नवीन लेखन...

‘वेलकम टू कोंकण’

निसर्गरम्य, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जो कोकणाला लाभलेला आहे, तो वारसा कायमस्वरूपी जपण्यासाठी स्थानिक लोक, सरकार तसेच पर्यटन व्यावसायिक ह्या सर्वांनी एकत्र येऊन कोकणासाठी पर्यटन टिकविण्याच्या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे.

‘अतुल्य भारत ’ म्हणजे भारताच्या जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय ते गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा ह्या सारख्या अनेक राज्यांना लाभलेला ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक वैभवाचा साज!

आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्राचे ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच नैसर्गिक वैभव पर्यटनाच्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहे. अशा वैभवशाली महाराष्ट्राच्या 720 किमी. सागरी किनारा लगतच्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये निसर्गाचा लाभलेला वरदहस्त जणू आपल्याला खुणावतोय ‘वेलकम टू कोंकण!’

श्री परशुरामाची पावन भूमी, श्री लोकमान्य टिळकांची जन्मभूमी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य भूमी अशा अनेक थोर मान्यवरांच्या पदस्पर्शाची, त्यांच्या अस्तित्वाची, कारकिर्दीची जाणीव करून देणारा आपला कोंकण प्रांत! पेशवे कालीन मंदिरे, सकाळचा नारळाच्या माडांवरून डोकावणारा सूर्योदय व संध्याकाळी सूर्यास्ताच्या सोनेरी किरणांची समुद्रावर पडणारी सुवर्ण छाया, पावसाळ्यात कडेकपारीतून वाहणारा धबधबा इतकचं नव्हे, तर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अंगावर शाल पांघरून अंगणात केलेली शेकोटी, सकाळच्या न्याहरीसाठी केलेल्या अंबोळी, पोहे, उपमा, थालीपीठ तसेच जेवणातील सुरमई, पापलेट, सोलकढी आणि मोदकाचा आस्वाद, ह्या सगळ्याचा आनंद लुटण्यासाठी कोंकण हे देशी- विदेशी पर्यटकांना आकर्षित करते. आलेल्या पर्यटकांचे आदरातिथ्य करणे हे पर्यटकांच्या व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे. कोंकण समुद्र पर्यटनासाठी तर प्रसिद्ध आहेतच. परंतु या कोकणच्या सौंदर्य खाणीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या शौर्यगाथेचा आवाज किल्ले रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, देवगड, जंजिरा इ. अनेक ठिकाणी घुमतो. एक प्रकारे किल्ले पर्यटन नावाची संकल्पना साहसी तसेच ऐतिहासिक पर्यटकांचे आकर्षण ठरते. कोकणातून मुंबई-पुणे इतरत्र स्थायिक झालेल्या लोकांना कोंकणात मामाच्या गावाला जाणे किंवा आजोळी जाणे हे तर प्रचलित आहेच. सिमेंटच्या भिंतीपेक्षा लालबुंद चिरांच्या भिंतीतील गारव्याची मज्जा, दगडाचा कैरीच्या झाडाला लागलेला अचूक नेम, परसातील विहिरीतून पोहऱ्याने काढलेल्या थंड पाण्याची आंघोळ, असं जीवन असलेल्या आपल्या मामाचे गाव किंवा आजोळ विसरेल का हो कुणी? अनवाणी पायाला लाल मातीचा झालेला स्पर्श व आपल्या कपड्याचा बदललेला लाल रंग घरी परतल्यावर कोकणात फिरून आलो हे न सांगताच शेजारच्यांना अगदी सहज समजते.

मुंबईच्या चाकरमान्याला ओढ असते ती गणपती उत्सवाची! त्या  गणपती उत्सवाला कोकणात  हिरवा गालिचा पसरलेला असतो, कोंकणातील जी मंडळी परदेशात स्थायिक आहेत त्यांनी आपल्या बरोबर परदेशी मित्र परिवार जर आणले आणि त्यांचे आदरातिथ्य केले तर कोंकण पर्यटनाची मौखिक प्रसिद्धी नक्कीच होईल. गुहागर येथील व्याडेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग आचरा येथील श्री रामेश्वर मंदिर, कुणकेश्वर मंदिर, अलिबाग येथील बिर्ला मंदिर, रत्नागिरी येथील काशीविश्वेश्वर मंदिर, कोळीसरे येथील श्री लक्ष्मी केशव मंदिर, गणपतीपुळे, पावस, डहाणू येथील महालक्ष्मी मंदिर, दिवेआगर येथील गणपती, आसूद चे केशवराज मंदिर अशी अनेक प्राचीन मंदिरे धार्मिक पर्यटनाची ओळख करून देतात.

कोकणातील मालवणी, आगरी, कोळी भाषा तसेच त्यांची सांस्कृतिक परंपरा शिमगा नृत्य, तारपा नृत्य, आदिवासी नृत्य,  कोळी नृत्य, जाखडी नृत्य, बाल्या नृत्य, वाडा पालघर येथील वारली पेंटिंग यांच्या सादरीकरणातून तेथील लोककला दिसून येते. उत्सवातील जत्रा, पालखी हे पाहण्यासाठी आपल्या बरोबर कोंकण बाहेरील राहणाऱ्या मित्र परिवारास नेऊन ‘यावा कोंकण आपलोच असा!’ हे जणू पुन्हा येण्याचे आमंत्रण देतो. गावागावांतील गावकऱ्यांनी सादर केलेली नाटक हौशी कलाकार, हौशी प्रेक्षकांना मेजवानीच ठरते. हापूस आंबा फळांचा राजा हे तर एप्रिल-मे महिन्यातील सर्वांचे आकर्षण! अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना स्वाद देणारे फळ कोकणात जाऊन खाण्याची लज्जत काही औरच! डहाणू, पालघर येथील चिक्कू महोत्सव एक दिवसाची सफर सहज घडवून आणतो. कोकण हा तसा लघुपर्यटनाकरिता अतिशय सुलभ! मध्यमवर्गाकरिता कोंकण हे जणू कॅलिफोर्निया!

कोकण रेल्वे प्रकल्पामुळे तर कोकण अधिकच आपल्या जवळ आल्या सारखे वाटते. साधी भोळी असणारी कोकणची माणसे आलेल्या अथिती चे स्वागत अगदी दिलखुलास पणे करतात. मग त्यांचे स्मितहास्याने केलेले स्वागत पर्यटकांच्या मनाला भुरळ घालते. देशाच्या व जगाच्या कोनाकोपऱ्यातून पर्यटक येतात आणि नैसर्गिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक नजराणा आपल्या दृष्टीपटलावर साठवत पुन्हा एकदा कोकणची वाट धरतात. भारतीय लोक जम्मू काश्मीर, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक इ. अनेक ठिकाणी भ्रमंती करतात तसेच त्यांनी आयुष्यात कोकणाला देखील अधिकाधिक पसंती द्यावी आणि त्याची प्रसिद्धी करून ’The Konkan Island of Tourism’ अशी ओळख संपूर्ण जगाला करून द्यावी. मला वाटते कोकणातील पर्यटन व आदरातिथ्य ह्या दोन्हीही गोष्टी परस्परावलंबी आहेत, किंबहुना त्या असायलाच हव्यात. कोकणातील पर्यटन व तेथील आदरातिथ्य याचा अभ्यास करताना, मी केलेले निरीक्षण ह्या लेखाद्वारे मांडण्याचा थोडाफार प्रयत्न करीत आहे.

निसर्गरम्य, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जो कोकणाला लाभलेला आहे, तो वारसा कायमस्वरूपी जपण्यासाठी स्थानिक लोक, सरकार तसेच पर्यटन व्यावसायिक ह्या सर्वांनी एकत्र येऊन कोकणासाठी पर्यटन  टिकविण्याच्या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे. अर्थात काही ठिकाणी उत्तम काम केले गेले आहे किंबहुना करत आहेतच, यात काहीच शंका नाही. परंतू शास्वत पर्यटन कोकणच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल असं मला वाटत. नवीन पर्यटन स्थळे शोधून काढणे व ती विकसित करणे, मूलभूत सोयीसुविधा प्रामुख्याने पर्यटनस्थळी स्वच्छतागृह, रस्ते, वीजप्रवाह, दळणवळणाची साधने उपलब्ध करून देणे इ. औरंगाबाद येथील अजंठा, वेरूळ या ठिकाणी जशा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने एसटी बस सेवा सुरू केल्या आहेत तशा धर्तीवर कोकणातील पर्यटनस्थळी बस सेवा सुरू केल्यास दळणवळणाची सोय अधिक सुलभ होईल. कोकणामध्ये अधिक पर्यटन महिती केंद्रे उभारल्यास पर्यटकांना अल्पावधीतच पर्यटन ठिकाणची व त्या जवळील पर्यटनस्थळांची तसेच तेथे उपलब्ध असलेल्या आदरातिथ्य (हॉटेल) व्यवसायाची माहिती मिळू शकेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढाकाराने प्रशिक्षित पर्यटक मार्गदर्शकाचा छोटासा अभ्यासक्रम चालवावा, जेणे करून त्या स्थानिक तरुणांना पर्यटन मार्गदर्शक म्हणून अर्थार्जन करता येईल.

कोकणामध्ये आदरातिथ्य व्यवसाय करताना प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता प्रचंड जाणवते. त्याकरिता काही मोठ्या हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येवून हॉटेल मॅनेजमेंटची तालुका स्तरावर किमान एक कॉलेज काढावयास हवे, त्यामुळे त्यांना अपेक्षित असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. ‘एमटीडीसी’ने नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स चालविणाऱ्या नागरिकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे, असे केंद्र प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत करावयास हवे. काही अंशी कोकणामध्ये स्थानिकांच्या पुढाकाराने वॉटर गेम्स सुरू केले आहेत, परंतु त्या वॉटर गेम्सची साधने व त्यांचा मेंटेनन्स खूप खर्चिक आहे. जर अशा स्पोर्ट्स साधनांना आर्थिक मदत केली तर कोकणामध्ये सर्वच पर्यटन ठिकाणी अशा प्रकारचे वॉटर गेम्स सुरू करता येईल. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने, ऊस कारखाने, दुग्ध व्यवसाय जसे सहकार क्षेत्रावर आधारित आहेत, त्या प्रमाणे पर्यटन व्यवसायासाठी देखील सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावावा.

कोकणामध्ये कोकम, आवळा, कैरी ह्यांचे उत्पादन भरपूर प्रमाणात आहे. हॉटेलमध्ये आलेल्या पर्यटकाला कोकम सरबत, आवळा सरबत, कैरी पन्हे ह्यांचा आस्वाद ‘वेलकम ड्रिंक’ म्हणून द्यावा. हॉटेलमध्ये आलेल्या पर्यटकांचे स्मित हास्य व वेलकम ड्रिंकने केलेले स्वागत पर्यटकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.

कोकणातील खाद्य संस्कृती फार मोठी आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, तारकर्ली ह्या पर्यटनस्थळी बहुतांशी पर्यटक विविध खाद्य पदार्थांची लज्जत लुटण्यासाठी जातात. प्रत्येक हॉटेल व्यवसायिकांनी हे बंधन कटाक्षाने पाळावे की, स्थानिक खाद्य पदार्थांशिवाय उदा. चायनीज, पंजाबी, दक्षिण भारतीय पदार्थ पर्यटकांना उपलब्ध करून देवू नये. आपण जर दक्षिण किंवा उत्तर भारतात गेलो तर तेथे आपल्याला आढळून येईल की, त्या ठिकाणी पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थाशिवाय इतर कोणतेही खाद्यपदार्थ सहसा उपलब्ध करून दिले जात नाही.

दक्षिण भारतामध्ये जसे सर्कल टुरिझम आहे त्याप्रमाणे, कोकणात देखील सिंधुदुर्ग-रत्नागिरी- रायगड-ठाणे-पालघर अशा जिल्ह्यांमध्ये असलेल्या पर्यटनस्थळांची जाहिरात करून, त्या प्रत्येक ठिकाणी पोहचण्यासाठी बस सेवा सातत्याने सुरू ठेवल्यास पर्यटन वाढीस मोठी चालना मिळेल. हॉटेल रूम्स ची स्वच्छता,  तेथे असणाऱ्या सोयी – सुविधा जर सुयोग्य असतील तर त्या स्थळी पर्यटक जास्तीत जास्त आकर्षित होतात. आजकाल डिजिटल जाहिरातीचा उपयोग, प्रसिद्ध ट्रॅव्हल वेबसाईट व टूर ऑपरेटर यांच्या बरोबर सामंज्यस करार पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरतात.

कोकणामध्ये पुरेशी जागा असताना देखील काही ठिकाणी पार्किंगची समस्या जाणवते! पर्यटकांना त्यांची गाडी पार्किंग चे भाडे मोजून देखील सुरक्षित पार्किंग करता येत नाही. ह्यासाठी त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन त्या शहरातील व गावांमधील काही जागा पर्यटकांच्या गाडी पार्किंग साठी राखीव ठेवली पाहिजे. उत्तराखंड मधील नैनीतालला जशी टुरिझम पोलिस ही संकल्पना आहे, त्या धर्तीवर कोकणात देखील टुरिझम पोलिस ही संकल्पना राबविली पाहिजे.

कोकणात प्राचीन काळातील अनेक मंदिरे आहेत. होळी, गणपती अशा सणांकरिता कोकणवासीय एकत्र जमतात. तेथील यात्रा, पालखी, उत्सव पाहण्यासारखे असतात. ह्या अनुषंगाने कोकणा मध्ये धार्मिक पर्यटनास चालना मिळेल. सध्या कोकण हे समुद्र पर्यटनाकरिता अतिशय प्रसिद्ध आहे. परंतु त्याबरोबरच धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, साहस पर्यटन इ. पर्यटनाकरिता प्रसिद्धीस येऊ शकेल. फक्त त्यासाठी पर्यटन विपणनाची आवश्यकता आहे. रायगड मधील ‘माथेरान’ तसेच सिंधुदुर्गमधील ‘आंबोली’ ही ठिकाणे जशी थंड हवेसाठी प्रसिद्ध आहेत, तसेच ह्या ठिकाणी जैवविविधतादेखील आढळते. त्या जैवविविधतेचा अभ्यास जैवविविधता पर्यटनाच्या माध्यमातून निसर्गप्रेमींना करता येईल.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा जसा शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून लक्षकेंद्रित केला आहे तसेच कोकणातील इतर पाचही जिल्ह्यांना अर्थात संपूर्ण कोकणाला ‘पर्यटन क्षेत्र’ म्हणून घोषित करावे, म्हणजेच संपूर्ण कोकणाचा विकास होऊ शकेल. अशा या विविधतेने समृद्ध असलेल्या कोकणामध्ये 12 महिने पर्यटन सुरू राहू शकते. फक्त पर्यटन व येणाऱ्या पर्यटकांचे आदरातिथ्य जर सुनियोजित असेल, तर कोकणामधील पर्यटन हे दीर्घकाळ टिकेल. त्याकरिता पुढील 3 बाबी लक्षात घेतल्या पाहिजे.

  1. पर्यटनास आवश्यक असलेल्या सोयीसुविधा
  2. पर्यटन जाहिरात किंवा विपणन
  3. सुयोग्य व सुनियोजित आदरातिथ्य

एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की, कोणताही आर्थिक विकास करताना त्या ठिकाणाची नैसर्गिक क्षमता लक्षात घेतली पाहिजे तेथील नैसर्गिक क्षमता डावलून कोणत्याही प्रकारे आर्थिक विकास करता येत नाही. कोकणामध्ये खऱ्या अर्थाने पर्यटन टिकवायचे असेल तर ते कृत्रिमरीत्या न विकसित करता कोकणामध्ये असलेली नैसर्गिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक क्षमतेच्या आधारावर विकसित केली पाहिजे. परंतु हे सर्व अमलात आणण्यासाठी फक्त सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता सरकार, पर्यटनावर आधारित उद्योजक व स्थानिक लोक ह्यांचा त्रिवेणी संगम कोकणातील पर्यटन व आदरातिथ्य उद्योगास दीर्घकाळ यशस्वी करेल, ह्यात शंका नाही.

– डॉ. पराग कारुळकर

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

1 Comment on ‘वेलकम टू कोंकण’

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..