणाले ईपी ध्वनिमुद्रिका काढायची तर चार गाणी हवीत. मग नाईलाजाने चौथे गाणेही टाकले ! ‘ कही दूर… ‘ हे गीत योगेशनी दुसर्या चित्रपटासाठी लिहिले होते. पण तो चित्रपट पुरा न झाल्याने ते गीत या चित्रपटात घेण्यात आले. या गीताची चाल ऐकल्यावर ते गीत आपल्याला गायला मिळावे अशी हेमंतकुमार यांची इच्छा होती; पण सलीलदा यांनी ते अगोदरच मुकेशकडून गाऊन घ्यायचे असे ठरवले होते.
19. सलिलदांनी बनवलेल्या एकाच चालीवर समजुतीच्या घोटाळ्यामुळे गुलजार आणि योगेश यांच्याकडून दोन गीते लिहिली गेली. मात्र, गुलजारांनी लिहिलेले ‘ ना जिया ना ‘ हे गाणे ध्वनिमुद्रणासाठी निवडले गेले. निर्माता न घेतल्या गेलेल्या या गीताचे पारिश्रमिक योगेश यांना देण्यास तयार होता; पण त्यांनी ते गीत घेतले न गेल्याने पारिश्रमिक घेण्याचे नाकारले. मग योगेशना आणखी एक गीत लिहिण्याची संधी दिली गेली. ते गीत म्हणजे ‘ जिंदगी कैसी है पहेली ‘. श्रेय नामावलीच्या वेळेस या गीताचा उपयोग करण्याचे ठरले होते; पण नायक राजेश खन्ना याला हे गीत इतके आवडले की त्याचे चित्रिकरण त्याने हृषीदांना स्वत:वर करावयास लावले.
20. या गाण्याच्या चित्रिकरनाचा खरच स्वत: सं. दि. सलिल चौधरी यांनी केला. इतकेच नव्हे तर जुहू चौपाटीवर त्याचे चित्रिकरण, राजेश खन्ना फुगे उडवत करेल; हे ही सलीलदा यांनीच सुचवले. अलीकडे सलिलदा यांच्या आठवणींच्या एका कार्यक्रमात त्यांच्या पत्नी आणि कन्येने ही गोष्ट सांगितले !
20. जरी राजेश खन्ना सुरवातीपासून स्वत:च्या गाण्यांसाठी किशोरकुमारचा उसना आवाज हवा, म्हणून आग्रही असायचा, तरी या चित्रपटात एकही गाणे किशोरकुमारने गायले नाही. याचे उघड कारण म्हणजे किशोरकुमारला ‘ आनंद ‘ची भूमिका देऊनही चित्रिकरणाचा पहिला हप्ता पूर्ण झाल्यावर हृषिदांना काहीही न सांगता किशोरकुमारने या चित्रपटातून आपले अंग काढून घेतले. त्यामुळे या परिस्थितीत तो या चित्रपटासाठी पार्श्वगायन करेल की, नाही; याची खुद्द हृषिदांनाच खात्री नसावी.
21. ‘ आनंद ‘ने राजेशला केवळ व्यावसायिक यश किंवा समीक्षकान्ची वाहवा या पलीकडेही बरंच काही दिलं. त्यांनं त्याला पडद्यावरची सर्वात महान आणि चिरकाल टिकणारी भूमिका दिली. या शिवाय त्याची गाजलेली, हार न मानणारी पडद्यावरची व्यक्तीरेखा बहाल केली.
22. हा 1970 – 71 चा काळ राजेश खन्नाच्या दृष्टीने अत्यंत भाग्यशाली काळ. त्या दीड वर्षात त्याचे सलग 15 चित्रपट ‘ सुपर हिट ‘ झाले. असे घवघवीत यश आजपर्यंत कुठल्याही कलाकाराला लाभले नाही. या 15 चित्रपटांत ‘ बंधन ‘, ‘ सच्चा झूटा ‘, ‘ आन मिलो सजना ‘, ‘ सफर ‘, ‘ हाथी मेरे साथी ‘, ‘ कटी पतंग ‘, ‘ अंदाज ‘ असे अनेक गाजलेले चित्रपट होते. त्या पैकी ‘ आराधना ‘ आणि ‘ दो रास्ते ‘ या चित्रपटांनी तर सुवर्ण महोत्सवी यश पाहिले.
23. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 25 वर्षांनी एका नम्रता जोशी नावाच्या सिने पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत, ‘ नमक हराम ‘ मधली राजेशची भूमिका आणि ‘ आनंद ‘ मधील राजेशची भूमिका, या दोन्ही भूमिकांना लेखकाचे पाठबळ होते, आणि म्हणून साकार करायला सोप्या होत्या ‘; असे दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जींनी सांगितले.
24. राजेश खन्नाने जरी हृषिदांनी देऊ केलेले पारिश्रमिक खळखळ न करता स्वीकारले असले तरी, त्याने धोरणीपणाने मुंबई प्रदेश वितरणाचे हक्क फी म्हणून विकत घेतले; त्यामुळे त्याला नेहेमीच्या पारिश्रमिकाच्या तुलनेने किती तरी आधिक पारिश्रमिक त्याच्या पदरात पडले.
25. या चित्रपटाचा ‘ प्रिव्ह्यू ‘ मुंबईतील ग्रांट रोड मधील ‘ नॉव्हेल्टी ‘ चित्रपटगृहात झाला. तेव्हा राजेश खन्ना मोतीलालच्या पलीकडची मजल मारणार, अशीच चर्चा सुरु झाली होती. मध्यांतरानंतर हा चित्रपट अधिकाधिक गंभीर होत जातो; त्यामुळे सर्वसामान्य स्त्रियांचे चित्रपटगृहाबाहेर पडताना रडून सुजलेले चेहेरे पहावयास मिळत. त्यामुळे हा चित्रपट पाहताना स्त्रियांना एक नाही तर दोन रुमाल लागतात, असे बोलले जाऊ लागले !
26. नवीन संगीतकारांचे कर्कश्श पार्श्व संगीत हृषिदांना अजिबात आवडत नसे. म्हणून त्यांच्याच जुन्या चित्रपटांतील वसंत देसाई, शंकर – जयकिशन, सलीलदा यांनी तयार केलेले पार्श्व संगीत ते पुन:पुन्हा वापरत असत. त्यामुळेच ‘ आनंद ‘ चे श्रेय नामावलीच्या वेळचे सलीलदांचे पार्श्वसंगीत त्यांनी ‘ कोतवालसाब ‘च्या श्रेय नामावलीच्या वेळेस जसेच्या तसे वापरले !
27. नंतर याच कथानकावर सुधाकर बोकाडे यांनी नासिरुद्दीन शहा या विचारी अभिनेत्याला प्रमुख भूमिकेत घेऊन ‘ हस्ति ‘ ( 1993 ) या चित्रपटाची निर्मिती केली. हा नायक विशाल दु:खी आयुष्य आनंदाने काढतो; मात्र मृत्युला सामोरा जाताना तो मख्खपणे सामोरा जातो. ‘ आनंद ‘ मधील बाबू मोशाय या चित्रपटात बनला आहे जग्गू; आणि ही भूमिका जाकी श्रॉफने केली आहे. हा जग्गू कमालीचा आक्रमक दाखवला आहे. तो आपल्या शत्रूचा बदला घेतो. हा विशालही नंतर स्वत;च्या शत्रूंची, आपण कर्क रोगाने आजारी आहोत हे विसरून, यथेच्छ धुलाई देखील करतो ! नगमा या चित्रपटाची नायिका होती; आणि आनंद मिलिंद यांनी संगीत दिग्दर्शन केले होते. अशोक गायकवाड दिग्दर्शित या हिंदी चित्रपटात सदाशिव अमरापूरकर, शफी इनामदार, वर्षा उसगावकर, लक्ष्मीकान्त बेर्डे, अच्युत पोतदार असे अनेक मराठी कलावंत होते. मात्र, हा चित्रपट कधी प्रदर्शित झाला आणि नाहीसा झाला, हे कोणालाच कळले नाही !
–प्रकाश चान्दे.
डोंबिवली.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply