नवीन लेखन...

फेब्रुवारी ०८ : मोहम्मद अझरुद्दीनचा जन्म

8 February 1963 - Mohammad Azharuddin was born

८ फेब्रुवारी १९६३ रोजी हैदराबादेत मोहम्मद अजरुद्दीनचा जन्म झाला. अज्जू आणि अझर या लाडनावांनीही तो ओळखला जातो. ४५ च्या पारंपरिक सरासरीने कसोट्यांमध्ये धावा काढताना अझरने २२ वेळा शतकी आकडा गाठला. एदिसांमध्ये त्याने एकू्ण ७ शतके नोंदविली. एदिसांमध्ये त्याची पारंपरिक सरासरी ३७ धावांची आहे.

कारकिर्दीतील पहिल्या तिन्ही कसोट्यांमध्ये शतक रचण्याचा अनोखा विक्रम अझरच्या नावावर आहे आणि आजवर कुणीही त्याची बरोबरी देखील करू शकलेले नाही. अझर हा एक चपळ क्षेत्ररक्षकही होता. एदिसांमध्ये त्याच्या नावावर १५६ झेल आहेत. एके काळी हा विश्वविक्रम होता. पुढे श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने तो मोडला. एकेकाळी त्याच्या नावावर एदिसांमधील सर्वाधिक धावांचा विक्रम होता. पुढे सचिन तेंडुलकरने तो मोडला.

पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणार्‍या अझरने आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या कसोटीतही शतकी खेळी केली होती. अझरचे दोन मान मात्र काहीशा अशोभनीय पद्धतीने हुकले : कसोट्यांमध्ये १९९ वर धावांवर असताना तो पायचित झाला होता (श्रीलंकेविरुद्ध). हाच त्याच्या ‘नव्याण्णव’ कसोट्यांच्या कारकिर्दीतील उच्चांकी डाव ठरला. तो नव्याण्णव कसोट्याच खेळू शकला आणि शंभर कसोट्या खेळण्याचा मान मिळवू शकला नाही. (हा अर्थात त्याच्याच कृत्यांचा परिपाक होता.)

कोलकत्याचे ईडन गार्डन्स हे अझरुद्दीनसाठी सर्वात भाग्यशाली मैदान ठरले. या मैदानावर त्याने तब्बल १०७.५० च्या सरासरीने सात कसोट्यांमधून ५ शतकांसहित ८६० धावा जमविल्या. मात्र याच मैदानावर १९९६ च्या विश्वचषकात त्याच्या नेतृत्वाखालील संघाला श्रीलंकेने पराभूत केले होते.

सांख्यिकीचाच विचार करायचा झाला तर अझरुद्दीन भारतीय संघाच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक ठरतो. १७४ एदिसांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना (हा भारतीय विक्रम आहे. गांगुलीने १४७ एदिसांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले.) अझरने ८९ विजय मिळविले. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ७६ एदिसांमध्ये विजय मिळविले होते. सर्वाधिक एदिसांमध्ये राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणार्‍यांमध्ये आजही अझर पाचव्या स्थानी आहे. पहिले चौघे आहेत : रिकी पाँन्टिंग, स्टीफन फ्लेमिंग, अर्जुन रणतुंगा आणि अ‍ॅलन बॉर्डर.

क्रिकेट सामन्यांच्या निकालनिश्चिती प्रकाराने अझरवर कायमचा बट्टा लागला. हॅन्सी क्रोनिएच्या कबुलीमुळे उघडकीस आलेल्या या प्रकारात अझर फार खोलवर गुंतलेला असल्याचे स्पष्ट झाले. क्रोनिएची सीबीआयने जी चौकशी केली होती, त्या चौकशीदरम्यान क्रोनिएने अझरनेच आपली बुकींशी ओळख करून दिली अशी माहिती दिली होती. अझरनेही नंतर आपण “तीन” एदिसांचे निकाल आधीच निश्चित केल्याची कबुली दिली होती आणि २००० मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई केली. मात्र २००६ मध्ये मंडळाने त्याच्यावरील कारवाई मागे तर घेतलीच पण २००६ मध्येच माजी भारतीय कर्णधारांच्या गौरवसोहळ्यात अझरचाही गौरव केला (बहुधा निकाल पूर्वनिश्चित न झालेल्या सामन्यांमध्ये त्याने दिलेल्या कल्पक नेतृत्वासाठी !)

एका अल्पसंख्याक गटाचा सदस्य असल्याने आपल्याला भारतात लक्ष्य केले जात असल्याची मुक्ताफळे मागे एकदा अझरने उधळली होती. सर्व स्तरांमधून, अगदी अल्पसंख्याकांच्या प्रातिनिधिक संस्थांकडूनही जोरदार निषेध झाल्यानंतर अझरला जाहीर माफी मागावी लागली आणि आपले फळ मागे घ्यावे लागले.

उमेदीच्या काळातील त्याची फलंदाजी मात्र लाजवाब होती. मनगटाचा इतका खुबीने वापर त्याच्याआधी कुणी केलेला नव्हता. (अगदी पूर्ण भरातला तेंडुलकरही अझर-इतका ‘कलाईदार’ वाटत नाही.) फिरकीपटूंविरुद्ध मनगटाचा वापर करून तो असा फ्लिक करी की बस्स ! त्याच्या खेळाची तुलना त्याच्या समकालीनांपैकी डेविड गॉवर आणि ग्रेग चॅपेलशी केली जायची आणि हे अनाठायी नव्हते.

ज्या पद्धतीने अवघ्या सहा वर्षांच्या काळात (२००० ते २००६) अझरने आपली कृष्णकृत्ये आवाज न होईल अशा तरीक्याने पचविण्याची हूशारी दाखविली तेव्हाच भारतीय राजकारणात तो फार यशस्वी होऊ शकतो हे अनेकांना जाणवले होते. फेब्रुवारी २००९ मध्ये त्याने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि लोकसभेत उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व केले. नौरीन ही अझरची पहिली पत्नी. एकेकाळची मिस इंडिया संगीता बिजलानी ही त्याची दुसरी पत्नी.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..