नवीन लेखन...

‘खुशबू’ – भावपाशांचा दस्तावेज !

खूप साधी -सरळ कथा (त्या काळच्या जीवनाप्रमाणे ),ज्यात निखळ माणसे आहेत आणि त्यांचे भावबंध अशी बहुदा एकमेव असावी गुलजारची ! माणसे आणि त्यांच्यातील भावना ,विचार आणि तदानुषंगाने येणारे वर्तन इतका सोप्पा परीघ आहे खुशबूचा ! त्यातून अभिप्रेत असलेला “परिमळ ” दर्वळतोच पण या सर्जकाचे कौतुक वाटते. माणसांभोवती घुटमळणारी ही कथा तिचा संदेश देऊन जातेच पण अतिशय हळुवारपणे ! आपणांसही त्यासाठी सजग ,सिध्द राहावे लागते. गुलजार मला HR चा माणूस (माझ्यासारखा, म्हणूनही जवळचा) वाटतो. Why people behave the way they behave ! या सनातन प्रश्नाला सामोरे जाणे हे HRचे प्राक्तन आहे. या गुंत्याला गुलजार लीलया सामोरा जातो (किंबहुना आपल्याला असे गुंते सोडविता येतील या आत्मविश्वासापोटी तोच ते तयार करतो.) आणि ते पडद्यावर पाहणे हे आपले भाग्य ठरते.

प्लेग या आजाराच्या कालखंडातील हा चित्रपट आहे. त्याचे भयावह परिणाम डोळ्यांसमोर नको वाटतात. असरानी आणि मा. राजू त्या भोज्ज्याला शिवून येतात (गुलजारचे छोटेसे धक्कातंत्र ) तेव्हा काहीतरी अशुभ आणि नकोसे पाहण्याची तयारी केलेले आपण नकळत सुटकेचा श्वास टाकतो. बैलगाडी आणि नावेचाही वापर सर्रास दिसतो (अपवाद म्हणजे जितेंद्रची कार -जी एक दोनदा दिसते , आधुनिक काळाची खूण ). अहंकार ,अपमानाच्या गाठी घेऊन ही कथा पुढे सरकते -अगदी नैसर्गिक भावना ,पण त्याही नात्यांना सुरुंग लावू शकतात. मग काही सहज आणि काही मुद्दाम गैरसमज (नात्यांचा आणखी एक शत्रू) यांचे बोट धरून ही मंडळी आपल्याला माणसाच्या “आतून “सैर करून आणतात.

कथा तीव्र (इंटेन्स ) नाही पण काहीवेळा संथावते ,तर काहीवेळा अंगावर येते. त्यामध्ये काही निरागस विरंगुळा निर्माण करण्यासाठी फरिदा जलाल आणि मा. राजू ही दोन पात्रे योजली आहेत. हेमा मालिनीला जसं निखळ आयुष्य जगावंसं वाटत असतं ते सारं फरिदाच्या रूपाने व्यक्त होतं . अरुणा इराणी इतकीच ही गुणी (आणि दुर्लक्षिलेली )अभिनेत्री . “मजबूर”, ” दिलवाले दुल्हनिया” सारख्या निवडक (थोडया प्रमाणात “राजा हिंदुस्थानी “) चित्रपटांमध्ये तिचा वकूब कळतो. इथे स्त्री -जीवनाच्या सर्व छटा ती सहजगत्या दाखविते. अल्लड ,खट्याळ (” बेचारा दिल क्या करे ” या गाण्यातून), हेमा मालिनीची भावकल्लोळ आंदोलने समजून घेतानाची पोक्त मैत्रीण ,भावी पतीची बिनधास्त खिल्ली उडविणारी आणि त्याच्या आकस्मित (पण अपरिहार्य )मृत्यूनंतर हंबरडा फोडणारी पत्नी ! केवढा मोठा spectrum तिच्या वाटयाला आलाय आणि तिने तो वागवलायही सहजी ! मा. राजू चे निखळ बाल्य ,त्यातून होणारे किंचित विनोद अधूनमधून आपल्याला सैलावण्यास मदत करतात. आख्खा “‘किताब”त्याने पेलला आहे हे आठवत राहतंच.

वृंदावन आणि कुसुम यांच्यातील तानेबाने दाखविणारी ही कथा ! बालविवाहापासून, हातावरील टॅटू पुसण्या पर्यंतची मजल आणि अनेकदा नाते जुळण्याच्या शक्यता निर्माण होऊनही वळणांच्या वाटेने जावे लागणे याला प्राक्तन याशिवाय दुसरे काय म्हणावे?

