‘ज्ञानमेवामृतम्’ हे ब्रीद घेऊन दक्षिण महाराष्ट्राच्या उच्चशिक्षणाची गरज भागविण्यासाठी १८ नोव्हेंबर १९६२ रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना त्या वेळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.
१९६२ ला दक्षिण महाराष्ट्रात एका विद्यापीठाची स्थापना करण्याचा प्रस्ताव आला. याबाबत प्राचार्य एस. आर. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने विद्यापीठ व्हावे, याबाबत अभ्यास अहवाल सरकारला दिला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठाच्या क्षेत्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर असे पाच जिल्हे असावेत अशी योजना होती. पण रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाकडेच राहिला आणि सोलापूर जिल्हा सोलापूर विद्यापीठाकडे गेला. कोलहापूर, सांगली आणि सातारा असे तीनच जिल्हे कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येतात. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन विद्यापीटापैकी एक आहे.
शिवाजी विद्यापीठाची स्थापना अगदी सहज झालेली नाही. विद्यापीठाच्या स्थापनेमागे ही ही अशीच अडथळ्याची भिंत उभी केली होती. पण लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने विद्यापीठ कोल्हापूरसाठी मंजूर झाले. आणि त्याच्या उभारणीसाठी सारे कोल्हापूर अक्षरक्ष: घाम गाळून राबले. त्यावेळी कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती.
व नगराध्यक्षपदी केशवराव जगदाळे होते. विद्यापीठ तर मंजूर झाले पण विद्यापीठाला जमिनीची आवश्यदकता होती आणि शहराच्या पूर्वेला खाजगी मालकीची जागा विद्यापीठाला उपयोगी पडणारी होती. जगदाळे , सरनाईक, पायमल, साळुंखे , थोरात , मंडलिक, माने यासारख्या बहुजन समाजातील लोकांच्या या जागा होत्या. या सर्वांनी फारशी खळखळ न करता अवघ्या आठशे, हजार ते पाच हजार रुपयापर्यंत आपल्या जागा विद्यापीठासाठी दिल्या. केवळ जागाच दिल्या असे नव्हे तर कोल्हापुरातल्या तालमीतालमीचे कार्यकर्ते श्रमदानासाठी या माळावर गेले. त्यांनी माळावरचे गवत कापून काढले. ओबड-धोबड जमीन घाम गाळून एका लेव्हलला आणली.
या श्रमदानासाठी रोज एका तालमीचे कार्यकर्ते ट्रक भरून श्रमदानासाठी जात होते आणि दिवस मावळल्यावर परत येत होते. एवढेच नव्हे तर विद्यापीठाच्या उभारणीसाठी आर्थिक मदत म्हणून एक एक रुपयाची कुपणे काढली गेली होती. केशवराव जगदाळे, रामभाऊ उबाळे, डी.एस. नार्वेकर, हिंदुराव साळुंखे, बाळ साठम, काका राऊत, ए. आर साळोखे हे कार्यकर्ते सायकलवरून गावभर फिरून ही कुपणे खपवत होते. आणि महागावकर सदनात (सध्याचे ओपल हॉटेल) येथे विद्यापीठाचे तात्पुरते कार्यालय होते. तेथे रोजच्या रोज ते पैसे जमा करत होते. अशा कष्टातून आणि अशा निष्ठेतून शिवाजी विद्यापीठ उभे राहिले.
या विद्यापीठाचे वैशिष्ट्य असे, की बहुजन समाजातील मॅट्रिक पास तरुणांना नोकरीसाठी जाणीवपूर्वक संधी दिली. आणि तालमीच्या कट्टयावर बसणारी ही पोरं विद्यापीठात काय गुण उधळणार? अशा अर्थाने त्या काळातही टीका सुरू झाली. पण विद्यापीठाच्या या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची शान आणि मान उंचावली. शिवाजी विद्यापीठाची परिक्षा एकदाही पुढे जाणार नाही आणि निकाल एकदाही लांबणार नाही, याची त्यांनी खबरदारी घेतली. पहिले कुलगुरू म्हणून आप्पासाहेब पवार यांनी फार मोठी कामगिरी केली. पहिले कुलसचिव श्री वैद्य होते. शिवाजी विद्यापीठाची वाटचाल सुरू झाली. विजार, शर्ट, स्लीपर घालणारी मुले शिकायला येऊ लागली. १९६९ मध्ये “कमवा व शिका’ ही योजना सुरू झाली. त्यानंतर एकाहून एक चांगल्या कुलगुरू, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला एक वेगळी दिशा दिली आणि देशात शिवाजी विद्यापीठ या नावाला एक वेगळीच किनार लाभली गेली.
शिवाजी विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चार जिल्ह्यातील शिक्षणाची गंगा या विद्यापीठामुळे खळखळून वाहू लागली.
शिवाजी विद्यापीठात अनेक नवे कालसुसंगत अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये सिव्हील इंजीनिअरिंग, हॉस्पिटल मॅनेजमेंट, रुरल डेव्हलपमेंट, नॅनो-टेक्नॉलॉजी यासह ब्रेल, क्रिमिनॉलॉजी, मल्टीमीडिया, ओशनोग्राफी, मेट्रोलॉजी, मरिन सायन्स, फिशरीज, वॉटर मॅनेजमेंट, ग्लोबल बिझनेस, ग्लोबल फायनान्स, फॉरेक्स मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ‘नॅशनल नॉलेज नेटवर्क’शीही विद्यापीठ आणि १७० संलग्नित महाविद्यालये जोडलेली आहेत. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या वापराला अधिकाधिक प्राधान्य देऊन सर्वच संबंधित घटकांचा अमूल्य वेळ वाचविण्याचाही विद्यापीठाचा प्रयत्न आहे. विद्यापीठाच्या १६ अधिविभागात स्मार्ट क्लासरुमचा उपक्रमही यशस्वीपणे कार्यान्वित झाला आहे. त्यासाठी विविध ठिकाणी क्लासरुममध्ये स्मार्ट-बोर्ड बसविले आहेत.
स्थापनेचा प्रस्ताव आला होता त्या वेळी‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नाव द्यायचे ठरले होते. त्यावेळी मात्र यशवंतराव चव्हाण यांनी या मागणीचा सारासार विचार करून ‘शिवाजी विद्यापीठ’ हेच नाव कायम ठेवण्याबाबत आग्रह धरला होता. त्यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी एन. डी. पाटील होते. त्यांच्याशीही यशवंतराव चव्हाण यांनी चर्चा केली होती. पण सर्वानुमते शिवाजी या शब्दात असलेली आंतरिक ओढ लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आणि आज पुन्हा अनेक वर्षांनी नाम विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे .
लाखो विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाला शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply