ध्यानचंद नॅशनल स्टेडियम हे भारतातील नवी दिल्ली येथे आहे. हे हॉकीच्या अनेक स्टेडियमपैकी प्रसिद्ध स्टेडियम आहे. या मैदानाची आसन क्षमता २५,००० आहे.
भारताचा माजी हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ या मैदानास ध्यानचंद स्टेडियम असे नाव देण्यात आले. ध्यानचंद नॅशनल स्टेडियम हॉकी प्रमाणेच क्रिकेट सामन्यांसाठीही प्रसिद्ध आहे.
सामन्यांप्रमाणेच हॉकी आणि क्रिकेट या खेळांच्या सरावासाठी या मैदानाचा वापर करण्यात येतो. क्रिकेट खेळाबद्दल द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या महिला खेळाडू सुनीता शर्मा या आपल्या विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण या मैदानावरच देतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंप्रमाणे क्रिकेट शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचीही या मैदानावर सरावासाठी सतत गर्दी असतें. हे मैदान मुख्यत्वेकरून १९५० साली झालेल्या पहिल्या एशियन गेम्स स्पर्धांसाठी बांधण्यात आले. या मैदानाचे उद्घाटन १९५१ मध्ये एशियन गेम्स द्वारे करण्यात आले. या स्टेडियमच्या पूर्व दिशेला पन्नास मीटर लांबीचा एक मोठा तरण तलाव बांधण्यात आलेला आहे. जेथे पोहण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेतल्या जातात. हा तरण तलाव या स्टेटियम मधील संकुलाचाच एक विभाग आहे. तसेच या मैदानावर फुटबॉल सामनेही घेतले गेलेले आहेत.
२०१० साली पुरुषांचे हॉकीचे वर्ल्ड कप सामने याच मैदानावर होणार आहेत. तसेच २०१० मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धापैकी हॉकीचे सामनेही येथेच होणार आहेत. हॉकी वर्ल्ड कप सामन्यांसाठी या मैदानावर सध्या मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात येत आहे. पूर्वीचे स्टॅण्ड पाडून तेथे आता नव्या स्टॅण्डची उभारणी करण्यात येत आहे. खेळाडूंना पूर्व सरावासाठी येथे एक नवीन विभागही उभारण्यात येणार आहे. तसेच या मैदानाची आसन क्षमता वाढवण्यासाठी योजना सुरू आहे. या स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या असल्यामुळे स्टेडियमही आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
Leave a Reply