23 ऑगस्ट 1938 या दिवशी वॉल्टर रेजिनल्ड हॅमंड या इंग्लिश कर्णधाराला संघाच्या धावा 900च्या पलीकडे गेल्यानंतर डाव घोषित करण्याचे अनोखे राजेशाही सुख अनुभवता आले. 1938च्या अॅशेस मालिकेतील हा पाचवा सामना केनिंग्टन ओवलवर खेळला जात होता. पहिल्या डावात इंग्लंडने 7 बाद 903 (घोषित) धावा केल्या. लेन हटन 364, मॉरिस लेलॅन्ड 187, जो हार्डस्टाफ ज्युनिअर 169, आणखी दोघांची निमशतके आणि अवांतर 50 धावा. डॉन ब्रॅडमन यांच्या वैयक्तिक तिसर्या षटकात हॅमंडने डाव संपल्याची घोषणा केली. डॉन 14 चेंडू, 1 षटक निर्धाव, 6 धावा, बळी नाही. जखमी असल्याने डॉन ब्रॅडमन दोन्ही डावांमध्ये फलंदाजीस उतरू शकले नाहीत. एक डाव राखून आणि 579 धावांच्या अंतराने प्रचंड विजय इंग्लंडने मिळविला. ग्राऊन्ड्समन ‘बॉसर’ मार्टिन मात्र नाराज होता – त्याची इच्छा इंग्लंडने किमान 1,000 धावा कराव्यात अशी होती. या सामन्याला कालमर्यादा नव्हती, निकाल लागेपर्यंत तो खेळवला जाणार होता पण चौथ्या दिवशीच कांगारू पराभूत झाले.
23 ऑगस्ट 1963 रोजी रिचर्ड कीथ इलिंगवर्थचा जन्म झाला. कसोटीत आपण टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होण्याचे भाग्य ज्या थोड्या कंदुकफेक्यांच्या वाट्याला आले त्यापैकी हा एक. डावखुरा फिरकीपटू. 1991मध्ये ट्रेंटब्रिजवर वेस्ट इंडीजच्या फिल सिमन्सने त्याचा एक चेंडू अडवून जमिनीवर जोरात दाबला. तो पुन्हा उडून यष्ट्यांवर आदळला. (नियमानुसार फलंदाज चेंडू दोनदा बॅटने मारू शकत नाही. हात न लावता यष्ट्यांकडे जाणारा चेंडू तो अडवू शकतो. नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील अंतिम कसोटीत दुसर्या डावात राहुल द्रविडने सूरज रणदीवचा चेंडू लाथाडण्याचा प्रयत्न केला होता.) यासोबतच कंदुक क्रमांक एकवर बळी मिळविणारा रिचर्ड हा केवळ दुसरा इंग्लिश खेळाडू ठरला. स्कोअरभर गडी (स्कोअर या इंग्रजी शब्दाचा एक अर्थ 20चा गठ्ठा असाही आहे) त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत बाद केले.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply