आज सर्व काही बदलत आहे. मुलांना पडद्यावरचे पटकन लक्षात राहते हे हळूहळू सर्वाना कळू लागले आहे. ह्यामुळे शिक्षकावरील ताण निश्चित कमी होईल परंतू त्याला स्वतःला अभ्यास करावा लागणार आहे. जसे मुलाचे मूल्यमापन होते तसे शिक्षकाचे होणार आहे. मुले शार्प होत आहेत. विनोबा भावे यांनी एका ठिकाणी म्हटले आहे समोरचा मुलगा जितका ‘ढ’ त्यापटीने शिक्षक हुशार पाहिजे. प्रत्येकाला एकच फुटपट्टीने मोजता येणार नाही. मुलासाठी शिक्षकाने स्वतः प्रयोगशील राहिले पाहिजे. मुलासमोर जाताना हे मला माहित नाही, मग सांगेन अशी उडवाउडवीची उत्तरे चालणार नाहीत कारण मुले खूप हुशार आहेत, शिक्षकाचे मूल्यमापन लगेच करतात, त्याचे पडसाद शाळेच्या टॉयलेटमध्ये दिसतात. हे जरा तुम्हाला जरा जास्त वाटेल पण अनेक ठिकाणी असे घडलेले आहे. मुलाची मानसिकता आणि शिक्षकाची मानसिकता महत्वाची आहे. दुसरे म्हणजे शाळेची जी कमिटी असते त्यामध्ये अनेक पदाधिकारी असे असतात त्याचा शिक्षणाशी काहीही संबध नसतो. फक्त तिथे राहून स्वतःचा इगो जोपासत असतात ह्याचा सर्वप्रथम शिक्षकांना त्रास होतो आणि त्यांची शिकवण्याची जी उर्जा असते ती नष्ट होते तर काहीची चमचेगिरीमध्ये नष्ट होते याचा सर्व परिणाम मुलावर साहजिक होणारच. मी आज जरा वेगळे सांगत आहे. एका बाजूला सुधारणा तर दुसरीकडे शाळेच्या कमिटीचे उपद्व्याप. इतकी रस्सीखेच याच्यामध्ये चालली असते हे बाहेरच्यांना कळणार नाही. पण शिक्षक मात्र हैराण झालेले असतात. जर हंगामी शिक्षक ५-६ हजार रुपयावर ठेवलेला असेल तर तो खरेच न्याय देईल का? बरे त्याच्याकडून किती रुपयाच्या पावतीवर सही घेतली जाते, याचाही शोध शिक्षण खात्याने घेतला पाहिजे. मी हे सगळे का सांगत आहे कारण ह्या सगळ्या इगो, डॅंबिसपणाचा परिणाम मुलाच्या शिक्षणावर होणारा असतो. शिक्षकाच्या क्षमतेवर होत असतो हे पालकांना कळत नाही.
शाळा आणि मुले हे नाते जर चांगले असेल तर बरेच चागले घडू शकते. आज वर्तमानपत्रातून नेहमी शाळा मुलांना कशा नाडून बघतात हे माहीत आहे. मुलावर, पालकावर अन्याय करतात. जास्त फी मागतात. अचानक काही फतवे निघतात. संपूर्ण शिक्षण व्यवस्था आज चर्चेचा विषय बनली आहे. मुले आणि मुलाचे शिक्षण महत्वाचे आहे याचा सर्वांना विसर पडू लागला आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यात भर म्हणजे नवीन बदलणारे नियम, अभ्यासक्रम याची भर पडत आहे. ज्याला शिक्षण क्षेत्रामधले काही कळत नाही असा मंत्री आणून ठेवला की सगळाच घोळ होतो हे आजही दिसत आहे.
सुधारणाही हव्या आहेत आणि त्या करताना सर्व स्थरामधील मुलाचा, पालकाचा विचार करणे गरजेचे आहे.
मला आठवत आहे, एकदा ८वी चा अभ्यासक्रम बदलला होता. सर्व पुस्तके नवीन होते. गणित सोडवण्याची पद्धतही बदलेली होती. पूर्वी कंसात उत्तर नाही लिहिले तर शून्य गुण देणारा शिक्षक मी पाहिलेला होता. बरोबर चे चिन्ह दिले नाही म्हणून ‘शून्य’ गुण देणारा शिक्षक पाहिला होता. अक्षरशः मुले त्याच्याशी भांडायची पण त्या माणसावर शून्य परिणाम असायचा. माझ्या वर्गात भूमितेमध्ये ६० पैकी ५२ मुले नापास झाली असे तो अभिमानाने सांगायचा म्हणजे मी किती कडक आहे हे त्याला दाखवून द्यायचे होते पण यामध्ये त्याची हार आहे हे पण त्या येड्या मास्तरला कळत नसे. परंतु तीच मुले बोर्डाच्या परीक्षेत चांगली पास व्हायची. हे गौडबंगाल शाळेच्या ध्यानात खूप उशीरा आले. कारण तो स्वतःच्या गणिताच्या ‘गोल्ड मेडल’ मध्येच अडकलेला होता. मुले चुकू शकतात त्यांना कमी मार्क दिले पाहिजेत पण किती याची मर्यादा त्याच्याकडे नव्हती. परंतु आता मुलाचा विचार सर्वजण करायला लागले आहेत हे महत्वाचे. शाळेने विशेषतः शाळेच्या कमिटीने स्वतःचा इगो जोपासण्यापेक्षा, मुलाबरोबर, आपल्या शिक्षकाबरोबर चांगला समन्वय राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुले ‘ड’ तुकडीमधून बाहेर काढायची असतील तर कमिटीने आणि शिक्षकांनी एका समान पातळीवर येऊन काम करण्याची गरज आहे, स्वतःची ‘गुर्मी’ आवरली पाहिजे.
आज अनेक शाळा सुधारत आहेत, कारण त्यानाही स्पर्धेत टिकायचे आहेच. अनेक शाळामधून ई – लर्निंग सुरु झाले आहे तर काही ठिकाणी सुरु होत आहे. शाळांनी, शिक्षकांनी काळाबरोबर राहणे आवश्यक आहे. मुले तर काळाबरोबर आहेतच ही चांगली गोष्ट आहे. शिक्षकांनी आपले मोबाईल अपडेट आहेत का हे प्रथम बघून घ्यावेत कारण मुद्दामच सांगतो, मुले शाळेबाहेर आली की चर्चा करतात आणि सरांबद्दल जे शब्द वापरतात ते सरांनी ऐकले तर ते सुद्धा मनात विचार करतील. वर्गात जेव्हा पेन ड्राईव्ह वरून एखादी माहिती लावली जाते, ती मुले पहातात. वेळीच शिक्षकही त्याचे विश्लेषण करतात. पण काही शाळामध्ये ते जलद दाखवली जाते की शिक्षकाला नीट सांगताही येत नाही कारण तितका वेळ त्यांना मिळत नाही. प्रत्येक शाळेने त्यासाठी अपडेट राहिले पाहिजे आपल्या शाळेमधील शिक्षक शिकवू शकतील का हे बघितले पाहिजे.
सतीश चाफेकर
Leave a Reply