कल्पनाचं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. किशोरनं तिला पाहताक्षणीच पसंत केलं होतं. किशोरचे आई-बाबा दोन वर्षे त्याच्यासाठी मुली पहात होते. प्रत्येकवेळी काहीना काही कारणाने लग्न काही ठरत नव्हतं.
किशोर चांगल्या कंपनीत नोकरीला होता. त्याला शिकलेली आणि गृहकृत्यदक्ष अशी पत्नी हवी होती. त्याच्या आईचा तो लाडका असल्याने आईने त्याच्याच पसंतीला महत्त्व देण्याचे ठरविले होते. किशोरचे बाबा मात्र दोघांच्या समाधानातच स्वतःचा आनंद मानणारे होते.
कल्पनाला किशोरने पसंत केले. रितीरिवाजानुसार लग्नकार्य पार पडले. चौघे आनंदाने राहू लागले. वर्षातील सणवार परंपरेनुसार पार पडले.
काही दिवसांनी नव्याची नवलाई संपुष्टात आली आणि घरातील वातावरण पहिल्यासारखं राहिलं नाही. कामापुरतंच एकमेकांशी बोलणं होऊ लागलं.
कल्पना हुशार होती. तिनं एका रविवारी किराणा दुकानातून एक छोटं रिकामं खोकं आणलं. त्यावर रंगीत कागद चिकटवून ते पॅकबंद केलं. त्याच्या वरच्या बाजूला एक काॅईन बाॅक्ससारखी दोन इंचाची चीर पाडून ठेवली.
एका रविवारी दुपारचं जेवण झाल्यानंतर तिनं किशोर व त्याच्या आई बाबांना तो रंगीत बाॅक्स दाखवून म्हणाली, ‘तुम्ही तिघेही लक्ष देऊन ऐका. प्रत्येक रविवारी आपण चारही जणांनी, आठवड्याभरात जे काही चांगलं घडलं असेल, कुणाबद्दल काही खटकलं असेल, एखादी कौतुकास्पद गोष्ट घडली असेल ती एका छोट्या कागदावर लिहायची आणि त्याची छोटी घडी करुन या बाॅक्समध्ये घालायची. आपण एक वर्ष पूर्ण झाल्यावर तो बाॅक्स उघडून त्या चिठ्या एकत्र बसून वाचूया. त्या वाचून आपल्या आठवणी नक्कीच पुन्हा ताज्या होतील.’ सर्वांनी एकमताने कल्पनाच्या आयडियाला होकार दिला.
पहिल्या आठवड्यात चौघांनीही जमेल त्यावेळी चिठ्या लिहिल्या व त्य बाॅक्समध्ये टाकल्या. दोन महिने झाले, साधारणपणे नऊ रविवार झाले. एकूण छत्तीस चिठ्या त्या बाॅक्समध्ये जमा झालेल्या होत्या.
एका रविवारी किशोर व त्याचे आई बाबा, तिघेही एका नातेवाईकांना भेटण्यासाठी सकाळीच बाहेर पडले. त्यांना यायला संध्याकाळ होणार होती. कल्पनाने सर्व कामे आटोपल्यावर विचार केला की, घरात आत्ता कुणीही नाहीये तर आपण बाॅक्स उघडून तरी पाहूया.
तिने कुणालाही जाणवणार अशा काळजीपूर्वक रितीने बाॅक्स उघडला. अधीरतेने ती एकेक करुन चिठ्ठी वाचू लागली. किशोरने एका चिठ्ठीत त्याच्या आवडीची पावभाजी अप्रतिम केल्याबद्दल तिचे कौतुक केले होते. आईने लिहिलेल्या चिठ्ठीत ती किशोरशी ‘अरे, तुरे’ करुन बोलते त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली होती. बाबांच्या चिठ्ठीमध्ये तिने एकदा किशोर बरोबर बाहेर जाताना टी शर्ट व पॅन्ट घातल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. किशोरने एका चिठ्ठीत तिच्याकडून होणाऱ्या मोबाईलच्या अतिवापरावर रोष व्यक्त केला होता. सर्व चिठ्या वाचून झाल्यावर तिला आपल्या चुका आणि आपल्याबद्दल असलेल्या अपेक्षा कळून आल्या. तिने काळजीपूर्वक बाॅक्स पुन्हा होता तसाच पॅक करुन जागेवर ठेवला.
संध्याकाळी तिघेही आल्यावर कल्पनाने तयार केलेला खमण ढोकळा त्यांच्यासमोर ठेवला व चहाची तयारी केली. चौघांनी ढोकळा व चहा फस्त केल्यावर कल्पनाने रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरु केली.
काही दिवसांनी कल्पना दोन दिवसांसाठी माहेरी गेली. किशोरला सुट्टी होती, तेव्हा बाबा बाहेर गेल्यावर किशोरने आईसमोरच तो बाॅक्स काळजीपूर्वक उघडला. दोघेही अधीरतेने कल्पनाने लिहिलेल्या चिठ्या वाचू लागले. एका चिठ्ठीत कल्पनाने किशोर कधी कधी सिगारेट ओढतो, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. बाहेर जाताना टापटीपपणा नसतो, रोजच्या दाढीला तो आळस करतो असं लिहिलं होतं. अशा त्याच्याबद्दलच्या अनेक अपेक्षा तिनं लिहिलेल्या होत्या. आईच्या बाबतीत त्यांना असलेली मिश्रीची सवय त्यांनी कमी करुन काही महिन्यांनंतर सोडून द्यावी, असं लिहिलं होतं. त्यांनी रोज सकाळी बाहेर फिरायला जावं अशी अपेक्षा लिहिली होती. आईंनी तिच्या अपेक्षा पूर्ण करायची मनोमन तयारी केली व किशोरने बाॅक्स पुन्हा व्यवस्थित चिकटवून जागेवर ठेवला.
एका रविवारी कल्पना, किशोर व आईसोबत देवदर्शनाला बाहेर गेली. बाबा घरात एकटेच होते. त्यांनी तो बाॅक्स उघडला व आपल्याबद्दल प्रत्येकाचे काय मत आहे ते वाचू लागले. बाबांच्या बाबतीत कुणाचीच तक्रार नव्हती. ते पहिल्यापासून आजपर्यंत सर्वांशी प्रेमाने वागले होते. कधी वादाचा प्रसंग येऊ दिला नाही. त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. त्यांनी तो बाॅक्स पुन्हा चिकटवून होता त्या ठिकाणी ठेवला.
काही दिवसांतच घरातलं वातावरण बदलून गेलं. कल्पनाने काटेकोरपणे कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही, कुणी दुखावलं जाणार नाही याची काळजी घेण्यास सुरुवात केली. किशोर रोज दाढी करुनच, टापटीपमध्ये आॅफिसला जाऊ लागला. आईने टूथपेस्ट वापरायला सुरुवात केली. रोज सकाळी त्या माॅर्निंग वाॅकला जाऊ लागल्या. प्रत्येकाने एकमेकांची मर्जी सांभाळल्यामुळे नाराजीचे कारणच उरले नाही.
किशोर व त्याच्या आई बाबांना, कल्पनामध्ये झालेला हा बदल सुखावीत होता. कल्पनाला बदललेला किशोर आता अधिक आवडू लागला. आता चौघेही एकमेकांना कसे खूष ठेवता येईल, यासाठी मनापासून धडपडत होते आणि या ‘सुखी कुटुंबा’चे रहस्य, फक्त कल्पनेच्या ‘आयडिया’लाच जात होते…..
– सुरेश नावडकर
१८-२-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.
Leave a Reply