पहाटेच्या वेळी इन्स्पेक्टर मोहिते मिरज स्टेशन वर गाडीतून उतरले . पाटील व त्यांचा मुलगा केदार त्यांच्या गाडीची वाट पाहात प्लॅटफॉर्म वर उभेच होते . खरे तर इ . मोहित्यांना सरळ सरकारी विश्राम गृहात जाण्याची ईच्छा होती . परंतु पाटीलांच्या आग्रहाखातर सकाळच्या चहासाठी त्यांनी पाटीलांकडे जाणे कबूल केले होते . केदारने धावत जाऊन त्यांच्या हातातील बॅग घेतली व ते तिघेही केदारच्या सफारी गाडीत जाऊन बसले.पाटील व केदार बरेच आनंदी दिसत होते . त्यांच्याकडे पाहून इ . मोहितेही रिलॅक्स झालें होते . काही मिनिटातच गाडी पाटलांच्या घराच्या दरवाज्याशी येऊन उभी राहिली . गाडीतून उतरता उतरताच , गेल्या काही वर्षात पाटलांकडचा झालेला बदल मोहित्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही . छोटेसे टुमदार असलेले पाटलानंचे घर आत बऱ्यापैकी अद्यतन बंगल्यात रूपांतरित झालें होते . जुन्या स्कूटर च्या ठिकाणी नवीन सफारी दारी उभी होती . बैठकीच्या खोलीतील लाकडी खुर्च्याच्या जागी सोफा विराजमान होता . जेवणासाठी ठेवले जाणाऱ्या पाटाच्या जागी डायनिंग टेबलं उभे होते आणि मुख्य म्हणजे निरागस , आईच्या मागे मागे फिरून आईला सांभाळण्याचा प्रयत्न करणारा केदार आज धावपळ करून मोहित्यांच्या पाहुणचारा ची सोय पाहात होता . त्याला असा पाहून आणि पाटलांची बदलेली परिस्थिती पाहून मोहिते मनोमनी खुश झालें . सात वर्षांपूर्वीचे मुलीला न्याय मिळावा म्हणून दर दोन दिवसांनी रडत पोलिस चौकीत येणारे पाटील , पाटलीणबाई व केदार मोहित्यांना आठवले . साहजिकच होते , एकुलत्या एका शिकल्यासवरलेल्या मुलीचा माधवीचा खून झाला होता . तिला न्याय मिळावा म्हणून पाटील अक्षरशः जेवण खाण विसरून धडपडत होते . मुलीचं लग्न होऊन जेमतेम वर्ष झालं होत . तिचा खून होऊनही पोलिसांनी संशयाखातर सुद्धा कोणाला ताब्यात घेतले नव्हते . समोरची पार्टी जोरदार होती . कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन इन्स्पेक्टर सातपुत्यांनी पंचनामा केला होता . बराच बोभाटा झाला , इ . सातपुत्यांची रातोरात त्या चौकीवरून हकालपट्टी करण्यात आली होती , सोबत तीन हवालदारांची सुद्धा बदली झाली होती . सातपुत्यांच्या जागी इ . मोहिते आले होते आणि त्यांनी पुढील तपासासाठी कागद पत्रे हाती घेतली होती . त्यांचा अभ्यास करताच पुरावे नष्ट झाल्याचे मोहित्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नव्हता . भर दुपारी राहत्या घरात गळा कापून झालेल्या खुनाचे हत्यार सापडले नव्हते , भिंतीवर कुठेही उडालेले रक्ताचे डाग नाही , घरातील कुठल्याही वस्तूंवर माधवीशिवाय कोणाचेच finger prints नाही , नेमका बिल्डिंगचा Watchman रजेवर , CCTV कार्यरत नाही . काहीच पुरावा नाही . मोहित्यांनी डोक्याला हात लावला होता कारण मुलीला न्याय मिळवून द्या हो साहेब म्हणून काकुळतीने आर्जव करणारे आईबाप त्यांच्या नजरेसमोरून हालत नव्हते . मोहित्यांनी नव्याने तपास चालू केला . तपासाच्या कामामुळे त्यांचे पाटील कुटुंबियांना वरचेवर भेटणे होत होते . व हळूहळू त्यांची पाटील कुटुंबाशी चांगली ओळख झाली