नवीन लेखन...

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग १

सिंहगड ते रायगड – ट्रेक भाग -१

{काही वर्षांपूर्वी युथ होस्टेल पुणे शाखा सिंहगड ते रायगड अशी शिवदुर्ग दर्शन साहस सहल आयोजित करीत असे. पुण्यातून रोज ३० जणांची तुकडी निघायची ती सर्व भ्रमण पूर्ण करून दहा दिवसांनी परत येत असे. त्या काळात हा ट्रेक खूप प्रसिद्ध होता. मात्र ही सहल सोपी नव्हती. सह्याद्रीच्या दुर्गम वाटा,टेंट मधे वास्तव्य,रोजचे भरपूर चालणे, स्वतःचे सामान स्वतः पाठीवर वाहणे आणि खाण्या पिण्याच्या आवडी निवडी नसणे ह्या सगळ्याची शारीरिक आणि मानसिक तयारी आवश्यक होती. मुदतीचा ताप, कौलरा आदी प्रतिबंधक लस घेतल्याचे तसेच डॉक्टरचे फिटनेस सर्टिफिकेट द्यावे लागायचे. साधारणपणे दरवर्षी ३०० जणांना संधी मिळत असे. मला माझ्या मित्रांकडून या सहलीबद्दल समजल्यावर मी हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला.हा मी केलेला पहिला ट्रेक, त्यावेळी या ट्रेक बद्दल लिहायचे मनात होते पण काही कारणाने राहून गेले होते. आजच्या काळात ट्रेक आयोजित करणाऱ्या अनेक संस्था आहेत, ट्रेकला जाण्याचे प्रमाण युवकांमधे वाढताना दिसत आहे. मात्र मी हा ट्रेक केला तेव्हाची स्थिती निराळी होती. तेव्हा काही किल्ले भटकायची आवड असणारी मंडळी या वाटेला जायची. युथ होस्टेल आयोजित हा टेक त्या काळात खूप प्रसिद्ध होता. दहा दिवसाच्या या ट्रेकचे वर्णन तीन भागात देत आहे. }

पुणे  बेस कॅम्प…. सिंहगड …. विंझर …ते  राजगड.

या सहलीचा बेस कॅम्प पुण्यातील टिळक रोडला जवळ असणाऱ्या स्काऊट ग्राउंड वर होता. मी कल्याण इथे राहत होतो त्यामुळे सकाळी लवकर निघून मी बेस कॅम्प वर दुपारी बारा वाजता पोचलो आणि रजिस्ट्रेशनच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केली. ट्रेक साठी ज्या सूचना दिल्या होत्या म्हणजे  डॉक्टर प्रमाणपत्रे, हंटिंग शूज, सैक, पाण्याची बॉटल, खाण्यासाठी डिश, पाणी पिण्यासाठी ग्लास अशी सर्व तयारी मी केली होती. बेस कॅम्प वर आपल्या जवळ असलेले पैसे, जादा कपडे, मौल्यवान वस्तू लौकर मधे ठेवण्याची सोय युथ होस्टेलने दिली होती. कारण गड किल्ले आणि जंगलातून भटकताना याची आवश्यकता भासणार नव्हती.

रजिस्ट्रेशन झाल्यावर मी जेवणासाठी रांग लावली. प्रत्येकजण आपली डिश घेऊन रांगेत उभा होता. अत्यंत शिस्तबद्ध अशी सर्व व्यवस्था होती. जेवण झाल्यावर थोडावेळ आराम केल्यावर आम्ही सर्व तीस जण एका दालनात जमलो.आमची तुकडी  नंबर ३ होती. आमच्या आधी २ तुकड्या पुणा बेस कॅम्पवरून ट्रेकसाठी रवाना झालाय होत्या. साधारण ३ वाजता पुणे युथ होस्टेलचे पदाधिकारी श्री विवेक देशपांडे त्यांनी सर्व दहा दिवसांचा कार्यक्रम अत्यंत विस्तृत पणे सांगितला. ट्रेक मधे कोणत्या काळज्या घ्यायला पाहिजे याविषयी सांगितले. तसेच सभासदांचे शंका निरसन केले. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता दुर्ग प्रेमी प्र. के. घाणेकर यांचा संपूर्ण भ्रमण मार्ग दाखवणारा  अतिशय सुंदर असा स्लाईड शो झाला. तो पाहिल्यवर हे सर्व पाहायला, अनुभवायला जाव अशी उत्सुकता सर्वच सभासदांच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर रात्री जेवण आणि कॅम्प फायर असा कार्यक्रम होता. कॅम्प फायर मधे आम्ही एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या. आम्ही या बैच मधे एकंदर २९ जण होतो. १९ मुल आणि १० मुली.  श्री रानडे आणि श्री देवळे असे आमचे दोन बैच लीडर होते.

कॅम्प फायर नंतर सर्वजण आप आपल्या टेंटमधे परतलो.  बरोबर रात्री दहा वाजता टेंट मधील लाईट बंद झाले. आता उद्यापासून खरा ट्रेक प्रारंभ होणार होता. पुण्याच्या बोचऱ्या थंडीत टेंटमधे झोपायचा माझा पहिलाच अनुभव होता. मी झोपलो होतो त्याच्या बरोबर वरती टेंटला एक भोक होते. त्यामधून येणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यांनी अंगात स्वेटर आणि पायात शूज असूनही मला थंडी जाणवत होती आणि मी रात्रभर तसा जागाच होतो. थंडीचा कडाका असह्य झाल्याने जाऊंदे तो ट्रेक आपण बेस कॅम्प वरूनच परत जावं अस विचार देखील मनाला स्पर्शून गेला. रात्री  साधारण एक दोन तास झोप झाली असेल.

 बरोबर सकाळी चार वाजता बेस कॅम्पचे कॅम्प लीडर चहाची किटली घेऊन सर्वाना बेड टी देण्यासाठी आले. कडाक्याच्या धंडीत तो बेड टी सर्वांनाच सुखावून गेला. बेड टी घेतल्यावर सर्वजण आपल्या तयारीला लागले. तयार झाल्यावर सर्वाना ब्रेड अंडे असा नाश्ता मिळाला आणि वरती गरमा गरम चहा झाला. त्यानंतर सर्वाना पैक लंच मिळाले आणि आम्ही सर्व जण आपआपल्या सैक  पाठीला अडकवून आणि वाटरबैग घेऊन सज्ज झालो. ‘हर हर महादेव’ असा जय जयकार करून आम्ही बेस कॅम्प सोडला आणि पीएमटी च्या बसने सिंहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या डोणजे गावात आलो.

इथून आम्ही गड चढायला प्रारंभ केला. आता आमच्या ग्रुपचे चालण्याच्या वेगाप्रमाणे ग्रुप पडले. थोडावेळ सपाट रस्त्यावरून चालल्यावर चढ लागला.दोन्ही बाजूला झाडी होती. मातीचा दगडांचा दमवणारा चढाचा रस्ता त्यामुळे आता थंडी कुठल्या कुठे पळली. अंगातले स्वेटर निघाले. आता गड चढताना श्रम जाणवत होते. वाट पण अगदी सोपी नव्हती. पण साधारण एक दीड तासात आम्ही गडाच्या पुणे दरवाजात पोचलो. तिथे ताक पिवून श्रम परिहार झाला. आमच्यातील स्लो वौकर्स अजुन गडावर आले नव्हते. अनेकजण प्रथमच सह्याद्री अनुभवत होते. त्यानंतर आम्ही साधारण साडेआठ वाजता सिंहगडावर पोचलो. बरोबर ९ वाजता आम्हाला प्रस्तारोहाणाची विविध प्रात्याक्षिके पाहायला मिळाली त्यानंतर सिंहगडचे कॅम्प लीडर श्री पाटील यांनी आम्हाला सिंहगड दाखवला आणि माहिती पण सांगितली.

समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची ४४०० फुट आहे. शिवकाळातील हा महत्वाचा किल्ला होता. तानाजी मालुसरे याच नाव  या किल्ल्याशी जोडलं गेल आहे ते त्याच्या अभूतपूर्व  पराक्रमामुळे आणि बलिदानामुळे. गडावर त्यांचं स्मारक बांधलेले आहे. या खेरीज राजाराम महाराज याचं स्मारक, कोण्दाणेश्वर मंदिर,अमृतेश्वर मंदिर, तानाजी कडा, घोड्याच्या पागा, देवटाके. टिळक यांचा बंगला (तिथे गांधीजी व टिळक यांची भेट झाली होती) अशी अनेक स्थळे आम्ही पाहिली. या किल्ल्याला कोंडाणा असे पण नाव होते. सिंहगडावरून राजगड, तोरणा, लोहगड, पुरंदर आदी किल्ले दिसतात.

गड पाहुन झाल्यावर देवटाके परिसरात साधारण १२ वाजता आम्ही बरोबर आणलेल्या पैक लंचचा आस्वाद घ्यायला सुरवात केली. जेवण आणि जोडीला देवटाक्याचे मधुर थंडगार पाणी याचा आस्वाद घेतल्यावर एक डुलकी काढावी अस मोह झाला पण पुढे विंझर गाठायचे होते. त्यामुळे थोडावेळ बसूनच गप्पगोष्टी केल्या आणि साधारण एकच्या सुमारास गडाच्या कल्याण दरवाजाने गड उतरून विंझरच्या वाटेला लागलो. सिंहगड ते विंझर हे अंतर अंदाजे २८ किलोमीटर आहे आणि आम्हाला ते डोंगर दरयातून गाठायचे होते. पाठीवरील सैकचे ओझे आता जाणवत होते. डोंगर सोंडेवरून आम्ही चालत होतो. दुतर्फा खोल दऱ्या होत्या. अधून मधुन छोट्या दगडांची घसरडी वाट लागत होती. तिथे पाठीवर सैक आणि हातात वाटरबैग घेऊन चालताना कसोटी लागत होती. एक डोंगर चढून जाऊ तर थोडी उतरण लागून दुसरा डोंगर तयार असायचा असे किती डोंगर चढलो उतरलो ते नक्की आठवत नाही. अखेर साधारण तीन चार तासानंतर एक सपाटी लागली तिथे आम्हाला स्वागत करायला विंझर कॅम्पचे लीडर लोखंडे आले होते. त्या सपाटीवर आम्ही थोडं विसावलो, आमच्यातील काही शिलेदार मागे राहिले होते. अर्थात एक ग्रुप लीडर रानडे त्यांच्या बरोबर होते. साधारण अर्धा तास वाट पाहुन आम्ही चालायला सुरवात केली. विंझर गावात  एका शाळेत आमची राहण्याची सोय केली होती. विंझर हे छोटस खेड.आमचा मुक्काम ठिकाण गाठायला आम्हाला बरीच तंगडतोड करावी लागली. अखेर विंझर कॅम्प आला. आम्हाला चहा मिळाला. एवढ्या परिश्रमानंतर त्याची आवश्यकता होतीच.शाळेच्या आवारात आम्ही सर्व विसावलो. शाळेच्या आवारात टेंट होते. पुण्यातून सकाळी पाच वाजता निघालो ते आम्ही संध्याकाळी साडेसहा वाजता आमच्या मुक्कामी पोचलो होतो. वाटेत आम्ही सिंहगड निरखून पाहिला होता. त्याच्या आठवणी मनात होत्या.

विंझर मधे पण थंडी चांगलीच जाणवत होती. रात्री जेवण झाले नंतर कॅम्प फायर. अजुन ओळखी वाढल्या. आमच्या मधे प्रभंजन मराठे होते त्यांनी खूप चांगली गाणी म्हटली.अजूनही रिझर्व बँकेत नोकरी करणाऱ्या मंडळींचा ग्रुप होता. सर्वच नाव आज आठवत नाहीत. कॅम्प  फायर मधे सर्वाना हॉट चोकोलेट मिळाले. दिवसभराचा श्रम परिहार झाला. रात्री दहा वाजता सर्व जण टेंट मधे परतलो. दिवसभराच्या चालीमुळे पाय चांगलेच दुखत होते. हंटिंग शूज मुळे काहीना पायांना ब्लीस्टर आले होते. उद्या आम्हाला राजगड गाठायचा होता.राजगडा विषयी खूप ऐकुन होतो. त्यामुळे त्याचा विचार करीतच अंथरुणावर अंग टाकल. झोपायची जमीन खडबडीत होती, पण आम्ही एवढे दमलो होतो की अंथरुणावर अंग टाकताच गाढ झोप लागली…………

विंझर  मधे पण थंडीचा कडाका जबरदस्त होता की थंडीने सकाळी पाच वाजताच जाग आली.   बेड टी घेऊनच दिवसाची सुरवात झाली. आता पटा पट आवरण्याची सवय झाली होती. आज आम्ही राजगडावर जाणार होतो. तिथे दोन दिवस मुक्काम राहणार होता. राजगड हा एक  बेलाग किल्ला आहे आणि त्यावर जाण्यासाठी अजूनही सोपी वाट नाही. शिवाजी महाराजांची पहिली राजधानी. त्यामुळे उत्सुकता ज्यास्तच.

आम्ही सर्व आवरून नाश्त्यासाठी तयार झालो. बरोबर ६.३० ला आमचा नाश्ता आटोपला. मग कालच्या सारखच पैक लंच मिळाला. त्यानंतर आमची तुकडी राजगड सर करायला सज्ज झाली. विंझर कॅम्प लीडर यांचा निरोप घेऊन आम्ही राजगडाची वाट चालू लागलो. विंझर गावातून शेतामधून जाणारा तो रस्ता चालायला तसा सोपा होता. गाव मागे पडल्यावर आम्ही जंगलातून जाणाऱ्या रस्त्याला लागलो. थोड्याच वेळाने आम्ही एका छोट्या नदीकाठी पोचलो. या नदीवर सर्वानी आपल्या वाटर बैग भरून घेतल्या. नदी ओलांडून आम्ही पलीकडे पोचलो. नदी ओलांडणे तसे फार कठीण नव्हते तरी पण काहीजण तिथे चांगलेच आपटले. पावसाळ्यात मात्र ही नदी ओलांडण कठीण पडेल. नदी ओलांडल्यावर परत आमची वाटचाल  पुढे सुरु झाली. आता घनदाट झाडीतून जाणारा रस्ता लागला. मात्र झाडीमुळे उन्हाचा त्रास होत नव्हता.बराच वेळ आम्ही ती वाट तुडवत होतो. थोड्या वेळाने चढाचा रस्ता लागला आणि दमछाक होऊ लागली. आम्ही मधे मधे थांबून विसावत होतो पाण्याचे घोट घेत होतो.आता आमच्या समोर राजगड दिसु लागला होता पण वाट सोपी नव्हती. थोड्या वेळाने आम्हाला राजगडावरील सुवेळा माचीवरील नेढ दिसु लागलं. आम्ही चढ चढत होतो पण   सपाटी यायला तयार नव्हती. चढ अधिक अधिक उंच होत होता. आम्ही सरळ सोट चढ चढत होतो. हा चढ जसजसे पुढे जाऊ तसा ज्यास्तच उंच आणि चिंचोळा बनत होता. कातळात असलेल्या उंच पायऱ्या चढण महणजे दिव्य होते. अगदी काटकोनात वर नेणारा तो दुर्गम मार्ग होता. सर्वांची कसोटी लागत होती. आजू बाजूला पहायची सोय नव्हती कारण  दोन्ही बाजूला दऱ्या होत्या. शेवटी चढण्याचा मार्ग खूपच दुर्गम आणि चिंचोळा झाला. इथे आधारासाठी रेलिंग आहे. ही दुर्गम अशी दमवणारी, घाबरवणारी वाट संपल्यावर आम्ही गडाच्या चोर दरवाजात पोचलो. चोर दरवाजातून आम्ही अखेर गडाच्या पद्मावती माचीत प्रवेश केला. आमच्या स्वागताला राजगडाचे कॅम्प लीडर्स होते. सकाळी सात वाजता आम्ही विंझर सोडले होते आणि आम्ही ११ वाजता राजगडावर पोचलो होतो. आमच्यातले स्लो चालणारे पण साडेअकरा वाजता गडावर आले. राजगडावरचे वातावरण मात्र एखाद्या हिलस्टेशनला लाजवेल इतके थंड  होते. अकराच्या उन्हात देखील थंडी जाणवत होती. आमच्या कार्यक्रमा नुसार आमचा राजगडावर दोन रात्री मुक्काम होता त्यामुळे साहजिकच सर्व जण रिलैक्स मूड मधे होते.

आमच्या पैकी काही जणांनी पद्मावती तलावावर धाव घेऊन अंघोळ करणे, कपडे धुणे असा आपला कार्यक्रम सुरु केला. काही क्रिकेट शौकीनांनी त्यावेळी सुरु असलेली भारत आणि वेस्टइंडीज  सामन्याची कोमेंट्री ऐकणे पसंत केले.आम्ही काही जण पद्मावती माचीवर एक छोटासा फेरफटका मारणे पसंत केले. राजगडावर आम्हाला आमच्या आधी निघालेली तुकडी नंबर २ भेटली. ओळख, गप्पागोष्टी सुरु झाल्या. आता राजगडावर आम्ही साठ सत्तर जण होतो. त्यामुळे गडाला चांगलीच जाग आली होती.

