कालच्या रविवारीच गोष्ट आहे. शनिवारी माझ्या एका मित्राने अचानक आॅफिसवर येऊन माझ्याबरोबर पार्टी करण्याचा बेत बोलून दाखवला. त्याला मी शनिवार असल्यामुळे स्पष्ट नकार दिला. शेवटी फक्त जेवणाच्या बोलीवर आम्ही बाहेर पडलो. आधी त्याच्या काही वस्तू खरेदी करण्यासाठी लक्ष्मी रोडला फेरफटका मारला. त्याची खरेदी झाल्यावर एका डायनिंग हॉलमध्ये जाऊन गप्पा मारत यथेच्छ जेवण केले. जेवण झाल्यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी परतलो.
रविवारी सकाळी मला जरा उशीराच जाग आली. पूजा बाहेरगावी गेल्यामुळे आम्ही दोघंच घरात होतो. सर्व आवरल्यावर सीमासोबत मी चहा घेतला व टेबलावरील चष्मा नाकावर ठेवून रविवारची सुट्टी एंजाॅय करण्यासाठी घराबाहेर पडलो. आता माझ्या नोकरीचे एकच वर्ष राहिले होते. पूजाचं लग्न झालं की, आम्ही दोघंही कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त होणार होतो. इतक्या वर्षात मी घरातल्या कोणत्याही गोष्टीत कधीच लुडबूड केली नाही, अगदी चहासुद्धा कधी केला नाही. सर्व काही सीमाच सांभाळायची. मी फक्त तिला महिन्याच्या खर्चासाठी पैसे पुरवत होतो.
मला चालण्याची फार आवड आहे. मी फिरत फिरत प्रथम पदमावतीला गेलो. बऱ्याच वर्षांनंतर देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश केला. नकळत माझ्या मनात विचार येऊन गेला, या नवरात्रात देवीची खणानारळाने ओटी नक्की भरायची. गेल्यावर्षी भरायची राहून गेली होती. मी प्रदक्षिणा घालून बाहेर आलो. जवळच माझा शाळेतील मित्र, सुभाषचं घर होतं. त्याच्या घरी मी गेलो. त्याच्याकडे पाळीव मांजरांची पलटण आहे. मी दारावरची बेल वाजवली. सुभाषनेच दरवाजा उघडला. त्याच्यामागे ‘म्याॅवऽम्याॅवऽ’ करणाऱ्या चार मांजरी उभ्या होत्या. त्याला मी पहिल्यांदा त्यांना दूर करायला सांगितले व खुर्चीवर जाऊन बसलो. प्रितीने पाण्याचा ग्लास हातात आणून दिला व विचारले, ‘काका, तुम्हाला तर मांजर फार आवडते, मग आजच त्यांची भिती कां वाटू लागली?’ तिच्या या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. कारण या आधी मी सुभाषकडे येताना याच मांजरांसाठी दुधाची पिशवी घेऊन येत असे. मी ‘लोकसत्ता’ चाळत सुभाषशी गप्पा मारत बसलो. तेवढ्यात अंजली वहिनींनी गरमागरम कांदेपोह्यांची डिश आणली. एरवी मी समोर आलेलं गपगुमान खाणारा प्राणी, चमचमीत पोह्यांचा एक चमचा तोंडात टाकल्यावर वहिनींना प्रश्र्न केला की, तुमच्यासारखे पोहे मला कधीच जमत नाहीत. गेल्या दिवाळीत माझी चकलीही तुमच्यासारखी खुसखुशीत झाली नव्हती.’ सुभाषने उठून जवळ येऊन माझ्या तोंडाचा वास घेतला. मला त्याच्या अशा वागण्याचा भयंकर राग आला. चहा झाल्यावर तासाभराने मी त्याचा निरोप घेऊन निघालो. सातारा रोडने स्वारगेटला आलो. स्वारगेटला पीएमपीएल पकडून पाच रुपयांत शनिपारला उतरलो.
शनीमहाराजांचे दर्शन घेतले व देसाई बंधू आंबेवाले दुकानाच्या बाजूने चालू लागलो. खेड्यातून भाजी घेऊन आलेल्या स्त्रिया ओळीने बसलेल्या होत्या. ताजी भाजी पाहून मला ती घेण्याचा मोह झाला. मी घरातून बाहेर पडताना पिशवी काही घेतली नव्हती. तेथील एका दुकानातून कापडी पिशवी खरेदी केली व दोन पालेभाज्या घेतल्या. पुढे जाताना सहज पलीकडे माझी नजर गेली. ‘कल्पना साडी सेंटर’ पाहून मला पूजाचं बालपण आठवलं. तिच्यासाठी मी बेबी साडी इथूनच खरेदी केली होती.
