शाळा सुरु झाल्या. नवीन पुस्तके, नवीन गणवेश, नवीन वर्ग, नवीन मित्र आणि नवीन स्वप्ने आता नुकतीच सुरु झाली असणार यात शंका नाही. पालक, मुले, शिक्षक यांचा परत नवीन प्रवास सुरु झाला आहे. आपली वही, आपले पेन आणि अनेक गोष्टी सगळ्यांपेक्षा किती ‘भारी’ आहेत हे प्रत्येकजण आजमावत असणार. तर मागच्या बेंच वरील आमचे काही मित्र मात्र आपल्या शिक्षकांना जोखण्याचे काम करत असणार, तशी शिक्षकाची कीर्ती आणि मुलाची कीर्ती एकमेकाच्या कानावर आधीच गेलेली असणार. सतत मी ‘असणार’ हा शब्द वापरत आहे कारण आत्ताच सुरवात आहे काही आडाखे चुकतील तर काही बरोबर असतील. हे काळच सिद्ध करणार आहे.
मुलाचे रंगीबेरंगी आयुष्य आता खरे सुरु झाले आहे कारण घरापासून स्वतंत्र होण्याच्या प्रक्रीयेला नुकतीच सुरवात झाली आहे, तर तिकडे पालक मंडळी टक्याचा हिशेबात गुंतली असणार. शाळेच्या बाहेर मुलाची वाट पहात असणाऱ्या आया आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे ऐकमेकींना समजावून सांगत आहेत हे दृष्य आत्ता दिसू लागले आहे. तर तिकडे मुलगा मात्र शाळेतून बाहेर आल्यावर आज काय झाले हे सागण्यात दंग असणार. परंतू हा सीन काही दिवसच बघायला मिळणार कारण ह्या दररोजच्या प्रश्नाला तो मुलगा पुढे पकणार आहे आणि इथूनच खटके उडायला सुरवात होणार आहे.
मग माझ्याकडे अनेक वेळा तक्रारी येऊ लागतात की मुलगा ऐकत नाही, तुम्ही सांगा आणि मग शिक्षकाची जबाबदारी सुरु होते, तर काही क्लासचे शिक्षक सांगतात मी शिकवणार बाकी तुमचे तुम्ही बघून घ्या कारण वर्षाची फी तर आलेली असते निदान सहा महिन्याची, शाळेमधल्या शिक्षकाला फायदा नाही उगाच मार्कावर पुढे परिणाम झाला तर काय, हा प्रश्न मनात येतो. मग टोळक्यामधली एक बाई सांगते तो अमुक-तमुक क्लास आहे तो रविवारी आठ तास घेतात. झाले जुन्या क्लास बद्दल ह्याच्या मनात शंका निर्माण होते आणि इथेच गणित बिघडायला सुरवात होते. मुलगा नुकताच क्लासमध्ये सेट होत असतो आणि मग संध्याकाळसाठी दुसरा क्लास शोधायला लागतात. त्या क्लासमध्ये विनंती करून पाहतात, डोंबिवलीसारख्या ठिकाणी पालक जे कामाला सकाळी जातात ते संध्याकाळी ९ शिवाय घरात उगवत नाहीत. जर आई घरी असणारी असेल तर तिच्या संध्याकाळच्या टी. वी . च्या मालिका हुकणार सगळ्यात बेस्ट म्हणजे संध्याकाळसाठी दुसरा क्लास. कार्ट पहिले पहिले जाते मग दांड्या मारू लागते.
माझ्या क्लासला एक असाच मुलगा होता त्याला ३ क्लास लावले होते, तर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी चौथा. अपेक्षा होती आपल्या मुलगा सी ए झाला पाहिजे बाळ ५४ टक्क्याने पास झाले. सर्व खापर क्लासवर फोडले. अरे काही पालकांना इतकी अक्कल नसते एकाच आई-बापाची दोन मुले, वेगळ्या प्रकारची, वेगळ्या बुद्धीमत्तेची होतात. आई-बाप म्हणजे मोदकाचा साचा आहे का? पण ते समजत नाही अक्कल गहाण टाकलेली असते ना? साथीला गुर्मी. हा माझा मुलगा आहे तो तसे वागणारच नाही ही फाजील गुर्मी. कुठलेही क्षेत्र घ्या जिथे गुर्मिचा, अहंकाराचा प्रवेश झाला की सर्व काही संपायला कधी सुरवात होते ते कळत नाही. असे अनेक पालक बघितले आहेत आणि त्याची मुले फुकट गेलेली पाहिली आहेत, मी असूनही काही करू शकत नाही कारण एकदा मुलगा माझ्याकडून गेला की मी लक्ष देत नाही कारण त्याच्या स्वप्नांना तडा लावणारा मी कोण, सर्वच ठिकाणी मला यश येतेच असे नाही कारण त्याच्या खाजगी आयुष्यात आपण किती शिरावे याच्या मर्यादेचे भानही बाळगावे लागते. शेवटी ही मुले हताश होऊन कधीतरी, काही वर्षांनी भेटतात. कुठेतरी नोकरी करत असतात, बास.
माझ्या माहितीचा असाच एक मुलगा आहे, सी. एस . करायचे होते पण मुलगा साधारण होता. पण आई-वडीलांचे स्वप्न होते आणि पुढे त्याचेही होते, बिचारा खूप प्रयत्न करत होता. पण यश मिळत नव्हते, आणि शेवटपर्यंत मिळालेच नाही कारण त्याची तितकी कुवतच नव्हती . शेवटी एका सी. ए . कडे नोकरी करू लागला. नीट विचार करा त्याच्या मानसिकतेचा नशीब तो मुलगा व्यसनी नाही झाला, सावरला. परंतु अशी स्वप्ने भंगलेली मुले काहीही करू शकतात. आत्ताच सुरवात आहे स्वतःची स्वप्ने जरा बाजूला ठेवा, आपली स्वतःची प्रगती पुस्तके जर कुठे ट्रंकेत किवा कपाटात ठेवली असतील तर ती परत उघडा त्याचबरोबर आपल्या मुलाचे प्रगती-पुस्तक बघा. एक गोष्ट निश्चित जाणवेल आपल्या प्रगती पुस्तकापेक्षा मुलाचे प्रगती पुस्तक चांगले आहे असे जरी लक्षात आले तरी खूप झाले. प्रगती तर हवी आहे पण तिची घाई केलीत तर घोटाळा होईल. सर्वप्रथम एक गोष्ट करा शाळेच्या बाहेर जे स्त्री पालक गप्पा मारून जी अवांतर माहिती गोळा करत असतात आणि तारे तोडत असतात त्यांना आवरले पाहिजे, ते टाळले पाहिजे कारण पहिला सुरुंग लागायला इथूनच सुरवात होते, स्पर्धेला इथूनच सुरवात होते. स्पर्धा हवी पण ती भान राखून केली पाहिजे आणि हो आपल्याही शाळेच्या प्रगती पुस्तकाचा विसर कधीच पडता कामा नये. झाडे जास्त खत टाकून मोठी करता येतात पण काही झाडे जास्त खत टाकले तर जळतातही .
सतीश चाफेकर
Leave a Reply