नवीन लेखन...

कोकणातील पारंपरिक पद्धतीने बांधलेली घरे

कोकणात घरांच्या रचनेमागे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथले वातावरण, जेव्हढे ऊन तेवढाच पाऊस. ओल्या दमट आणि गरम हवामानामुळे घरांमध्ये नैसर्गिक गोष्टींचा पारंपारिक पद्धतीने वापर केला जातो. पावसामुळे घरांमध्ये महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण बदल म्हणजे उतरत्या कौलांची घरे. या मातीच्या कौलांमुळे धुवांधार पावसाच्या पाण्यापासून संरक्षण होते आणि कडक उन्हाळ्यात देखील घरातील हवा थंड राहते.


अरबी समुद्राला लागून असलेला सह्याद्री पर्वत आणि पर्वत रांगांमधील  सुंदर घाट आणि निळा समुद्र ही कोकणाची ओळख. तिथले किल्ले-गड, प्राचीन मंदिरे, जुनी पिढीजात घरे, हिरवीगार शेती, नारळी-पोफळीच्या बागा ही निसर्गशोभा काही औरच, सृष्टिदेवीने तर या भूमीवर अनुपम सौंदर्याची, अनंत हस्ते उधळण केली आहे. कोकण म्हणजे महाराष्ट्राचे नंदनवन. येथील डोंगर दऱ्यांत निसर्गाने आपले बहुविध सौंदर्य भरभरून ओतले आहे. सर्वात जास्त पावसाचे प्रमाण असलेला  भूभाग म्हणूनही कोकण ओळखले जाते. या भागातील तापमान दमट तसेच समशीतोष्ण असते.

कोकणात पूर्वेकडून पश्चिमेकडे येताना किल्ल्यांपासून वाड्यांपर्यंत संरचनेत खास वैशिष्ट्य पहावयास मिळतात. कोकणात घरांच्या रचनेमागे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथले वातावरण, जेव्हढे ऊन तेवढाच पाऊस. ओल्या दमट आणि गरम हवामानामुळे घरांमध्ये नैसर्गिक गोष्टींचा पारंपारिक पद्धतीने वापर केला जातो. पावसामुळे घरांमध्ये महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण बदल म्हणजे उतरत्या कौलांची घरे. या मातीच्या कौलांमुळे धुवांधार पावसाच्या पाण्यापासून संरक्षण होते आणि कडक उन्हाळ्यात देखील घरातील हवा थंड राहते. जिथे जे पिकते ते खावे आणि जे सहज मिळते ते वापरावे, ह्या विचारांमुळे  आपल्या पूर्वजांनी चौथरा व भिंती म्हणून ठाणे, रायगड जिल्ह्यात मिळणारा काळा दगड आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळणारा चिरा मातीचा लाल रंगाचा जांभा दगड वापरला. मातीची घरे बांधली.  कोकणवासीय स्थानिक लाकडांच्या फळ्यांवर माती लिंपतात, जमिनी व भिंती शेणाने सारवतात.

घराच्या रचनेप्रमाणे आपल्याला एक प्रकारची घरे कोकणात पहावयास मिळतात. त्या रचनेनुसार, बाहेरूनच आकर्षित करणारा पुढचा भाग म्हणजे घराचे अंगण. या अंगणात असते सुंदरसे, नक्षीदार, रंगीबेरंगी तुळशी वृंदावन. या तुळशी वृंदावनात, तिन्ही सांजेला घरातली लक्ष्मी निरांजन व फुले वाहते, हे दृश्य प्रत्येकाच्या दारोदारी दिसते. अंगण नेहमी शेणाने सारवलेले असते, त्यावर सुंदरशी रांगोळी, घराच्या दरवाजांना भाताचे लोंब्याचे तोरण, हे घर सजवण्याचे साधन. अंगणात चार किंवा सहा मेढी लावून करतात तो मांडव, म्हणजे माटव. शिवणीचे लाकूड त्यावर कोकणात मोठ्या प्रमाणात आढळणारा बांबू, तो सरळ वा आडवा टाकतात. सुगीच्या काळ आला की, भाताच्या पेंढ्या मांडवावर टाकतात आणि माटव तयार होतो. अंगणाचे महत्त्व म्हणजे लग्न, मुंज व तत्सम समारंभ ह्या माटवाखाली होत असतात. अंगणातून घरात जाताना 2-3 पायऱ्या चढून लागतो तो व्हरांडा किंवा ओटी. व्हरांडा हा एक-दोन फूट उंच असतो. काही घरांमध्ये गरजेनुसार इथे गाय-गुरं ठेवण्याची जागा असते. तर काही घरांमध्ये सुंदर मोठे लाकडाचे झोपाळे असतात. बसायला सिमेंटचे ओटे असतात. पुरुष मंडळी या ओट्यांवर बसून गप्पा मारतात.

बहुतेक घरांमध्ये, माजघरात जाण्याच्या दरवाजावर वा दोन्ही बाजूंच्या भिंतीवर दहा-बारा देवांचे नि मागच्या पिढ्यांचे फोटो टांगलेले आढळतात. घरात जाण्याची ही वाट असते. याचा वापर म्हणजे उन्हाळी वातावरणात, बसायच्या खोलीत हवा येण्यासाठी अधिक ती थंड व्हावी म्हणून त्यानुसार त्याची जागा अशाप्रकारे असते. तसेच पावसाळ्यात घरातील आतली खोली पावसापासून बचावते. व्हरांड्यात भिंत ही एका  बाजूला आणि जिथे पायऱ्या त्या बाजूला लाकडी खांब असतात. या रचनेमुळे हवा ही थंड होऊन आत येते. हवा थंड करण्याचे काम अंगणामध्ये सारवलेले शेणही करते. सारवलेल्या शेणामुळे सूर्याची येणारी उष्णता ही शोषून घेतली जाते व हवा थंड वाहू लागते. ज्याला आपण वायुविजन म्हणतो. घरामध्ये मध्यभागी असलेले असे सगळ्यात महत्त्वाचे व जास्त वापरले जाणारे असे माजघर. ही घरातली सर्वात मोठी खोली. इथून एका बाजूला, माळ्यावर जायला लाकडी जिना किंवा शिडी असते, बसायची जागा असते मात्र माजघरात जाण्याचा दरवाजा व त्याच्या मागे पडवीत जाण्याचे दार हे एका रांगेत असतात. या माजघरात एक किंवा दोन भिंतीतील कपाटे (याला फडताळे असे म्हणतात). भिंतीत दोन-तीन ठिकाणी छोट्या त्रिकोनी वा उभट पोट-कपाटं असतात, त्यात कंदील, समया ठेवत असत. याला आपण घरातील येण्या-जाण्याचा मुख्य रेखा म्हणू शकतो. घरातील बाकी खोलींची ठेवण ही या रेघेवर अवलंबून असते. गरजेनुसार फरक केलेलेही असतात. तरी या रेघेमुळे ही सर्व दारे एक प्रकारची वाटतात. यानुसार पाहिल्यास माजघरापुढे स्वयंपाकघर असते किंवा पडवी असते. या स्वयंपाक घरात चूल असते बाजूला मोरी देखील आढळते. एक भली मोठी लाकडाची खिडकी असते. त्या खिडकीतून चुलीचा धूर बाहेर पडत असतो. पडवी मध्ये धान्य साठवणूक करण्याची जागा असते. ती माजघराच्या जवळ असल्याने पावसाळ्यात सुरक्षित रहाते. माळ्यावरती सुद्धा सामान ठेवण्याची-अडगळीची जागा असते. काही वेळा याचा उपयोग गरजेनुसार खोली सारखा केला जातो. पडवी मधून स्वयंपाकघर जवळ असते. यामुळे घरात दिवसभर एकटी असणारी स्त्री काहीही काम करत असताना स्वयंपाक घरात किंवा पडवीमध्ये तिला घराच्या अंगणापर्यंत सर्व काही दिसत असतं. यामुळे घरात कोण आलं-गेलं हे तिला बसल्या बसल्या समजते. स्वयंपाकघरामागे वाणशी हे जेवणाचे सामान, भांडी-कुंडी, पाटा-वरवंटा, जातं, सुप-रोवळी आणि लाकूडफाटा ठेवण्यासाठी जागा असते. काही वेळा वाणसीत पायऱ्या उतरून जावे लागते. त्या पुढे परसदार असते. या परसदारात आंघोळ करायची सोय असते. या मोरीत बसायला दगडी पाट असतो. या आंघोळीच्या पाण्यावर वाढणारी अळू, केळी, फुलझाडे, आढळतातच.

झाडे लावणे, सारवणे व परसदार ह्याची जागा घराच्या मधल्या रेषेमध्ये येणारे. हे सगळं पाहुण्यांना फिरता येऊ शकते. पण रहाण्याच्या खोल्या ह्या माजघराच्या आजूबाजूला बनविल्या जातात. त्यामुळे येण्या-जाण्याच्या वाटेत कोणत्याही खोल्या येत नाहीत. तसेच माजघराच्या डाव्या बाजूला गणपतीची पूजा खोली किंवा देवघर असते. खोलीची रचना ही चौकोनी किंवा आयताकृती असते. हे घराच्या मधल्या रेषेला धरून ग्रीडमध्ये बनविलेले असते. आयताकृती खोलीत येण्या-जाण्याची वाट सोडून चौकोन राहतो, जो वापरण्यासाठी  फार योग्य आकार मानला जातो. अशा प्रकारची रचना फक्त कोकणातच पहायला मिळते.

अशी अनेक घरे सोबत आली की त्याची वाडी बनते, आणि अनेक वाड्या मिळून एक गांव होते. दोन घरांमध्ये जी जागा सोडली जाते, त्यात कुठे खेळायची जागा, कुठे मंदिर तर कुठे झाडाखाली गप्पा मारायची जागा असते. क्लस्टर तेव्हा बनतो, जेव्हा दोन घरातील परस हा जवळ असल्यामुळे तिथे बायकांची गप्पागोष्टी व देवाण-घेवाण होते. यामुळे घर एकमेकांना बांधली जातात. काही-काही घरांमध्ये खूपच अंतर असते. काहींची शेती घराजवळच असते, तर काहींची शेती लांबवर असते. तरी गावात एकजूट पहायला मिळते. यातील मोठा फरक जो आपल्याला शहरात फ्लॅट संस्कृतीत बघायला मिळतो. म्हणजे गावात असलेली माणूसकी या घरांमुळे  की वागणुकीमुळे ते सांगता येत नाही. कोकणातली ही जुनी घरे, जुने वाडे ही आपली जुनी आठवण, आजोबांच्या गोष्टी आणि आजीच्या गप्पा या नवीन करणे योग्य नाही तर त्या जशा आहेत तशा सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. म्हणजे कोकणात जाणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याचे गाव जरी कोकणातनसले तरी त्याला माहेरी आल्यासारखे जाणवता आले पाहीजे.घरचे जेवण,  ताजी मच्छी व सुंदर जुने घर हा अनुभव घेता आला पाहीजे.

समुद्रकाठी आपलं एखादं घर असावं अशी इच्छा मनामध्ये निर्माण होते. पण निळ्याशार समुद्राचे सुख मुंबईत वा अन्य शहरात कुठे? ही बाब काही अंशी खरी असली तरी, कोकणच्या भूमीत हे स्वप्न निश्चितपणे आकारास येऊ शकते. त्यामुळे कोकणात आपले एक घर बांधायचा विचार सगळ्यांचा मनात असतो व याच कारणांनी पर्यटक कोकणाचा आस्वाद घ्यायला या कोकणात ओढले जातात. शांत व निळीशार समुद्राची किनारपट्टी, भरपूर ताजे मासे व सुंदर बनावट असलेल्या घरी दोन घास खाता आल्याची मजा काही औरच असते.

पर्णवी बांगर

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..