१३ ऑगस्ट १९६७ या दिवशी शिवाजी मंदिर, मुंबई येथे पं. राम मराठे आणि डॉ. वसंतराव देशपांडे या दोन बुजुर्ग आणि घरंदाज गायक नटांच्या अदाकारीने गाजलेल्या आणि धीर धरी धीर धरी, धनसंपदा न लागे मला, गुलजार नार ही… अशा नाट्यपदांनी नटलेल्या ‘मेघमल्हार’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला. विद्याधर गोखले यांनी ‘मेघमल्हार’ या नाटकामध्ये या दोन महान कलाकारांना एकत्र आणलं!
आपल्या ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘सुवर्णतुला’, ‘मंदारमाला’, ‘जय जय गौरीशंकर’ व ‘मदनाची मंजिरी’ या पाच संगीत नाटकांच्या लेखनामुळे प्रसिद्धी पावलेले व मूळ अमरावतीचे असलेले विद्याधर गोखले यांच्या लेखनकलेला समीक्षक आणि सामान्य रसिकांनी मोठी दाद दिली आहे. मराठी रंगभूमीवर आलेले सामाजिक संगीत नाटक ‘मेघमल्हार’ हे नाटक विद्याधर गोखले यांनी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक-नट भालचंद्रजी पेंढारकर यांना अर्पण केले होते.
१३ ऑगस्ट १९६७ या दिवशी शिवाजी मंदिर, मुंबई येथे झालेल्या पहिल्या प्रयोगाचे निर्माता राजाराम शिंदे व दिग्दर्शक मो. ग. रांगणेकर होते. काम करणाऱ्या नटांमध्ये संगीतभूषण पं. राम मराठे, पं. वसंतराव देशपांडे, आशा पोतदार होते; तर पार्श्व गायन करणाऱ्यात मुलायम आवाजाचे तलत महंमद तसेच आशालता वाबगावकर व कान्होपात्रा होत्या. या नाटकाचे संगीत आपल्या गायकीतून लीलया खटक्यांच्या व इतर ताना घेणारे रामभाऊ मराठे यांनी दिले. ‘कल्याण संगीत विद्या मंदिर’ या ‘टिपिकली व्यावसायिक’ वृत्तीने चालवल्या जाणाऱ्या संगीत क्लासचा संचालक ‘कल्याण’, नाटकामध्ये काम करणारी फॅशनेबल युवती रंजना तसेच लक्षाधीश असलेले रसिक दादासाहेब इनामदार व त्यांची मुलगी ललिता, भारतीय संगीताबद्दल ज्याचे मत- ”आपलं संगीत म्हणजे सप्तसुरांचा सागर घुसळून तपस्वी गायकांनी मिळविलेलं अमृत…” असं आहे तो प्रख्यात गायन-उस्तादाचा शिष्य शाम, दर्जा नसलेल्या एका साप्ताहिकाचा मालक-संपादक बाजीराव कोलदांडे अशी मोजकी पात्रे या नाटकात आहेत. शाम याला अभिजात संगीत आवडते आणि पैशांसाठी कलावंतांनी आपल्या कलेचा बाजार मांडू नये, असे वाटते. परंतु, त्याचा मित्र कल्याण पैशाकरिता स्वत:कडे कमीपणा घेऊन विविध (गणेशोत्सव, दुर्गोत्सव) कार्यक्रम करण्याची तयारी ठेवतो. एका कार्यक्रमानंतर गायक शामला बिदागी म्हणून फक्त नारळ मिळते, तेव्हा कल्याणने ”तू बिदागी का मागितली नाहीस,” असे विचारताच शाम ”स्वत:हून कशी मागणार…” असे म्हणतो, तेव्हा कल्याणच्या मुखातून विद्याधर गोखले म्हणतात- ”परमेश्वराला देखील आधी घंटी बडवून जागं करावं लागतं व मग ‘सुखं च मे, शयनं च मे’ अशा मागण्या कोकलून मागाव्या लागतात. या जगात नेहमी ‘घंटानादं कुर्यात, बोंबाबोंब कुर्यात, मागणी पदरात पाडून घेण्यासाठी