इतकं सारं तुझं व्हावं की माझं काही उरूच नये
त्याहीपेक्षा खंत वाटते तुलाही हे कळू नये
फुलं सारी तुझीच होती, कधी फुलली कधी सुकली
वाईट एवढंच वाटतं, तुला त्यांचा गंध येऊ नये
किती किती विरहगीतं मी स्वत:शीच गात राहिले
एकसुध्दा सूर का रे तुझ्यापर्यंत पोचू नये?
शब्दाविनाच रंगते नेहमी खरी प्रेमकहाणी तरी
गोष्ट अर्धी राहून जाईल इतकं अबोल होऊ नये
एकच आहोत आपण मनानं हेही मान्य आहे मला
स्वप्नवर्खी स्पर्शानाही इतकं कमी लेखू नये
माझी कविता माझ्याचपाशी पाकळी पाकळी मिटत गेली
क्षण निसटून जातील इतकं लज्जे, आड येऊ नये !
–सौ. राजलक्ष्मी देशपांडे
Leave a Reply