शब्दांवाचून नाही हो कळत, आम्हांला शब्दांच्या पलीकडले !
प्रयोगशील पंडीत सत्यशील देशपांडे यांची ” माझा कट्टा ” वरील अफाट, आश्चर्यकारक मुलाखत पाहिली आणि त्यांत उल्लेखिलेले “गान गुणगान ” हे त्यांचे पुस्तक ( त्यांतील खास वैशिष्ट्यामुळे) लगेच विकत घ्यायचे ठरविले. आले माझ्या मना, आणि १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन व्यक्तीने ते न सांगता पूर्ण केले.
बसमध्ये बसल्यावर शेवटच्या स्टॉपचे तिकीट काढून ( शेवटचे पृष्ठ क्र २७१) मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली सुशेगात आणि आता मनात येईल त्या स्टॉप वर बसमधून उतरतोय आणि परत चढतोय. चेन्नईला दिवसभरासाठी एकदा तिकीट काढले की वाटेत वाट्टेल तेव्हा चढउतर करण्याची परवानगी देणारी ही अशी सोय आम्हीं पूर्वी अनुभवली आहे.
पुस्तकाला शीर्षकात त्यांनी दिलेली समर्पक टॅग लाईन “एक सांगीतिक यात्रा” पानोपानी जाणवतेय.
ज्या
कुणापर्यंत
माझी
तगमग
पोहचेल,
त्या
सर्वांसाठी —–
ही अर्पणपत्रिका कां लिहिली असावी, याचे उत्तर त्यांनी “माझा कट्टा” मध्ये दिलं आणि ते रुतून राहावं असंच आहे- ” वरून सर्व काही आलबेल आहे, पण आतून घालमेल आहे.”
रणजित डिसले (ग्लोबल टीचर अवार्डी) सरांनी शिक्षणात QR कोड पद्धती आणली, त्याच धर्तीवर सत्यशील देशपांडे यांनी QR कोडच्या माध्यमातून ७५ संगीतानुभव या पुस्तकात दिलेले आहेत. सगळी दिग्गज, नामवंत गायक मंडळी/ घराणी येथे प्रत्यक्ष कानी येतात आणि या वारशाच्या थराराने स्तब्ध व्हायला होते.
पंडितजींचे सखोल अध्ययन चंबित करते. एकुणात त्यांनी तसे काठा काठावर राहणे पसंत केले आहे पण पुस्तकातून घडणारे त्यांचे दर्शन विराट आहे. ते बघणे एवढंच आपल्या हाती आहे.
माझा अभियांत्रिकी मित्र (सुप्रसिद्ध बासरीवादक)- नितीन अमीनने खूप वर्षांपूर्वी शास्त्रीय संगीत समजावून सांगण्याचा असाच एक भन्नाट प्रयोग केला- त्याने चक्क पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मधून राग परिचयाचे आणि नंतर त्याचे सवाद्य प्रात्यक्षिक करून दाखविण्याचे कार्यक्रम केले.
आता पंडितजींनी एक श्राव्य पाऊल पुढे टाकलंय.
बरेचदा ” मी येऊन गेलो बरं का – मैफिलीच्या रूपाने, रेडिओ/दूरचित्रवाणीच्या/तू-नळीच्या माध्यमातून, पण तुमचे दार बंद होते” अशी आमच्यासारख्यांबद्दल तक्रार करणारे शास्त्रीय संगीत आता आमचं दार किलकिलं करून आत डोकावतेय. मी दार सताड उघडलं आहे.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply