नवीन लेखन...

फेब्रुवारी ०९ : ग्लेन मॅग्राचा जन्म

9 February 1970 - Glenn McGrath was born

‘पिजन’ (कबूतर), मिलार्ड आणि ऊऽ आऽ या टोपणनावांनी ओळखल्या जाणार्‍या ग्लेन डोनल्ड मॅग्राचा जन्म ९ फेब्रुवारी १९७० रोजी झाला.

जगातील सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाजांपैकी एक आणि ऑस्ट्रेलियाचा सार्वकालिक सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाज (ठसन असलीच तर डेनिस लिलीचीच) अशी मॅग्राची सार्थ ख्याती आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर जे जबरदस्त वर्चस्व राखले त्यात ह्या कबुतराच्या गोलंदाजीचा सलामीचा आणि सिंहाचा वाटा होता. त्याच्या निवृत्तीबरोबरच महान ऑस्ट्रेलियाई साम्राज्याला उतरती कळा लागल्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली. १९९३ मध्ये न्यू साऊथ वेल्स हा ऑस्ट्रेलियातील प्रांतिक संघ मर्व ह्युजेसची जागा भरून काढण्याचा कसून प्रयत्न करीत होता. १९९२-९३ च्या हंगामात मॅग्राचे प्रथमश्रेणी क्रिकेट सुरू झाले. २००५ मध्ये कोर्टनी वॉल्शचा ५१९ बळींचा विक्रम मागे टाकून मॅग्रा जगातील सर्वाधिक बळीवाला वेगवान गोलंदाज बनला.

२००६-०७ च्या अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडला ५-० असे धवलस्नान घातल्यानंतर, सिडनी ह्या आपल्या घरच्या मैदानावर अखेरची कसोटी खेळून मॅग्रा निवृत्त झाला. या मालिकेत तो ‘मालिकेचा मानकरी’ठरला होता. २००७ च्या विश्वचषकाचाही तो मानकरी ठरला आणि मग एदिसांमधून तो निवृत्त झाला. अशा रीतीने क्रिकेटच्या दोन मुख्य प्रकारांमध्ये यशाच्या शिखरावर असताना मॅग्रा निवृत्त झाला.अखंडपणे आणि मुख्य म्हणजे अगदी बिनचूक टप्प्यावर ऑफ-स्टम्पच्या रोखाने सणसणीत मारा करण्याची क्षमता हा मॅग्राच्या गोलंदाजीचा सर्वात महत्त्वपूर्ण पैलू होता. भरीला तो चेंडूच्या उसळीमध्ये बदल घडवून आणि चेंडु सोडावा की खेळावा ह्या द्विधा मनःस्थितीत फलंदाज बाद होई. माईक आथर्टनला त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तब्बल १९ वेळा बाद केले आणि ब्रायन लाराला तेरा वेळा !!

फलंदाजीमध्ये मॅग्रा फारसा चमकला नाही पण त्याच्याकडे भरपूर जिद्द होती. वुर्सेस्टरशायरविरुद्ध खेळताना एकदा पैज लावून त्याने अर्धशतक काढले होते. कसोट्यांमध्येही त्याने अकराव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन ६१ धावा काढण्याचा पराक्रम केलेला आहे. न्यूझीलंडविरुद्ध २००४-०५ च्या हंगामात त्याने केलेला हा पराक्रम कसोट्यांमध्ये डावातील अखेरच्या फलंदाजाचा तिसर्‍या क्रमांकाचा उच्चांकी डाव आहे. निवृत्तीवेळी त्याच्या नावावर क्रमांक अकरा फलंदाजाच्या कारकिर्दीतील सर्वाधिक धावांचा विक्रम होता (६०३ धावा). पुढे मुरलीदरनने तो मोडला.

२००३ च्या विश्वचषकात नामिबियाविरुद्ध अवघ्या पंधरा धावांमध्ये सात बळी मॅग्राने गट्टम केले आणि अनेक विश्वचषक विक्रमांची वासलात लावली.

दुखापतींनी अनेक वेळा त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला पण निधड्या छातीने सामोरे जात मॅग्राने आपली तंदुरुस्ती कायम राखली. इतकी की, ऑस्ट्रेलियाकडून १०० कसोट्यांमध्ये खेळणारा तो पहिला द्रुतगती गोलंदाज बनला. आज मॅग्रा कसोट्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज आहे. सर्व गोलंदाजांच्या यादीत तो चौथा असला तरी त्याच्यापुढे असणारे सर्वजण (मुरलीदरन, वॉर्न आणि कुंबळे) हे फिरकीपटू आहेत.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..