परीक्षा एकदाच्या संपल्या की सुटलो बुवा. अशीच सर्व मुलाची इच्छा असणे स्वाभाविक असते. बिचारी मुले शाळा, क्लास , होमवर्क , वह्या पुऱ्या करणे, अशाने मुले कंटाळली नाही तर नवलच. आत्ता आपण आरामात सकाळी उठावयाचे असे स्वप्न बघतच ती शेवटचा पेपर देतात. घरी आले की दफ्तर जे कोपऱ्यात जाते त्याला निकाल लागेपर्यत हात लागत नाही . तसा प्रत्येकजण या माडवाखालून गेलेलाच असतो. काही मुले खरोखर सुखी असतात. झाली ना परीक्षा आत्ता करा मजा. असे सुख सध्या चाळीमधील मुलांच्या नशिबी असते अर्थात माझ्याही नशिबी होते. पण हल्ली अशी नशीबवान मुले तशी कमीच कारण सुट्टीत काय करणार , सुट्टी फुकट घालवणार का, काही तरी सुट्टीत करा , हीच वेळ आहे नवीन शिकण्याची , शाळा सुरु असताना काही वेगळे करता येत नाही कारण अभ्यास असतो असा विचार काही घरामध्ये असतो अशा करिअर ओरिएटेड घरात मात्र मुलांची पार मुस्कटदाबी होते. आणि सुट्टीमध्ये शिबिरे, बोद्धिक घेणारे वर्ग याचा सुळसुळाट सुरु झालेला असतो कारण त्यांचे ते कमाईचे दिवस असतात. कोणी नाट्य शिबिरे घेतो , कोणी योगाची शिबिरे घेतो , कुणी संस्कार शिबिरे घेतो तर कुणी हस्ताक्षर तर कुणी सुलेखन वगेरे अर्थात ते वाईट नाही पण निदान मुलांना खेळू द्या , भटकू द्या , वाचू द्या , टी. व्ही . बघू द्या. जर त्यांना आवड नसेल तर त्यात ढकलण्यात अर्थ नाही. हे सर्व वाचून कुणीही म्हणेल असाकसा हा मास्तर आहे .
जर मुलांच्या दृष्टीकोनातून विचार केला तरच तुम्हाला माझे म्हणणे पटेल. काही घरात अशा सुट्टीमध्येही मुलांना ‘ बिझी ‘ ठेवणारी विद्वान पालक मंडळी आहेत. मुलगा दिवसभर घरात यांना नको, परत वाईट संगत लागली तर अशा सर्व भीती आणि अपेक्षाच्या पोटी मुलांचा छळ माडला जातो कधीकधी दुर्देवाने मुले अशा पद्धतीने ‘ मोल्ड ‘ केली जातात. आणि मुलगाही दरवर्षी शिबिराना जातो. पण असे ‘ मोल्ड ‘ करणे खरेच गरजेचे आहे का ? त्याला मैदानात खेळू द्या , मुद्दाम क्रिकेटचे शिबीर लावू नका जर तो वर्षभर क्रिकेट खेळणार असेल तरच त्याचा उपयोग आहे नाहीतर सुट्टीमध्ये क्रिकेटचे शिबीर लावून कोणी क्रिकेटपटू किवा खेळाडू बनत नसतो. माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे चागला क्रिकेट खेळायचा , नववीपर्यत खूप सामने खेळला , तो मुंबईत निवडला गेला परंतु १०वीचे वर्ष म्हणून त्याच्या वडीलानी त्याला अभ्यास कर म्हणून सांगितले झाले मुलाने बापाचे आईकले , त्याला मोठी संधी मिळाली होती ती गेली . १० वी ची परीक्षा झाली , अभ्यासामुळे क्रिकेटपासून दूर राहिल्यामुळे तो खरेच मागे पडला कारण सातत्य नसल्यामुळे ,तो पूर्वीचा फॉर्म दाखवू शकला नाही . आत्ता बारावीत आहे पण त्याचे क्रिकेट गल्लीपुरते मर्यादित राहिले. आजही तो भेटला की मी खूप मोठी चूक केली असे सागतो. तरी मी त्याला आधी सावध केले होते पण बापाचीच बुद्धी तोकडी असल्यामुळे मुलाचे नुकसान झाले.
तर दुसरीकडे कल्याणचा प्रणव नलावडे हे दुसरे वेगळे उदाहरण प्रणव माझा मित्र राजेश पवारचा जवळचा नातेवाईक , राजेशही माझ्याप्रमाणे ‘ लिम्का ‘ रेकॉर्डवाला . जेव्हा प्रणवने १००९ धावाचा विक्रम केला तेव्हा मी त्याच्या आई-वडील , त्याच्या मित्राबरोबर होतो. ते दोघेही मला म्हणाले आम्ही आधीच प्रणवला सांगितले होते तुझे १० वीचे वर्ष असले तरी अभ्यास कर पण क्रिकेटही चालू ठेव आणि पुढे जे प्रणवने करून दाखवले ते संपूर्ण जगाने बघितले . तात्पर्य एकच आहे जे सुट्टीमध्ये किवा शाळा चालू असताना मुलाला जो व्यासंग लावाल त्यामध्ये सातत्य ठेवा. तरच त्याचा पुढील आयुष्यात उपयोग होईल. नुसती सुट्टीमधील शिबिरे करून काही होणार नाही अनावश्यक टाईमपास होईल . अशी खूप उदाहरणे देता येतील, जर आपण डोळसपणे आजूबाजूला पहिले तर अनेक पालक मंडळी आत्ताच विवचनेत असतील . मुलाला आत्ता सुट्टी लागेल त्या सुट्टीचा सदुपयोग केला पाहिजे मी म्हणतो कर्माचा सदुपयोग ? त्याला मुक्तपणे सोडा की राव त्याला वाचावयाचे असेल तर ग्रंथालय लावा , जिमला जायचे असेल तर जिमला पाठवा . पण हे सर्व करताना तुम्ही ठरवू नका त्याने काय करावयाचे आहे ते . पण जे काही कराल त्याचे सातत्य सतत दिसले पाहिजे ते सुट्टीपुरते मर्यादित नसावे जेणेकरून पुढे ती गोष्ट , ती कला त्याच्या आयुष्याचा भाग बनून त्यात त्याने प्राविण्य मिळवले पाहिजे पण हे सर्व त्याला ते ठरवू द्या. मुलेही मस्ती करणारच , जी मुले मस्ती करत नाहीत ती खरोखरच मस्ती का करत नाहीत ह्याचा शोध पालकांनी घेतला पाहिजे. ह्या जगात अरे ला कारे उत्तर देता आले पाहिजे अगदी कोणत्याही भाषेत. नाहीतर एक वेगळाच न्यूनगंड मुलामध्ये निर्माण होईल . मुलाच्या वागण्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे तो त्याच्या स्वतःबद्दल. आणि हे खूप महत्वाचे आहे. नुसती मस्ती किवा बेफामपणा काय कामाचा.
खरे आहे काही मुले बेफाम असतात ,उद्दाम असतात , काही मुले काहीही करणारी असतात कारण ती डेअरिंगबाज असतात. त्याच्या बेफामपणाचा उपयोग कसा करावा हे त्यांना समजवा एक मित्र म्हणून कारण हल्ली नुसते शिकून , नुसती डिग्री मिळवून काही होत नाही एखादी कला , एखादा चांगला व्यासंग असावा जो तुमच्या मुलाच्या आयुष्याला वळण देणारा असावा जेणेकरून त्याचे आयुष्य समृद्ध होईल. नुसती सुट्टीपुरती शिबिरे लावून काही होणार नाही त्यात सातत्य पाहिजे . सुट्टीपुरती शिबिरे हा अनेकांचा जोडधंदा झाला आहे तेव्हा ज्या शिबिरामध्ये वर्षभर सातत्य आहे अशी शिबिरे लावा जेणेकरून तुमचा मुलगा खरेच घडला जाईल , तूर्तास त्याला खेळू द्या मजा करू द्या तुमच्या फुटपट्ट्या तुमच्याकडेच ठेवा .
सतीश चाफेकर
Leave a Reply