बटाट्याची चाळ हे तुळशीवृन्दावनापासून ते कॅक्टसच्या कुंडीपर्यंत नकळत काळाबरोबर वाहत गेलेल्या एका कारकुनाचे हे आत्मचरित्र आहे. ह्या अफाट मुंबई शहरांतल्या ज्या मध्यमवर्गीय समाजात मी वाढलो, त्यातलाच हा एक! बटाट्याच्या चाळीत सुद्धा याच्या नात्याची माणसं आहेतच. रक्तातूनच आलेल्या कोकणी खवटपणाला हा काही अगदीच पारखा नाही. मात्र त्वेषाने चिडून वार करायला त्याला जमणार नाही. असल्या स्वभावाला कुणी डरपोकपणा म्हणेल. त्यालाही त्याची हरकत नाही. आपले चरित्र सांगण्याचे धाडस त्याने दाखविले हेच पुष्कळ झाले!’
‘असा मी असामी’च्या प्रस्तावनेतच पु.ल. देशपांडे सुरुवातीलाच चरित्रनायकाची अशी ओळख करून देतात. पु.लं.च्या ‘बटाट्याची चाळ’ चा पहिला एकपात्री प्रयोग १६ फेब्रुवारी १९६१ रोजी भारतीय विद्या भवन,मुंबई.येथे झाला. त्यानंतर त्यांनी ‘वाऱ्यावरची वरात’ हा ‘अनेकपात्री’ प्रयोग केला. त्या दरम्यान निरनिराळ्या मासिकातून लिहिलेले ‘असा मी असामी’चे बरेचसे लेख (काही ‘पुन्हा मी पुन्हा मी’या नावाने) एकत्रितपणे पुस्तकरूपात ‘असा मी असामी’ या नावाने १९६४मध्ये प्रकाशित झाले. या गोष्टीला या वर्षी अर्धशतक उलटून गेलं! रंगमंचावर या चरित्रनायकाचं ‘एकपात्री पुल’दर्शन त्यानंतरचं.
‘बटाट्याच्या चाळी’त पुलंनी अनेक व्यक्तिरेखा, केवळ अक्षरांतूनच नव्हे तर अक्षरशः रंगमंचावर साक्षात उभ्या केल्या, त्या सर्वांची मिळून एक अशी ‘चाळीची व्यक्तिरेखा’ उभी राहते. मात्र, एकच चरित्रनायक ‘असा मी असामी’त त्यांनी प्रथमच उभा केला. I am not what I am, हे शेक्सपियरचं पूर्णविरामाचं वाक्य प्रश्नचिन्हांकित केलं की, ‘मी कोण आहे?’ असं होतं. तसाच ‘असा मी असामी’चा नायक, ‘मी कोण आहे?’ चा ‘ह्युमर’च्या अंगाने शोध घेणारा. चॅप्लिनच्या अतिसामान्य नायकासारखा. पण हा नायक लोकप्रिय झाला तरी, ही व्यक्तिरेखा पु.लं.नी ‘रिपीट’ नाही केली. ‘पांडूतात्या (श्री. कृ. कोल्हटकर), बाळकराम (रा. ग. गडकरी), चिमणराव (चिं. वि. जोशी), जीव्हज (वूडहाउस) यांसारखी तुमची एखादी व्यक्तिरेखा का नाही निर्माण झाली?’ या प्रश्नावर पुलंचं उत्तर- ‘अशा व्यक्तिरेखेत लेखकावर एक प्रकारची सक्ती येते, अन ही सक्ती मला कधीच मानवली नसती. लेखकावर एकप्रकारे प्रेशर येतं त्यामुळे. मी एकदोन वेळा प्रयत्न करून पहिला अन सोडून दिला. आणि तसा माझ्या लेखनात मध्यमवर्गीय माणूस येतोच की! तो थोडासा चिमणरावासारखा आहे. ही व्यक्तिरेखा अप्रतिम, प्रश्नच नाही. नाव धारण केलं नाही तरी आम्ही सगळे चिमणरावच! माझं बरचसं लिखाण फर्स्टपर्सन मध्ये आहे, ते सुद्धा या सामान्य माणसाच्या भूमिकेशी जुळणारं आहे.’