थोडं पुढे गेल्यावर ‘तुलसी’ नावाचं एक मोठं दुकान दिसलं. मी आत प्रवेश केला. काऊंटरला भाजीची पिशवी ठेवून टोकन घेतलं व एकेक मजला पहात तिसऱ्या मजल्यावर पोहोचलो. स्वयंपाकघरात लागणाऱ्या सर्व साहित्याची तिथं रेलचेल होती. मला जे आवडेल ते एका क्रेटमध्ये घेत घेत मी कॅश काऊंटरपाशी आलो. रांगेत उभ्या असलेल्या भगिनी माझ्या खरेदीकडे पाहून हसत होत्या. माझ्याकडे कॅश नसल्यामुळे मी कार्ड पेमेंट केले. एवढ्या चमचे, ताटल्या, पेल्यांमुळे मला पिशवीची आवश्यकता होती. ती त्यांना मागितली तर त्याचे वेगळे पैसे द्यावे लागले. आता दोन पिशव्यांसह मी मंडईजवळ पोहोचलो. तिथे पाणीपुरीची गाडी पाहून तोंडाला पाणी सुटले. दोन पायात पिशव्या धरुन दोन प्लेट पाणीपुरीवर यथेच्छ ताव मारला. शेवटच्या दोन मसाला पुरी रिचवून दत्तमंदिराकडे निघालो. दर्शन घेतले व विचार केला, इतकं जवळ आलोच आहोत तर बन्सीलालकडे जाऊन संक्रांतीसाठी साडी घेऊ यात. दोन पिशव्या काऊंटर शेजारी ठेवून मी वरच्या मजल्यावर गेलो. तेथील सेल्समनने मला साडी कशाप्रकारची हवी आहे, म्हणून विचारले. त्याला काठ पदराच्या लेटेस्ट साड्या दाखविण्यास सांगितले. त्याने बजेट विचारले, मला राग आला. त्याला म्हणालो, ‘तुझ्याकडे भारी असतील तेवढ्या सर्व दाखव.’ मग त्याने माझ्यापुढे ढीग उभे केले. मला एक रंग आवडला, मात्र बाॅर्डर फारच मोठी होती. शेवटी तासाभराने दोघींसाठी दोन साड्या निवडल्या. माझं साड्या खरेदी चालू असताना इतर स्त्रिया माझ्याकडे पाहून फिदीफिदी हसत होत्या. मी बाहेर पडलो व नेहरू चौकात जाऊन शेअर रिक्षा केली. घरी पोहोचेपर्यंत सहा वाजले होते.
तीन पिशव्या हातात घेऊन मी घरात प्रवेश केला तर सीमाला भोवळच यायची बाकी राहिली, कारण आजपर्यंत मी एकट्याने एकाही वस्तूची खरेदी कधीही केली नव्हती. साधी कधी तूरडाळ आणायला तिने सांगितली तर मी मूगडाळ घेऊन येणारा प्राणी. आज एवढी खरेदी, ती देखील न विचारता, न सांगता?
सीमाने मला डोळे मोठे करुन धारेवर धरले. ‘तुम्ही सकाळी बाहेर पडताना माझा चष्मा का घेऊन गेलात? मला त्यामुळे साधा पेपरही वाचता आला नाही. तुम्हाला फोन करुन सांगावं म्हटलं तर मोबाईल देखील इथेच विसरुन गेलात. मला अंजलीचा फोन आला होता, तिने मला सांगितले की, तुम्ही तिच्या चकलीची स्तुती करीत होता म्हणून.’
मी पहिल्यांदा माझा चष्मा डोळ्यावर चढविला आणि माझ्या डोक्यात लख्खं प्रकाश पडला. सकाळी घाईत सेम टू सेम दिसणाऱ्या दोन्ही चष्म्यातून मी चुकून सीमाचा चष्मा घातल्याने माझ्या मनात येणारे सर्व विचार तिच्या मनासारखेच येत होते. एरवी मी कधीही पाणीपुरी न खाणाऱ्याने दोन प्लेट रिचवल्या होत्या. साडी खरेदी वेळी मोबाईल गेम खेळत बाजूला बसणारा मी सेल्समनशी हुज्जत घालत बसलो. कधी साधी सुईचीही खरेदी न करणाऱ्याने चमचे, ताटल्या, पेले खरेदी केले.
सीमाला मी खरेदी केलेली साडी मात्र फारच आवडली. रागाचा पारा झरझर खाली आला व तिने मला स्पेशल चहा करुन हातात दिला…..
(सतीश वैद्य यांच्या मूळ कल्पनेवर आधारित)
– सुरेश नावडकर ४-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply