भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 5 वर्षांनी , म्हणजे 1952 च्या सुमारास सी . एस . आय . आर . या संस्थेने एक समिती नेमली पंचांग सुधारणा समितो असे या समितीचे नाव होते . या समितीचे अध्यक्ष डॉ . मेघनाद साहा हे होते . डॉ . मेघनाद साहा भौतिकशास्त्रज्ञ तर होते परंतु ते काही काळ लोकसभेचे खासदारही होते . पंचांगसुधारणा समितीने आपल्या देशासाठी एक कॅलेंडर सुचवावे असे या समितीला सांगण्यात आले होते .
कालगणनेच्या बाबतीत भारतात खूपच विविधता आहे . काही पद्धतीत चांद्रमहिने विचारात घेतात . या महिन्यांची सुरुवातही कोणी पौर्णिमेला करतात तर कोणी अमावस्येला करतात . काही प्रांतात सौर महिने विचारात घेतात . आपले सणवार , धार्मिक उत्सव विशिष्ट तिथीला असतात , म्हणजेच ते चंद्रभ्रमणावर अवलंबून असतात . तिथी आणि महिन्याशी सणांची बांधीलकी असते . उदा . विजयादशमी म्हणजे दसरा . त्या दिवशी आश्विन शुद्ध दशमी तिथीच असली पाहिजे . तर गोकुळाष्टमी म्हणजे श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीच असायला हवी .
महिन्यांची कालगणना चंद्रभ्रमणावरून केली तर 12 महिन्यांचे वर्ष संपल्यावर होणाऱ्या एकूण दिवसांची संख्या 354 होते . यामुळे चांद्रवर्षाचा ऋतूशी मेळ राहत नाही . ऋतू हे सूर्यभ्रमणावर अवलंबून आहेत आणि म्हणूनच सूर्याचे वार्षिक भ्रमण विचारात घेणारे कॅलेंडर व्यवहारात सोयीचे पडते . आपले दैनंदिन व्यवहार दिवस व रात्र यांच्या अनुषंगाने घडत असल्यामुळे सरासरी 24 तासांचा दिवस ही कल्पना सोयीची होते . जानेवारी ते डिसेंबर हे सध्या प्रचारात असलेले कॅलेंडर सौर कॅलेंडरच आहे . धार्मिक सण आणि उत्सव इत्यादींसाठी आपण चंद्राचे कॅलेंडर विचारात घेत असलो , तरी दैनंदिन व्यवहारात आपण सूर्याचेच कॅलेंडर वापरतो.
राष्ट्रीय कॅलेंडर
डॉ . मेघनाद साहा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने वरील गोष्टींचा विचार करून सौर कॅलेंडरच सुचविले आहे . मात्र ते जानेवारी ते डिसेंबर अशा बारा महिन्यांचे नाही . त्यातील महिन्यांची नावे , वर्षारंभाचा दिवस इत्यादी गोष्टी वेगळ्या आहेत आणि ते वेगळेपण का व कसे ते आपण पाहणार आहोत . राष्ट्रीय कॅलेंडरच्या 12 महिन्यांची नावे चैत्र ते फाल्गुन अशाच क्रमाने आहेत ; फक्त मार्गशीर्ष महिन्याचे नाव ‘ अग्रहायण ‘ असे आहे .