त्याकाळात खेडेगावात हट्टाने डॉक्टरी करणारा वृन्दावन आणि त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली कुसुम ! दुरावतात -अचानक भेटतात. तो प्लेगशी यथाशक्ती झुंजण्यात बुडालेला आणि तिला मातृत्वाची आस पुरी करण्यासाठी भेटलेला चरण ! ती बालपणात अडकलेली आणि तो सहजपणे “ते”सारं विसरून गेलेला ! दरम्यान शिकारीसाठी जितेंद्र मित्राबरोबर गेलेला असताना ध्यानीमनी नसताना “शर्मिलाने ” त्याच्या आयुष्यात येणे ! एवढेच वाटेतील खाचखळगे ! पण तेही खूप शिकवून जाणारे -परीक्षा पाहणारे !

हेमा आणि शर्मिला दोघीही गुलजारला अभिप्रेत असलेल्या उत्कट ,स्वतःशी प्रामाणिक असलेल्या ,स्वतःच्या जीवनावर पकड असणाऱ्या स्त्रिया ! दोघीही खंबीर,सशक्त ,समर्थ आणि आत्मनिर्भर ! पण दोघीही एकेका (आपापल्या) क्षणी तुटतात.

जितेंद्र निघून गेल्यावर शर्मिला आत्महत्येचा प्रयत्न करते तर चित्रपटाच्या शेवटी सर्व बळ त्यागून हेमा त्याला म्हणते “का नाही माझ्यावर अधिकार गाजविलास ? का दरवेळी माझ्या इच्छेला मान देऊन झुकलास ?” प्रत्येक स्त्रीला वाटणारी ,तिच्या प्रिय पुरूष्याकडून अपेक्षा असणारी ही सुप्त भावना गुलजार मोठया अभिजातपणे व्यक्त करतो -हेमाच्या प्रतिष्ठेला धक्का न लावता, तिचा आब राखून !

शर्मिला हे या चित्रपटातील एक वेगळे प्रकरण (चांगल्या अर्थाने)! छोटीशी भूमिका पण ज्या ताकतीने तिने ती निभावली आहे त्याला तोड नाही. भूमिका सशक्त असली की तिची लांबी -रुंदी गौण ठरते. डोळ्यांचा खूप प्रभावी वापर करत ,तुटक बोलत तिने तिचे म्हणणे पोहोचविले आहे. ती आणि तिची नानी ,त्यांचे घर सतत “नमकीन”ची आठवण करून देतात. पण भूमिकेचा पोत तोच ! ” आज खूप दिवसांनी कोणीतरी घरी आलंय ,माणसांच्या वस्तीत राहात असल्यासारखं वाटतंय .अन्यथा जगणेच विसरून गेलो होतो.” असं एकाकीपण (लादलेलं ,नावडतं) गुलजार सहज लिहून जातो आणि अमर्याद दुःखाची खोली आपल्या अंतःकरणात वस्तीला येते.

असरानी या हरहुन्नरी कलावंताचा उल्लेख इथेही अपरिहार्य ठरतो. त्याच्याशिवाय गुलजारचा चित्रपट पूर्ण होत नाही. खेळणी विकणारा ,बहिणीसाठी विवाह करण्यास थांबलेला, आणि शेवटी “आता मागे वळून बघू नकोस ,जा तुझ्या पतीबरोबर ” अशी जागेवरूनच तिची बिदाई करणारा कुंज -बहारदार !तीही पुन्हा नव्याने चूक करण्याचे नाकारून सांकेतिक रूपात घरच्या चाव्या वळून न बघता मागे टाकते ! चित्रपट सुखांत संपतो.

आरडी आणि गुलजार येथेही भरभरून देतात- “ओ माझी रे ” या ओळींमध्ये किशोर खोल आणि अथांग समुद्र ओततो. (या गाण्याचे चित्रीकरणही अप्रतिम). दुसरे उल्लेखनीय गीत म्हणजे – ” दो नैनोमें आसू भरे हैं ,निंदिया कैसे समाये !”

गुलजारचे कौतुक यासाठी करावेसे वाटतं की “पानी ,पानी रे ,खारे पानी रें ! नयनोमे भर जा, नींदे खाली कर जा !” असं विरुद्ध अर्थाचे लिखाणही तो “माचीस ” मध्ये लीलया करून जातो. त्याची भाषेवरील ही पकड अचंबित करणारी आहे. (असाच वर्तमान आणि भूतकाळाशी सहजगत्या तो खेळलाय- “वो शाम कुछ अजीब थी ,ये शामभी अजीब हैं “मध्ये !)

एकेकाळी जीवन किती सोपे होते आणि त्याचे प्रतिबिंब ज्यात पडायचे ते चित्रपटही किती हृदयस्पर्शी होते याचे उदाहरण म्हणजे “खुशबू” .कोठलाही संदेश नाही, भाष्याचा आव नाही तरीही हा ” भावपाशांचा दस्तावेज ” मनाचा एक कोपरा व्यापून राहतोच.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..