राजगडच्या कॅम्प लीडर्सची धन्य होती कारण अशा दुर्गम ठिकाणी  एवढ्या सगळ्या लोकांची जेवणाची,नाश्त्याची, चहाची सोय करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. दुपारी जेवण झाल्यावर आम्ही आमच्या टेंट मधे थोडा आराम केला. त्यानंतर चहा झाला आणि नंतर राजगडचे कॅम्प लीडर अप्पा देशपांडे यांनी आम्हा दोन्ही  तुकड्यांना पद्मावती माची दाखवली. राजगड हा मुळात अत्यंत दुर्गम असा किल्ला. शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी.शिवाजी महाराजांची ऐन उमेदीतली पंचवीस वर्षे या गडावर गेली. या गडासारखा बेलाग,बुलंद आणि बळकट असा दुसरा किल्ला नाही. शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक बऱ्या वाईट गोष्टींचा साक्षीदार. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आले ते याच किल्ल्यावर. पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी अशा तीन माच्या आणि मध्यभागी असणारा बेलाग असा बालेकिल्ला.

गडाची पद्मावती माची ही खूप विस्तीर्ण आणि सपाट आहे. पद्मावती माचीवर  आम्ही महाराजांची सदर, हवालदार यांची घरे, इतर इमारती यांचे अस्तित्व दाखवणारी ठिकाणे पाहिली. माचीवरील पद्मावती देवीचे मंदिर, बारुदखाना, सईबाई यांची समाधी अशा अनेक शिवकालीन वास्तू पाहिल्या. त्याची नीट माहिती करून घेतली. माचीवर येणारा चोर दरवाजा, तसेच पाली गावातून येणारा पाली दरवाजा  पण पाहिला. पद्मावती तलाव खूप मोठा आणि भरपूर पाणी असणारा आहे या शिवाय माचीवर अजुन तीन छोटे तलाव आहेत. महाराजांच्या प्रत्येक गडावर पाण्याची असलेली सोय त्यांचा दूरदर्शीपणा दाखवते. पद्मावती माची पाहता पाहता सूर्यास्त झाला.आता थंडी आणि जोडीला बोचरे वारे सुरु झाले. आम्ही टेंट मधे परतलो आणि गप्पा गोष्टी करू लागलो. रात्रीचे जेवण झाल्यावर दोन्ही तुकड्यांचे एकत्र कॅम्प फायर झाले. कॅम्प फायरला मजा आली दोन्ही ग्रुप मधील कलाकार मंडळीनी आपली कला दाखवली. आमच्या आधीची तुकडी दुसरे दिवशी लवकर जायचे असल्याने लवकर झोपायला गेली. आम्ही मात्र बराच वेळ जागे होतो. रात्री एक वाजेपर्यंत आमचा धुमाकूळ चालू होता. दोन दिवसाच्या सहवासाने आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो नवीन ओळखी झाल्या होत्या आणि वेगवेगळे ग्रुप पडले होते. माचीवरून आम्ही आलेला सिंहगड दूरवर दिमाखात चमकत होता. आता उद्या सुवेळा आणि संजीवनी माच्या आणि बालेकिल्ला बघण्याची उत्सुकता होती. त्याचा विचार करीतच झोपी गेलो……

दुसरे दिवशी खरं तर आम्हाला लवकर उठायची घाई नव्हती पण सवईने म्हणा तसच आमच्या आधीच्या तुकडीची जाण्याची गडबड ऐकू आल्यामुळे आम्ही तसे लवकरच उठलो. त्या तुकडीला निरोप दिला आणि चहा घेऊन आवरायला लागलो. नउ वाजता नाश्ता चहा झाल्यावर कॅम्प लीडर अप्पा देशपांडे यांच्या बरोबर आम्ही बालेकिल्ला बघायला निघालो. मुळात राजगड हा तसा दुर्गम गड त्याचा बालेकिल्ला तर अभेद्य आणि चढण्यासाठी अवघड.पद्मावती माचीवरून आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. या वाटेवर वाटेवर मधमाशांची पोळी आहेत त्यामुळे सावधगिरी घेऊन जावे लागते. पाऊलवाट संपल्या नंतर चढ लागतो. थोडा चढ चढल्यावर खोबणीत हात रेलून त्यावर शरीर उचलून वर चढावे लागते. हा चढ तसा अवघड आहे. कॅम्प लीडर्स यांच्या मार्गदर्शन लाभल्यामुळेच बालेकिल्ला चढणे शक्य झाले. कारण एका बाजूला डोंगराचा कडा तर दुसऱ्या बाजूला डोळे फिरवणारी खोल दरी. काही ठिकाणी आधारासाठी रेलिंग आहे. बालेकिल्ल्याकडे जाणारा शेवटचा टप्पा खूप अवघड आहे.जीव मुठीत धरूनच सर्वजण चढत होते आणि अखेर आम्हाला बालेकिल्ल्याच्या महादरवाजाचे दर्शन झाले. बालेकिल्ल्याचा हा  दरवाजा आजही बुलंद आणि भक्कम आणि चांगल्या स्थितीत आहे. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यावर त्याचे शीर जिजाबाईंना नजर केले होते. त्याचे दफन  त्यांनी बालेकिल्ल्याच्या दरवाजात केले होते. अर्थात ती जागा आता ओळखता येत नाही. मात्र बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर प्रथम दिसत ते जननी देवीच छोटस मंदिर. देवळच्या मागील बाजूस पाण्यान भरलेलं टाकं आहे. मंदिर पाहुन थोडं वरती गेल्यावर आमच्या अगदी डोळ्याचे पारणे फिटले.  अगदी चंद्राच्या कोरीप्रमाणे भासणारा तलाव पाहुन थक्क व्हायला होत. या खेरीज बालेकिल्ल्यावर महाराजांचा राजवाडा, सदर, कोठार आदी इमारतीच्या खुणा आजही दिसतात. शिवाय या उंच अशा ठिकाणावरून तोरणा,सिंहगड,पुरंदर,रायगड, लिंगाणा आदि अनेक किल्ले दिसतात. शिवाय गडाच्या तीनही माच्या दिसतात. अशा अवघड ठिकाणी केलेले बांधकाम हेच मुळात थक्क करणारे आहे. बालेकिल्ल्यातून निघायला मन करीत नव्हते पण शेवटी वेळेचे भान पळून आम्ही बालेकिल्ला उतरू लागलो. उतरताना पण काळजीपूर्वक उतरावे लागते. बालेकिल्ला उतरून आम्ही गडाच्या सुवेळा माचीच्या दिशेने चालायला लागलो. दोन्ही बाजूला पिवळसर गवत वारयाने डुलत होते आणि त्याच्या मधल्या पायवाटेवरून आमची तुकडी चालत होती.सुवेळा माचीच्या सुरवातीला एक खडकाळ टेकडी लागते त्याला दुबा असे म्हणतात. त्याच्या पुढे गेले की दिसतो भव्य असा झुंजार बुरुज. झुंजार बुरुजाच्या पुढे तटबंदीच्या बाजूला सुवेळा माचीवरील प्रसिद्ध नेढ आहे. काल राजगडाकडे विंझरहून  येताना दुरून अगदी छोट दिसणार हे नेढ जवळून पाहताना त्याचा प्रचंड आकार पाहून मजा वाटली. आम्ही काहीजण नेढ्यात शिरलो. भन्नाट वारा जाणवत होता. नेढ्यातून आजूबाजूला असलेल्या निसर्गाच्या मोहक रूपाचे दर्शन होते. या ठिकाणी पण माधमाशांची पोळी आहेत.

 सुवेळा माची पाहुन आम्ही १२ वाजता परत पद्मावती माचीवर आलो. आज आमच्या नंतर पुण्याहून निघालेली तुकडी यायची होती पण अद्याप ती आली नव्हती ती साधारणपणे साडेबाराच्या सुमारास आली. परत एकदा दोन तुकड्यांची गाठ पडली. गप्पागोष्टी झाल्या. एकत्र जेवण घेतले आणि नंतर टेंट मधे थोडी विश्रांती घेतली.