राष्ट्रीय कॅलेंडरचा वर्षाचा पहिला दिवस ( लीप वर्ष सोडून ) 22 मार्च हा असतो . या तारखेला राष्ट्रीय कॅलेंडर 1 चैत्र या नावाने संबोधते . राष्ट्रीय कॅलेंडरचे वैशाखपासूनचे महिने पुढील तारखांना सुरू होतात . वैशाख ( 21 एप्रिल ) , ज्येष्ठ ( 22 मे ) , आषाढ ( 22 जून ) , श्रावण ( 23 जुलै ) , भाद्रपद ( 23 ऑगस्ट ) , आश्विन ( 23 सप्टेंबर ) , कार्तिक ( 23 ऑक्टोबर ) , अग्रहायण ( 22 नोव्हेंबर ) , पौष ( 22 डिसेंबर ) , माघ ( 21 जानेवारी ) , फाल्गुन ( 20 फेब्रुवारी )
वर्षाचा क्रमांक शालिवाहन शकाप्रमाणे घेतात . या महिन्यांचे दिवस एक आड एक 30 किंवा 31 असे घेत नाहीत . वैशाख ते भाद्रपद या सलग 5 महिन्यांचे दिवस प्रत्येकी 31 असून उरलेल्या 7 महिन्यांचे दिवस प्रत्येकी 30 घेतात . अशा तऱ्हेने 365 दिवसांचे वर्ष पूर्ण होते .
सूर्य उत्तर गोलार्धात असण्याचा काळ त्याच्या दक्षिण गोलार्धातील कालावधीपेक्षा थोडा जास्त आहे , त्यामुळे वैशाख ते भाद्रपद या सलग महिन्यांचे दिवस प्रत्येकी 31 घेण्याची शिफारस समितीने केली .
जे इंग्रजी वर्ष लीप वर्ष असते त्या वर्षी सुरू होणारे राष्ट्रीय कॅलेंडरचे वर्षही लीप वर्ष घेतात . मात्र त्या वर्षी चैत्र महिन्याचेही 31 दिवस घेतात आणि अशा लीप वर्षाची सुरुवात 22 मार्चला न होता 21 मार्च रोजी करतात .
राष्ट्रीय कॅलेंडरची शास्त्रीय बैठक
वरील विवेचनावरून राष्ट्रीय कॅलेंडरची वैशिष्ट्ये आणि त्याची शास्त्रीय बैठक आपल्या लक्षात येईल. राष्ट्रीय कॅलेंडरच्या चैत्र , आषाढ , आश्विन आणि पौष या महिन्यांची सुरुवात सूर्याच्या स्थानांशी निगडित आहे . चैत्र आणि आश्विन महिन्यांच्या सुरुवातीस ( अनुक्रमे 22 मार्च आणि 23 सप्टेंबर ) सूर्य वैषुविकवृत्तावर असतो . दिवस आणि रात्र समान असतात . आषाढ महिन्याच्या 1 तारखेपासून ( 22 जून ) दक्षिणायन सुरू होते , तर पौष महिन्याची सुरुवात म्हणजे उत्तरायणाचीही सुरुवात असते ( 22 डिसेंबर ) . इंग्रजी महिन्यांची सुरुवात सूर्याच्या अशा विशिष्ट स्थानांशी निगडित नाही. वैशाख ते भाद्रपद या महिन्यांचे प्रत्येकी 31 दिवस घेण्यामागील भूमिकाही आपण पाहिली राष्ट्रीय कॅलेंडरचे वर्ष 22 मार्चला सुरू होत असल्यामुळे ते आर्थिक वर्षाशीही जुळते आहे हा त्याचा व्यावहारिक फायदाही आहे .
राष्ट्रीय कॅलेंडरची भारतीय नागरिकांकडून उपेक्षा
राष्ट्रीय कॅलेंडर 22 मार्च , 1957 या दिवसापासून भारत सरकारने अधिकृतपणे स्वीकारले हा दिवस राष्ट्रीय कॅलेंडरप्रमाणे १ चैत्र 1879 असा होता . तेथपासून आजतागायत हे कॅलेंडर शासकीय स्तरावर अस्तित्वात आहे . वर्तमानपत्रांमध्ये आजचे पंचांग या नावाखाली जी माहिती येते , त्यामध्ये या तारखेचा उल्लेख असतो . म्हणजे या कॅलेंडरच्या स्वीकृतीला आणि वापरला 35 वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेला . सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन व्यवहारात लोकांकडून हे कॅलेंडर वापरले जात नाही , त्यांनी ते स्वीकारले नाही , ही वस्तुस्थिती आहे . कित्येक लोकांना तर असे काही कॅलेंडर आहे हे माहीतच नाही . हे भारताचे अधिकृत कॅलेंडर असून सरकारी पातळीवर ( अजूनतरी ) ते वापरले जाते याचे लोकांना आश्चर्यच वाटते . राष्ट्रीय कॅलेंडरची ही दुर्दशा नव्हे का ? राष्ट्रीय कॅलेंडर समाजात अजूनही रुजू शकते . शासन आणि समाज यांची इच्छाशक्ती तशी असायला हवी.