मार्चे, संप कुर्यात् असे करावे लागते.” पुढे एका प्रवेशात शाम हा कल्याणला म्हणतो, ”या दांभिक दुनियेत तुझ्यासारख्या सज्जनासदेखील पड खावी लागते आहे. देव माणसालादेखील सैतानाशी तडजोड करावी लागते आहे. कारण इथं धोपटमार्गाने जाणारे धोपटले जात आहेत आणि तेजस्वी हिरे कोळसे म्हणून आज जाळले जाताहेत…” अशा व्यवहारवादी आणि सार्वजनिक मानवी जीवनातील वास्तव सांगताना नाटककार गोखले त्रिकालाबाधित सत्यसदृश वाक्येही देतात; तसेच वाङ्मयातील उपमा-अलंकारांनी युक्त वाक्ये- जसे ”अहो, बुलबुलाचा गळा मधात घालून त्याचं कलम कोकिळेच्या गळ्यावर केलं, तरी पं. मेघमल्हार यांच्या आवाजाची बरोबरी होणार नाही.” यामुळे या नाटकातील संवाद दर्जेदार व परिणामकारक झालेले आहेत. त्यात अतिशय उत्तम काव्य असलेली नाट्यगीते विद्याधर गोखल्यांनी लिहिली आहेत. शामच्या तोंडच्या (पं. राम मराठे) ”अरे, मानानं जगण्यासाठी कितीसा पैसा लागतो?” या वाक्यानंतर असलेले ‘धनसंपदा न लगे मला ती|
मी मानितो गुणसंपदेला ती चंचला कमला कशाला? वंदिन मी| माधवाला…’ हे नाट्यगीत मानवी सद्गुणांचं धनाहून असलेले श्रेष्ठत्व सांगते. सुखात असलेल्या या नाटकाच्या तिसऱ्या व शेवटच्या अंकात प्रेयसी ललिता हिला शाम जेव्हा म्हणतो ”नादब्रह्माचा सच्चा उपासक बनून गुरुवर्य रामदयाल यांच्या नावाचा नि भारतीय संगीताचा झेंडा त्रिखंडात उभारणं हे माझं ध्येय आहे.” तेव्हा खऱ्या /अस्सल शास्त्रीय गायकाची जबाबदारी व संगीतोपासनाच नाटककार अधोरेखित करतात. विद्याधर गोखले यांच्या यापूर्वीच्या ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘जय जय गौरीशंकर’ व ‘सुवर्णतुला’ या शुद्ध संगीत नाटकांच्या तुलनेत ‘मेघमल्हार’मध्ये सामाजिक आशय व संगीताला पैशाच्या बळावर अंकित करण्याच्या वृत्तीवर प्रहार केलेले आपल्याला दिसून येतात. पं. वसंतराव देशपांडे यांनी गाऊन रसिकमान्य केलेली ‘धीर धरी, धीर धरी…’ व ‘गुलजार नार ही मधुबाला…’ ही पदे, आजही गुणगुणली जातात. बहुआयामी विद्याधर गोखले यांचे हे पहिले सामाजिक संगीत नाटक असले, तरी ऑगस्ट १९६७ मध्ये मुंबईत प्रसिद्ध नाटककार मो. ग. रांगणेकर यांच्या दिग्दर्शनामध्ये ‘मेघमल्हार’चे सलग सात दिवसांत सात प्रयोग हाऊसफुल्ल झाले होते, ही बाब गायक-नटांच्या अभिनयाबरोबरच विद्याधर गोखले यांच्या नाट्यकलात्मक प्रतिभेची प्रयोगात्मक साक्ष होती, हे निश्चि्त!
धीर धरी धीर धरी
https://www.youtube.com/watch?v=DS4J2FN9kFo
धनसंपदा न लागे मला
https://www.youtube.com/watch?v=2D14Kj5QyDw
गुलजार नार ही
https://www.youtube.com/watch?v=uSXrm6NGV28
दुनियेच्या अंधेर नगरीचा
https://www.youtube.com/watch?v=rIxOjyGwcrE
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ: इंटरनेट / डॉ. विवेक रामचंद्र विश्वरुपे
पुणे.
Chan