कालपरवाची गोष्ट आहे. रंगपंचमीच्या आदल्या दिवसाची ८ वी मधला मुलाला सांगितले, “अरे रंगीत पाण्याचे फुगे फोडू नको, पोलीस पकडतात.” तेव्हा तो म्हणाला काही पकडत नाहीत, अमुकतमुक आरोपी राजकीय नेता आहे त्याला उमारकैद झाली आहे तरी तो बाहेर आहे, काही होत नाही. अर्थात त्या मुलाच्या घराचे वातावरण तसेच होती. माझी वरपर्यंत ओळख आहे ही त्याची ‘खानदानी’ परंपरा होती आणि घरात वातावरणही तसेच असणार याची मला खात्री होती आणि तसेच निघाले. हे निर्ढावलेपण लहानपणापासून सुरु होते त्याला प्रमुख कारण स्वतःचे घर, घरातील भ्रष्ट वातावरण हेच असते. अशा घरामध्ये पैसा कुठून येतो हे त्या मुलाला माहीत असते पण त्या घरामधील आया-बहिणींनाही माहित असणार पण आपल्या नवर्याकडे-बापाकडे पैसा कसा येतो ह्याचा त्यांनी कधीच विचार केलेला नसतो. जेव्हा स्वतःचा लहान मुलगा असे उत्तर देतो तेव्हा ही धोक्याची घंटा ओळखली पाहिजे. बहुतेक गल्लीमधल्या तथाकथित राजकारण्याच्या घरात ही वाजत असतेच. ती गुर्मी, उद्धटपणा तिथे वाढत असतो आणि पुढे तो सर्व घरादाराला, आजूबाजूच्यांना खाऊन टाकतो.
माझ्याकडे अनेक राजकारण्याची मुले शिकायची पहिले मी त्याची गुर्मी काढून टाकायचो, तेही त्याला वाईट न वाटू देता. हळूहळू तो मुलगाच आपल्या भ्रष्ट बापाचा विरोधक बनतो कारण त्याला चांगले आणि वाईट यामधील फरक कळू लागलेला असतो. अर्थात बाप कितीही भ्रष्ट असला तरी आपला मुलगा बेवडा किंवा गुन्हेगार बनावा असे वाटत नसते, पंरतु पैशाच्या नशेत कळतनकळत बापाची गुर्मी मुलात येते आणि पुढे घोळ होतो. आपल्या मुलाला पोलीसांनी पकडले म्हणून संतप्त बाप खूप पाहिले असतील, वृत्तपत्रात त्याबद्दल वाचलेही असेल. तो बाप त्याला सोडवतो देखील पण त्याच वेळी तो बाप आपल्या मुलाला अशा चक्रव्यूहात ढकलत असतो याचे भान असले पाहिजे. कदाचित त्यातून मुलगा बाहेर पडेलही, पण नुकसान होणारच असते.माझ्या बापाची पहुच वरपर्यंत आहे किंवा माझ्या मित्राचा बाप पोचलेला आहे, त्याची वरपर्यंत ओळख आहे हे वरपर्यंत प्रकरण पुढे घातक असते.
मुलांचे मन खूप वेगळे असते लहानपणापासून आई-वडील मुलाचे आदर्श असतात पुढे ती जागा दुसरे घेतात, कधी शिक्षक घेतात, कधी खेळाडू घेतात तर कधी कधीही न अडकलेले राजकारणी घेतात. मुलाची जडणघडण असते ती महत्वाची असते. ती योग्य वेळेत व्हायला पाहिजे. विचार आणि वर्तणूक ही आई-वडीलांना मुलाकडे ट्रान्स्फर करायची असते पण मुळात ती त्याच्याकडेच असावी लागते. घरातच कोपऱ्यात ‘बार’ असेल तर पुढला काळ कठीण असतो. अर्थात माझे हे विचार ‘बुरसट’ वाटतील, परंतु लहान मुलाच्या मनावर ते परिणाम करतातच. माझ्या माहितीची अशी अनेक कुटुंबे आहेत ती सर्व काही असूनही सर्व काही नसल्यासारखी आहेत. आपण आजूबाजूला डोळसपणे पाहिले पाहिजे आणि याचा परिणाम नुसता त्याच्यावर होत नाही तर आजूबाजूच्या मुलावरही होतो आणि त्याची आयुष्येही उध्वस्त होतात हे माझ्या घरामधील माझ्या स्वतःच्या भावाच्या उध्वस्त आणि अकाली संपलेल्या आयुष्यावरून सांगतो. कारण कुसंगत तुम्हालाही संपवते आणि आजुबाजुच्यानाही उध्वस्थ करते. चुका दोन्हीकडून होतात असे म्हटले जाते परन्तु कोणाची मोठी चूक कोणाची लहान चूक ह्यावर चर्चा न करता चूक ही चूकच असते आणि त्याचे परिणाम भोगावेच लागतात.
मुले गुन्हेगारीकडे का वळतात तर बाजूचा खूप पैसा कसा कमवतो तो त्याला दिसतो पण त्याचे परिणाम जाणून घेण्याची कुवत त्याच्यात नसते परिणामी भयानक सत्याला त्याला, त्याच्या कुटुंबाला जावे लागते. मी असे बाप बघितले आहेत ते सांगतात माझ्या मुलाचे मित्र खूप मोठे आहेत त्याचे बाप पोचलेले आहेत म्हणून बिनधास्त आहे माझा मुलगा. हा एक वेगळा फंडा असतो अमुक-तमुक मित्राचा बाप सॉलिड आहे, त्याची ओळख वरपर्यंत आहे म्हणून काही मुले गुर्मीत असतात. पण हे किती पोकळ असते हे पुढे जाणवते. तरीपण असा वर्ग आहे बाप मोठा आहे म्हणून ‘टाळाटाळ’ करणारे पोलीस यंत्रणाही त्याला कारणीभूत आहे आधी ही यंत्रणा नीट सुधारली तर ‘गुन्हेगार’ होण्याचे कारखाने कमी होतील.
मला त्यादिवशी एक दोन नंबरवाला बाप सांगत होता जगात सगळीकडे भ्रष्टाचार आहे. शेकडो पैसे न खाणारी माणसे निर्माण होऊन कमी होणार नाही. खरेच मला त्याची कीव करावीशी वाटली. पैसा आहे, आपले भ्रष्ट व्यवहार चालू आहेत म्हणून हे असले विचार एखद्या सिनीअर माणसाला शोभतात का? खरे तर त्याने विचार केला पाहिजे आपण शेण खाल्ले पण निदान पुढल्या पिढ्यांनी खाऊ नये. पण तसे नाही. परंतु मी असाही दोन नंबरवाला माणूस पाहिला आहे की काही नियतीचे फटके पडले म्हणून सुधारला का तर पुढल्या पिढीसाठी अर्थात अशी माणसे असतात फक्त शोधावी लागतात हे महत्वाचे. अर्थात हा विषय खूप मोठा आहे परंतु मुलाच्या जडणघडणीमध्ये अशा घरांचाही विचार केला पाहिजे निदान त्याच्या पालकांनी की आपण आज आहोत उद्या नाहीत बदलत्या काळात हे मुले आपण सुरु केलेल्या धंद्यात तोड देवू शकतील का? कारण पुढल्या पिढ्यांना अनेक प्रलोभने हाका मारत असतात, त्यात ती नीट जगू शकतील का कारण पूर्वी पैसा कमवण्यासाठी दारूचा धंदा, जुगार, मटका होते हे सर्व केले की खूप पैसा मिळायचा पण आता खूप शिकले तर लाखो रुपये पगार मिळतो, सन्मान मिळतो, समाजात स्थान मिळते. जर आताच जागे होऊन सुधारले नाही तर आपल्या मुलाच्या आणि त्यापुढील पिढीच्या नशिबी दोन नंबरच्या खानदानामधील मुलगा म्हणून शिक्का बसेलेला त्या पुढल्या पिढीला निश्चित मानवणार नाही, अर्थात माझे सांगणे हे कदाचित अतिरंजित किंवा भावनिक असे वाटेल, पण हे ८० टक्के सत्य आहे हे नाकारून चालणार नाही .
दुर्दैवाने आता तर कुठलेच क्षेत्र सोडले नाही हॉस्पिटल पासून स्म्शानपर्यंत ही शोकांतिका आहे आपल्या समाजाची. बघू काय होते? होप सो .
सतीश चाफेकर
Leave a Reply