काही मुले दिसायला साधी असतात पण प्रचंड अतरंगी, जर नीट बघितले तर त्याचा खोडकरपणा, मस्ती डोळ्यात दिसते, पण तितका वेळ शिक्षकाला हवा. आज दुर्देवाने शाळेत कमिटी नावाचा प्रकार असतो. अगदी निवडणुका होतात, शिक्षणाशी संबंधित एखादाही नसतो, सापडला तर सापडतो एखादा आणि त्याची मते लादली जातात शिक्षकावर आणि तात्पर्याने मुलांवर. त्यामुळेही कदाचित शिक्षकावर मर्यादाही येत असतील, तर असो तो वेगळा विषय आहे. मला असे म्हणायचे आहे की अशी मुले शाळेत काय उपद्व्याप करतील त्याचा नेम नसतो आणि अति झाले की शाळाच त्याचा गेम करते म्हणजे ९ वीला १७ नंबरचा फॉर्म त्याच्या कपाळी लावला जातो, शिक्षक आणि सो-कॉल्ड कमिटी हात झटकून मोकळी होते.
असाच एक मुलगा माझ्याकडे आला, साधा होता. त्याची आई घेऊन आली. ८ वी मध्ये होता बहुतेक. चिरंजीव साधे होते पण त्याची नजर मात्र माझ्या संपूर्ण खोलीवर भिरभिरत होती. लक्षात आले हे प्रकरण काय साधे नाही आणि ते तसेच निघाले. तिकडे आईचे लक्ष आणि इकडे माझा चाप, त्याला बरोबर जखडून ठेवले होते परंतु शाळेत तो गेल्यावर मात्र त्याचे अतरंगी व्याप सुरु व्हायचे. एकदा तर त्यानेच सांगितले, शाळेमधल्या फिनेलच्या रिकाम्या बाटल्या किंवा डबे हे लोक भंगारवाल्याला विकायचे आणि मग खात बसायचे. एक मात्र चांगले सिगारेट किवा इतर व्यसन नव्हते. आमच्या विभागात कुठेही सत्यनारायणची पूजा असो भाई रांगेत दिसायचे. त्याला खूप समजावयाचे चांगल्या कार्यक्रमांना मी मुलांना घेऊन जात असे अगदी माझ्या खर्चाने हळू हळू त्याच्यात बदल घडत होता पण मागचा शिक्का काही पुसला जात नव्हता त्याच्याकडे जुन्याच नजरेने अनेकजण बघायचे. एकदा समोरचा हॉटेलवाला म्हणाला तुमच्याकडे तो मुलगा येतो तो सारखा दुसरे खात असताना बघत असतो त्याच्या घरी काही प्रोब्लेम आहे का मी म्हणालो चांगले कुटुंब आहे ते, तो मुलगा स्वतःच प्रोब्लेम आहे. मी ठरवले उद्या ह्याला धडा शिकवायाचा. मी पुढले क्लास सोडले आणि त्याला त्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो, त्याला वडापाव आवडायचा मी २५ वडा-पावची ऑर्डर दिली, ६ व्या वडापावला तो मुलगा थंड झाला कारण त्याला ते अति झाले आणि खरे सांगतो त्याची हौस फिटली त्यानंतर त्याने असला कुठलाच प्रकार केला नाही, तो मला परत कधीच सत्यनारायण पूजेच्या रांगेत दिसला नाही. त्याला मी नेहमी सांगत असायचो कॉपी करू नको आणि कुठलीही चिट्ठी ठेवू नको परंतु शाळेमधील शिक्षकांनी त्याला पाळत ठेवून शेवटच्या पेपरला असा झटकला चिठ्याची रास खाली पडली. झाले चिरंजीव शाळेच्या बाहेर. कारण शाळेला ‘गुणवंत’ मुलाची गरज असते ना. त्याला मी त्याच्या आईच्या समोर धु धु धुतला. मग त्याला दुसऱ्या शाळेत घातला, माझे शिकवणे चालू होते. तो चांगला १० वीत पास झाला. त्याला एकच सांगितले शाळेने तुला काढले ना असे वाग की त्या शाळेला कधीतरी तुला शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून बोलवावे लागेल किंवा त्यांना तुझी गरज लागेल. पुढे तो मुलगा हळू हळू सार्वजनिक क्षेत्रात शिरू लागला, त्याच्या ओळखी वाढल्या, राजकारणी अर्थात सर्वच पक्षाचे त्याला मानू लागले त्याची प्रतिमा हळूहळू बदलू लागली. त्याचा मूळ स्वभाव कुठल्याकुठे गायब झाला, कधीही कुठलाही विचार न करता कृती करणारा हा मुलगा प्रत्येक गोष्टींचा संयमाने विचार करू लागला. त्याला आता कळू लागले आहे नुसता पैसा म्हणजे काही नसते. नाव पण तितकेच मोठे आणि सशक्त असावे लागते. कारण बेसुमार पैसेवाले गल्लीबोळात खूप असतात त्यांना कुत्रेही विचारात नसते किवा गल्लीपलीकडे त्याची ओळखही नसते. हे त्याला जाणवले हे महत्वाचे. कधी कधी त्याचा तोल घसरेल असे वाटते पण तो लगेचच आपणहून सावरतो हे विशेष. सांगायची गोष्ट म्हणजे कालच एका महाराष्ट्रामधील एका मोठ्या व्यक्तीने त्याच शाळेत त्याचा सत्कार केला त्याची त्यावेळचे शिक्षक उपस्थित होते.
ते शिक्षक चाट पडले आणि म्हणले तू जो काही आहेस तो सतीशमुळे, मी म्हणालो सर त्याच्यामुळे तो आहे त्याने माझे ऐकले नसते तर मी काय कपाळ करणार.
पण आज तो मुलगा खूप प्रयत्न करत आहे कदाचित तो राजकारणात पडेलही..निदान नाव मात्र कमावणार इतके निश्चित.
सतीश चाफेकर
Leave a Reply