पुलं पुढे म्हणतात, ‘मानवी जीवन हाच नित्यनूतन रूप धारण करणारा एक अनाकलनीय चमत्कार आहे. त्याला कुठल्याही ठोकळेबाज साच्यात बसवून मोकळं होतं येत नाही. त्यातून मी स्वत: कारकुनी पेशानं जगणाऱ्या कुटुंबात वाढलो! चाळीत राहिलो नाही तरी, गिरगावांत आम्ही आमच्या नातेवाईकांकडे बराच काळ काढत असू. तिथंच मी ‘बटाट्याची चाळ’ जवळून पहिली! मी ज्या समाजात वाढलो, ज्यांच्याशी माझी नाती जुळली, त्यांच्या विषयीच मी लिहिलं पाहिजे!’
या भूमिकेतूनच ‘असा मी असामी’चा चरित्रनायक उभा राहिला असावा. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या, गिरगावांतल्या मुगभाटातल्या एका चाळींत राहणाऱ्या, ‘बेन्सन जॉन्सन’ कंपनीत कारकून असणाऱ्या, अशा या सामान्य चरित्र नायकाची थोडक्यांत ओळख, त्याच्याच शब्दांत करून घ्यायला हवी- ‘माझी ओळख करून द्यायची तर माझं नाव. बाकी नावात काय आहे म्हणा! म्हटलं तर आमचं साम्य शिवाजीमहाराजांशी, कारण आमच्या जन्मतिथीबद्दल देखील दुमत आहे. म्हटलं तर आमचं नाव लोकमान्य टिळकांशी देखील जोडता येईल, कारण आमचं दोघांचं गांव एकच. रत्नागिरी. अन आमच्या नावाचं साधर्म्य थेट महर्षी कर्व्यांशी! तसा कसलीही महत्त्वाकांक्षा नसलेला मी एक सामान्य कारकून. माझ्यासाठी कधी कुणी कोकिळा गायली नाही, मोर नाचताना मी कधी पहिले नाहीत. चांदण्याला शोभा असते ही ऐकीव माहिती. आकाशांत मेघांची दाटी झाली की, ‘नभ मेघांनी आक्रमिले’ न सुचता, छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे हे आठवतं!. ‘कसा मी कसा मी’ हे माझं मलाच नीटसं कळत नाही, पण या जगात येताना जसा गुपचूप आलो, तसा जाताना देखील आपल्या हातून जगाला फारसा धक्का न लावता निघून जाण्याची इच्छा बाळगणारा मी एक असामी आहे.’
‘असामी’चा नायक धोंडो भिकाजी कडमडेकर जोशी याच्याच शब्दात त्याचे तीर्थरूप कसे होते? ‘राजापूराहून येऊन मुंबईच्या पोष्टांत, अगदी पोष्टाच्या पाकिटाला ‘ष्टाम्पा’प्रमाणे चिकटावे तसे चिकटलेले भिकाजी कडमडे जोशी हे आमचे तीर्थरूप! त्यांच्या मते, साहेब इथे आहे ते ठीकच आहे. राज्य करावे ते त्यांनीच. एरवी साहेब नसता तर पोष्टखाते आले असते काय? पूर्वी होते काय पोष्टहापिस? येत होत्या काय तारा? माणूस मेला मुंबईस तर वर्ष वर्ष कळत नसे कोकणांत. सुतकाचा पत्ता नाही. लग्ने सुद्धा व्हायची तिकडे सुतकात अन् इथं एखादा सख्खा काका मेलेला असायचा! साहेबानं तारा आणल्या अन केली की नाही वेळच्यावेळी सुतकाची सोय?’
या आत्मचरित्रात एकामागून एक प्रसंगांच्या लडी उलगडत जातात. कौटुंबिक कापडखरेदी, सूट शिवणं, मुलांची शालेय प्रगती, सहकुटुंब नाटकाला जाणं, मावशीच्या पार्ल्यातल्या बिऱ्हाडाचा शोध, विडीचा ज्वलंत प्रश्न, खिसा कापला जाणं, ज्योतिष आणि अध्यात्मिक अनुभव, सारं कांही मध्यमवर्गी कारकुनी जीवनाचं सार! यात परिस्थितीनुरूप जेव्हा बदल होत गेले तेव्हा. ‘दरम्यानच्या काळांत ‘व्हिंदमाता’ स्वतंत्र झाली होती अन् साहेबानं गाशा गुंडाळायला सुरवात केली. ‘बेन्सन जान्सन’ कंपनी, ‘बेन्सन जान्सन एंड मंगळदास प्रायव्हेट लिमिटेड’ झाली. मंगळदासशेठनी आम्हाला ‘अपटूडेट’ व्हायला सांगितलं. आयुष्यांत ‘सूट’ घालीन असं बापजन्मी कधी वाटलं नव्हतं. मंगळदासच्या कृपेनं आमचं चाळीतल्या दोन खोल्यांतलं बिऱ्हाड तीन खोल्यांच्या ब्लॉक मध्ये आलं. सुरवातीला चाळसंस्कृतीशी इमान राखून होतो. पण नवीन संस्कृतीच्या कलीनं आमच्या घरी चंचुप्रवेश केला, अगदी पाहतापाहता. पण ‘पाहतापाहता’ दिसला मात्र नाही! कारण वाढत्या वयाबरोबरच जवळचं कमी दिसायला लागलं होतं!. यजमानांचे ‘मिस्टर’ झाले. बाबांचे ‘पप्पा’ झाले. तुळशीवृंदावनाची जागा ‘केक्टस’नं घेतली. एकदा बोनस मिळाला फारा दिवसांनी तेंव्हा हिला म्हणालो, तुला बांगड्या-बिंगड्या करून घ्यायच्या असतील तर घे हो, तशी अजून विश्वास बसत नाही माझा – खरं की स्वप्नं ते – ती चटकन म्हणाली, त्यापेक्षा रिस्टवॉच घ्या तुम्हाला चांगलंसं. मामंजींच पाकेटवॉच अगदीच जुन्या पद्धतीचं आहे..!’
बदलत्या परिस्थितीत तोल सांभाळण्याच्या या तशा गंभीर चिंतनानं हे आत्मचरित्र संपतं. पुलंनी अशा अतिसामान्य कारकुनाचं ‘आत्मचरित्र’ लिहिल्याला साठ हून अधिक वर्षं झाली आहेत.
पोष्टहापिस, तारा, टेलिफोन जुने झाले. आता मोबाइल, ई-मेल, फेसबुक, व्हॉटस्ॲप. रोज नवनवे शोध लागत आहेत. दूरची माणसं जोडली जात आहेत अन जवळची दुरावत आहेत! ‘अनावश्यकता ही निसर्गालाच मान्य नसते, हे मी स्वत: मानत असल्यामुळे, मी आजवर जे लिहिलं आहे, त्यांतलं ह्या नियमाप्रमाणे जे काही मरणामुखी जाईल, ते तसं जाण्याच्या लायकीचं होतं, असं मी मानीन!’ अशी भूमिका असणाऱ्या पुलंवर ‘त्यांचं लेखन म्हणजे कारुण्याची लहर असलेला रडवा नॉस्तॅल्जिया’, अशी टीकादेखील झाली. पण आज साठ वर्षांनी ‘असा मी असामी’च्या आठवणी जागवताना ते नुस्तंच स्मरणरंजन वाटत नाही, तो काळाचा जपून ठेवलेला तुकडा वाटतो. तो आमचा सामाजिक-सांस्कृतिक दस्तावेज आहे, असं वाटतं. त्यातच त्याचं मोठेपण आहे.
— विशाल अहीरराव.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply