भारतीय रेल्वे सेवा उत्तरकेडील उधमपूरपासून दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्वेकडील तीनसुखियापासून पश्चिमेच्या वेरावळपर्यंत पसरली आहे. वाहतुकीच्या या सर्वदूर सोयीमुळे पोस्टखात्याने त्याचा फायदा घेणे स्वाभाविक होते. म्हणूनच आज केरळमधील माणसाने पाठविलेले पोस्ट कार्ड काश्मीर अथवा लडाखमध्ये असलेल्या जवानाला वेळेत मिळू शकते. पोस्टाची पत्रे नेण्यासाठी काही गाडयांमध्ये राखीव डबा असतो. अशा गाड्यांना मेल म्हणतात. उदाहरणार्थ पंजाब मेल.
रेल्वे सुरुवातीपासून समाजातील सर्व थरातील नागरिकांना एकत्र नेते. रेल्वे भारतात सुरू झाली तेव्हा ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी पहिला आणि दुसरा वर्ग ठेवला आणि आम जनतेसाठी जनरल क्लास ठेवला. पढे त्यात बदल झाले. वातानुकूलनामुळे आणखी बदल झाले. आज आपल्याकडे सहा वर्ग आहेत.
प्रवाशांच्या वाहतुकीसाठी जेव्हापासून आठ चाकांचे डबे वापरले जाऊ लागले तेव्हापासून मालगाडया वेगळया झाल्या. मालगाडयांना चार चाके असत. दोन्हीच्या गतीत खूप फरक असल्याने हे आवश्यक झाले. फार गर्दी नसलेल्या अथवा मीटरगेज व नॅरोगेज लाइनवर प्रवासी गाडीलाच मालाचे डबे जोडत. परंतु माल वाहतुकीची मागणी वाढल्यावर आणि प्रवासी गाडयांचे आधुनिकीकरण होऊ लागल्यावर मालगाडया वेगळया धावू लागल्या. त्यामुळे भारतभर धान्य वाटप, कोळसा व इंधनतेल मुबलक प्रमाणात पुरवणे शक्य झाले. रेल्वेने पेट्रोल व इतर इंधनासाठी टँकरचे वेगळे डबे बनविले.
मालाने भरलेले ट्रक रेल्वेमार्फत पाठविणे ही कल्पना तुलनेने नवीन आहे. भारतात या सेवेची सुरुवात १९९९ मध्ये कोकण रेल्वेने केली. याला रोरो ऊर्फ रोल ऑन-रोल ऑफ असे म्हणतात. रेल्वेच्या वाघिणीवर ट्रक ड्रायव्हर मालाने भरलेला आपला ट्रक चालवत नेतो, तो मग साखळ्यांनी बांधला जातो. असे ४५ ते ५२ ट्रक एकेका मालगाडीने नेता येतात. यामुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होते, डिझेलची बचत होते, ट्रकचे आयुष्य वाढते. कोकण रेल्वेत ही सेवा खूप लोकप्रिय व फायदेशीर झाली आहे. भारतीय रेल्वेच्या इतर मार्गावर या सेवेचा प्रसार अजून झाला नाही
Leave a Reply