राष्ट्रीय कॅलेंडर दैनंदिन जीवनात वापरले जायला हवे असेल . तर पुढील गोष्टी करता येतील. कार्यालयीन पगारपत्रके राष्ट्रीय कॅलेंडरच्या महिन्यांप्रमाणे तयार करावीत. उदा. चैत्र पेड इन वैशाख वैशाख पेड इन ज्येष्ठ याप्रमाणे पगार मिळाला म्हणजे आपोआपच हे कॅलेंडर गरजेचे होईल.
जानेवारी महिन्यात जेव्हा नवीन दिनदर्शिका येतात तेव्हा त्यातील भारतीय महिने व तारखा ठळक छापण्याची सक्ती करावी. इंग्रजी तारखा व महिने बारीक अक्षरात छापावेत. संक्रमण अवस्थेच्या एक दोन वर्षांत हे करावे लागेल. नंतर चैत्र, वैशाख असेच महिने असलेल्या दिनदर्शिका निघू लागतील.
केंद्र सरकारने रेल्वेचे तसेच सर्वसामान्य अंदाजपत्रक सादर करताना या तारखांचा उल्लेख करून ते सादर करावे. काही बँका, संस्था, कंपन्या आपली स्वतः ची दिनदर्शिका छापतात. त्यांनी राष्ट्रीय कालगणनेप्रमाणे दिनदर्शिका काढाव्यात. चेकवर किंवा अन्य ठिकाणी राष्ट्रीय कॅलेंडरची तारीख लिहून व्यक्तिगत पातळीवर या कॅलेंडरच्या अंमलबजावणीस सुरुवात करावी. राष्ट्रीय कॅलेंडर अमलात यावे असे ज्यांना वाटते, अशा लोकांनी इतरांचे याबाबत प्रबोधन करावे. आपल्या भागातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांच्याशी याबाबत चर्चा करावी आणि राष्ट्रीय कॅलेंडरचा प्रश्न शासकीय स्तरावर उपस्थित करण्यास सांगावे. राष्ट्रीय कॅलेंडर दैनंदिन जीवनात वापरात येण्यासाठी अशी मनोभूमिका तयार होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय कॅलेंडरबाबत सर्व पातळ्यांवर एवढे औदासिन्य असल्यामुळेच राष्ट्रीय कॅलेंडरच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. धार्मिक गोष्टी, सण, वार इ. गोष्टी प्रत्येक जण आपापल्या धर्माप्रमाणे आणि पंचांगाप्रमाणे साजरे करू शकतील. राष्ट्रीय कॅलेंडरमुळे या गोष्टींना बाधा येणार नाही.
राष्ट्रीय कॅलेंडर आणि इंग्रजी कॅलेंडर या दोन्ही तारखांचा निश्चित संबंध असल्यामुळे त्यांचे एकमेकांत रुपांतरण सहज शक्य आहे. थोडक्यात शास्त्रीय पायावर आधारलेले राष्ट्रीय कॅलेंडर आपल्या व्यवहारात आणणे राष्ट्रीय अस्मितेला धरून आहे. उशीर झाला असला,
तरी ही चूक सुधारता येईल. त्यासाठी कटिबद्ध होऊ या. –
–हेमंत मोने
गोकुळ विहार, बिल्डिंग 3, ब्लॉक 4, जेल रोड,
कोळिवली, कल्याण (पश्चिम) 421301.
Leave a Reply