दुपारी चार वाजता चहा पिवून आमची तुकडी आणि आज आलेली नवीन तुकडी सर्वजण आप्पा देशपांडे यांच्या बरोबर संजीवनी माची बघायला निघालो. संजीवनी माची ही गडाची सर्वात लांब लचक अशी माची आहे. पद्मावती माचीतून संजीवनी माचीकडे जाणारी जी पाउलवाट आहे ती खरोखरच कसोटी पाहणारी आहे कारण एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला डोळे फिरवणारी खोल दरी आणि मधे जेम तेम पाउल ठेवण्यापुरती जागा. त्या वाटेवरून चालताना अत्यंत काळजीपूर्वक चालावे लागते चूक झाल्यास निसर्ग क्षमा करणार नाही.

या माचीच बांधकाम चालू असताना डोंगर फोडताना लावलेल्या सुरुंगात दोन कामगार आकाशात फेकले गेले आणि खाली पडले पण त्यांना काही जखमा पण झाल्या नाहीत. त्यांना जणु संजीवनी मिळाली म्हणुन या माचीला संजीवनी माची अस  नाव मिळालं आहे. शिवरायांच्या बांधकामाचा अत्युच्च नमुना म्हणजे या माचीच बांधकाम . ही माची तशी चिंचोळी आहे. दुहेरी वक्र नाळयुक्त तटबंदी. लांबी असेल अंदाजे साडेतीन किलोमीटर लांबीची ही माची खरोखरच अद्भुत आहे. तिच्या बांधणीत बारा बुरुज आहेत. ऐन कड्यावर उभारलेली तटबंदी त्यात कल्पकतेने ओवलेले चिलखती बुरुज त्यात उतरण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या, चोरवाटा हे सर्व बांधकाम आजच्या काळातील आर्किटेक्ट, इंजिनिअर यांना अतर्क्य वाटतात. एवढी वर्षे उन पावूस सोसत असून देखील आजही हे बांधकाम अत्यंत भक्कम आणि चांगल्या स्थितीत आढळते.संजीवनी माचीतून गडाबाहेर पडण्यासाठी एक दरवाजा आहे त्याला अळू दरवाजा असे नाव आहे. उद्या याच अळू दरवाजाने आम्हाला तोरण्याकडे जायचे होते.

 साधारण  संध्याकाळचे साडेसात वाजता संजीवनी माची पाहुन परत आम्ही पद्मावती माचीवरील आमच्या तळावर आलो. नेहेमी प्रमाणे जेवण आणि कॅम्प फायरचा कार्यक्रम झाला. आजच्या कॅम्प फायरचे विशेष म्हणजे आमच्या तुकडी मधील मिरजेच्या छोट्या महेश आपटेने म्हटलेला तानाजीने सिंहगड जिंकला त्याचा पोवाडा. त्याच्या वयाच्या मानाने त्याचे पाठांतर आवाजातील चढ उतार वाखाणण्याजोगे होते. त्याने सर्वांची वाहवा मिळवली आणि वातावरण बदलून टाकले. आम्हाला दुसरे दिवशी लवकर जायचे नसते तर कॅम्प फायर अजुन पण चालले असते. आमच्या ग्रुप लीडरने आम्हा काही जणांना एक विनंती केली की आम्ही काही जण आज बारूद खान्यात झोपावे म्हणजे आमचा टेंट नवीन तुकडीतील मुलीना देता येईल कारण त्या तुकडीत मुलींची संख्या अधिक होती. आम्ही मान्यता देऊन बारूद खान्याचा आसरा घेतला. त्या खडबडीत जागी झोपणे नक्कीच सुखावह नव्हते, पण ट्रेक मधे आपणाला अशा तडजोडी करण्याची सवय होते. आता उद्या राजगड सोडवा लागतोय याच थोडं वाईट वाटत होत पण तोरणा बघण्याची उत्सुकता पण होती त्या विचारात झोप कधी लागली ते समजलंच नाही……….

विलास गोरे
९८५०९८६९३४

Avatar
About विलास गोरे 22 Articles
मी आय डी बी आय बँकेत एन पी ए विभागात (कर्ज वसुली) व्यवस्थापक पदावर काम करतो, मला ३५ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या विविध विभागात काम करण्याचा अनुभव आहे, मी कॉमर्स पदवीधर असून कायद्याचा अभ्यास पण पूर्ण केला आहे (B, COM , L L B). मी शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करतो व शेअर मार्केट व इतर investment चा मला २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मला हिंदी चित्रपट संगीत, मराठी साहित्य, किल्ल्यांवर भटकंती तसेच इतर पर्यटन याची आवड आहे.मी काही कथा , लेख,व्यक्तिचित्रण लिहू इच्छितो.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..