कोणाला कोणच्या प्रसंगातून कोणत्या वेळी जावं लागतं ते विधिलिखित असतं.
ते टळणार नसतं. त्यांतून किती जीव मनस्तापाने होरपळून निघतात. आपण सिरीयल्स मधून,कथा कादंबर्यातून हे बघतो, वांचतो पण मी प्रत्यक्षात घडलेली घटना इथे सांगत आहे. ( पात्रांची नांव बदलली आहेत)
वैशाली ताईंच्या लग्नाचा वाढदिवस होता, संध्याकाळी बाहेर जेवायचं ठरलं होतं. मोठी मुलगी गांवातच होती, ती पण येणार होती केक घेऊन.
आंघोळ आटपून त्या पूजेला बसल्या, तितक्यात फोन खणखणला. “आई, वेळ आहे कां ऐकायला” हो हो बोल बेटा.
वैशाली ताईंना वाटलं, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पूजानी त्यांच्या धाकट्या मुलीने फोन केला असावा. “आई” तिचा आवाज थोडा रडवेला वाटला. रात्रीच तिच्याशी गोष्टी झाल्या होत्या, थोडी तुटकच बोलली होती, जेवण झालं कां असं विचारलं तर , “नाही ग इतक्यांत कसंच जेवण? आई तू झोप. मी सकाळी करते फोन” म्हणाली होती.
“आई, तूं बसून घे” पूजा म्हणाली. बराच वेळ ती बोलणार होती.
तिने सांगितलं ते वैशाली ताईंना धक्का देणारं होतं. तरी त्यांनी शांततेन एकेक गोष्ट ऐकली. “बरं मी ठेवते, मी कोर्टात जाते आहे. बघते कोणी वकील मिळाला तर. तूं अजिबात काळजी करूं नकोस. मी मॅनेज करीन. बाबांना पण ऊगीच पाठवू नकोस. त्यांच्या तब्येतीची काळजी घे” असं म्हणून तिने फोन कट केला. कशातरी रडवेल्या होत त्यांनी पूजा संपवली आणि तिच्या बाबांना सगळं सांगितलं. ते पण खूप काळजीत पडले.
पूजाचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. पहिलं नव नवलाईचं वर्ष एकमेकांचे वाढदिवस साजरे करण्यांत, हाॅटेल, आऊटींग मध्ये गेले. नंतर पूजानी तिच्याच कंपनीत पुनः जाॅब मिळवला. सासू सकाळीच डबा घेऊन शाळेत निघून जात होती. नंतरचं सगळं पूजा बघून घेत होती. सगळ्यांसाठी पोळ्या भाजी करून ती आॅफीसला जायची.
हळूहळू घरांत कुरबूर सुरू झाली. एका माणसाचा खर्च वाढला. तिचे सासरे तिच्या आॅफीसमध्ये जाऊन जाऊन पैसे मागत. वरून म्हणतं, तूला आमच्याकडे सगळं घरचं जेवण मिळतं, राहायला झोपायला जागा मिळते, फळ-दूध सगळं मिळतं तर घरभाड्या सकट तूं सगळे पैसे दे.
तिनी त्यांना ते द्यायला सूरवात केली. एका महिन्यांत प्रिमियम भरायचे होते म्हणून ती देऊ शकली नाही, तर सासरे आॅफीसमध्ये पोचले. पूजानी संध्याकाळी येतांना काढून
आणते सांगितलं. तर तिला एटीएम कार्ड मागायला लागले. ती कांही पेइंग गेस्ट नाही, जे ते एक दिवस ऊशीर झाला तर कांगावा करत होते. त्यांचा मुलगा पूजाचा नवरा बॅन्केत मॅनेजर आहे, तो तिचा खर्च चालवूं शकत होता तरी ती भीक नको ……..म्हणून पैसे पुरवत होती.
त्यांना पैसे दिले. घरी पोचल्यावर पूजाच्या कानावर नवर्याचे बोलणे पडले. बाबा, तिला कां मागतां मी देतो आहे न ? घरभाडं, किराणा, प्लाॅटचं लोन सगळं मी करतो न. आईचा पूर्ण पगार वाचतोच आहे. बाबा म्हणत होते तिचा पगार घर बांधायला लागेल.
खूप रगडा झाला त्यांवरून. सासूनी दोघांना वेगळं राहा सांगितलं. दोघं वेगळे झाले. थोडे दिवस बरे गेले. नंतर पूजाचा नवरा घरी आईकडे जाऊन जेवून यायचा. कधी न सांगता तिथेच राहून जायचा असं सुरू झालं. मग त्यावरून पूजात व तिच्या नवर्यात दोघांमध्ये वाद होऊ लागले. एक दिवस अचानक त्यानी बॅग भरली आणि चेन्नई ला जायचं आहे असं सांगून निघून गेला. सकाळी सकाळी दाराची बेल वाजली, पूजा नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. तिनी दार उघडलं तर कोर्टाचा माणूस नोटिस घेऊन दारांत ऊभा. तिच्या नवर्यानी घटस्फ़ोटाची नोटिस पाठवली होती. तिच्या ह्रदयाचा थरकांप झाला. एका रात्री भांडणं झालं होतं तेव्हां मला आतां तुझ्या बरोबर राहायचचं नाही असं म्हणाला होताच. पण खरंच असा वागेल वाटलं नव्हतं. कालच बॅग घेऊन चेन्नई ला गेला आणि आज ही नोटिस. पूजाचा थरकांप उडाला. हात पाय कांपायला लागले. तिनी कशीतरी नोटीस घेतली व विचारलं हे काय आहे? घटस्फ़ोटाची नोटिस पाठवली होती त्याने. दार बंद करून बालकनीत आली नोटिस वांचतच होती, तेवढ्यात तिला टोपीखाली चेहरा लपवून तो (तिचा नवरा) सुजित जातांना दिसला. तिने त्याचीच बाईक बाहेर काढली आणि त्याचा पाठलाग करून त्याला गाठलं. खूप सवाल जबाब झाले, तो घरी आलाच नाही. ती सासरच्या घरी गेली तर सासूनी घरांत घेतलंच नाही. उलट कांगावा केला, “मी पोलीसांना बोलावते, सांगते ही मुलगी आम्हांला त्रास द्यायला आली आहे” पूजा परत स्वतःच्या घरी आली.
कोर्टात त्यांची भेट झाली. शेवटी सहा महिन्यांच्या ऊहापोही नंतर परस्पर संमतिने घटस्फ़ोट घेतला.
त्यांतही सुजितने mutual divorce साठी मी कांही ही एल्युमिनी देणार नाही असं वकीलांना सांगितलं. आई आणि मुलानी मिळून सगळी योजना आधीच आंखून ठेवली होती.
सुजितच्या एका मैत्रिणीने तिच्या भावासाठी पूजाला होकार द्यायला लावला, तो पण पूजाला ओळखत होता.
इतक्या चंगल्या मुलीचे असे हाल झालेले त्यानी पण बघितले होते.
वैशाली ताईंना आतां खूप छान जांवई मिळाला. पूजा आणि दिपक दोघंही आतां अमेरिकेत आहेत. त्यांना एक गोड मुलगी आहे.
दिपक गंमतीनी म्हणतो, “सुजितचे आभार मानायला हवे आपण सुजितशी तुझं लग्न झालंच नसतं तर माझी तुझी गांठच पडली नसती, तूं इथे मिरजला कशाला आली असतीस? “
–प्रतिभा जोगदंड केकरे
Leave a Reply