होती . काही काळात तपास बराच पुढे गेला होता बरेचसे धागेदोरे जुळत आले होत परंतु समोरची पार्टी कोर्टात केस उभीच होऊ देत नव्हती . अशातच इ . मोहित्यांची जळगावला बदली झाली व त्यांनी मिरज सोडले होते . त्यांना पाटील कुटुंबियांसाठी खूप सहानुभूती वाटत असे परंतु कोर्टाच्या मॅटर मध्ये ते काहीच करू शकत नव्हते . समोरची पार्टी जबरदस्त होती त्यांच्या समोर पाटलांचा टिकाव लागणे कठीण होते . मोहित्यांना फार वाईट वाटत असे . सरतेशेवटी सात वर्षांनंतर कोर्टात केस उभी राहणार होती ह्यावेळी काही भक्कम पुरावे मोहिते कोर्टात सादर करून पाटलांना म्हणजे माधवीला न्याय मिळवून देण्याच्या पूर्ण तयारीने मिरजला पोहचले होते . काही वेळ गप्पा झाल्या , चहा पाणी झाले , इ . मोहिते सरकारी विश्राम गृहासाठी निघाले . निघण्यापूर्वी त्यांनी विषय काढला व कोर्टात आपण कसा stand घ्यायचा ह्याची चर्चा करायला सुरुवात केली . इतका वेळ कुठेही न दिसलेल्या पाटलीण बाई दाराआड येऊन उभ्या राहिलेल्या मोहित्यांनी पहिल्या . त्यांना पाहन पाटील थोडे गोंधळले . केदार ही गोरामोरा झाला . मोहित्यांच्या पोलिसी नजरेने हे सगळे पटकन हेरले . मोहिते म्हणाले , पाटील काय आहे ? त्या लोकांनी तुम्हाला पुन्हा धमकाविले की काय ? ते इथे आले होते ? पोलिसांना तुम्ही कळवले की नाही ? पाटील हळू आवाजात म्हणाले , तसे नाही साहेब . पण काय आहे ना की … पाटील अडखळले . केदार ने त्यांचे संभाषण पुढे नेले , साहेब आम्ही झालें गेले विसरून जायचे ठरीवले आहे . काय आहे भावजी आणि त्यांचे वडील आले होते . त्याला मध्येच थांबवत पाटील म्हणाले , साहेब , माधवी तर गेली . आमचं नुकसान होऊन गेल , ती काही परत येणार नाही . जावईबापू आणि त्यांच्या वडिलांनी केदारची आणि घराची जबाबदारी उचलली आहे . केदारला ही छोटीसी factory त्यांनीच घालून दिली इतरही बऱ्याच गोष्टी केल्या . बोलल्याप्रमाणे बराच व्यवहार त्यांनी पूर्ण केला . त्यामुळे आम्हीच कोर्टात जाऊन केस मागे घ्यायचे ठरविले . म्हणून आत्ता केस उभी राहिली आहे . आपण हा विषय इथेच संपवायचा आहे … पाटील इ . मोहित्यांसमोर हात जोडून उभे होते . पाटलीण बाईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते . केदार गप्प उभा होता .. वा पाटील , मुलीच्या जिवाची किती बोली लावलीत ? छान व्यवहार केलात . असे म्हणून इ . मोहिते ताड्कन पाटलांच्या घराबाहेर पडले . केदार घाईघाईने गाडी घेऊन त्यांच्या समोर उभा राहिला . त्याच्याकडे न बघता मोहित्यांनी रिक्षा थांबिवली . रिक्षात बसता बसता त्यांनी पाटलांच्या घराकडे नजर टाकली . घरातील सर्व बदलांचे कारण त्यांच्या लक्षात आले होते.
पुन्हा एकदा कायद्यातील पळवाटा आणि न्यायालयात होणाऱ्या विलंबाने अजून एका माधवीचा बळी घेतला होता … न जाणे अशी अजून किती जीवांची बोली लागेल ? … अजून असे किती व्यवहार होतील ? ….. मोहित्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले ………..
–सौ वैजयंती गुप्ते
गांधीनगर (गुजरात)
मो . ९६३८३९३७७९
(उत्कर्षवृत्त चां.का.प्रभु सभेचे मुखपत्र या मासिकातून प्रकाशित)
Leave a Reply