नवीन लेखन...

मदतीचा हातभार

तसा मी घरात बायकोला थोडीफार मदत ही करतच असतो. अहो, खरंच ! म्हणजे “वॉशिंग मशिन लावणे” तर तुम्ही वाचलच असेल. म्हणजे नसेल तर वाचा इतकंच यातून सांगायचंय. याशिवाय भाज्या , कांदे, बटाटे, टोमॅटो चिरून…आता चिरून म्हणजे अगदी विळीवर बसून वगैरे नाही हो, सुरीनेच देतो चिरून.

भेंडी नावाची भाजी चिरायला तुम्हाला सांगतो, मला अज्जीबात आवडतं नाही. बुळबुळीत कुठची !
चिरताना तिच्या नावाचा उद्धार करत असतो मी. एकतर तिचे तुकडे सुरीला चिकटतात, नाहीतर एकमेकांना. सुरी आपटून आपटून ते खाली पाडावे लागतात. बरं, हिने दहा वेळा तरी सांगितलेलं असतं,
“वरचा मुकुट कापलास की बघ रे, आत काळं आहे का. असेल तर तो भेंडा घेऊ नकोऽऽऽस.”

आता याआधीही हे अनेकदा सांगून झालय, तरीही प्रत्येक वेळी ते रिपीट होतं आणि मला ऐकावं लागतं. चार चार भेंडी एकावेळी घेऊन आणि डिशमध्ये त्यांना रांगेत आडवी घालून मी सुरीने सपकन त्यांचा मुकुट उडवतो, आणि लगोलग शेपटीही. एक दोन मुकुट सुरिला चिकटतात, दोन खाली पडतात. मग ते सुरीचे झटकत बसायचं. या सगळ्या झटापटीत ते काळं पहायचं राहून जातं. लक्षात आलं की, कापलेल्या भेंडीचे तुकडे सुरीने उलटसुलट करत चेक करायचं. बरच झगडून भेंडी चिरणं पूर्ण होतं. मला वाटतं याला वीटूनच ”भेंडी गवारी” हा अपशब्द प्रचलित झाला असावा. यापेक्षा कांदे कापायचे असतील आणि उभे कापायचे असतील तर जरा उत्साह येतो. दोन भाग करून सटासट चिरत गेलं की झालं. हेच कांदे बारीक चिरायचे असेल की ही मला म्हणते,
“तू एव्हढे फाईन बारीक कांदे कसे चिरू शकतोस? मी नाही बाबा एव्हढे बारीक चीरू शकत. एकदा मी observe करणार आहे तू चिरताना.”

या बोलण्याने मी लगेच सावध होतो , आणि अगदी सहज स्वयंपाकघरात डोकावतो. पाच सहा कांदे ओट्यावर काढलेले दिसतात. शेजारी टोमॅटो सुद्धा मख्खपणे उभे असतात. हिची नजर असतेच. लगेच म्हणते,
“देतोस का जरा चार कांदे चिरून?” “तोपर्यंत मी तुला चहा टाकते.”
हा विक पॉइंट ती पूर्णपणे जाणून असते. आम्ही विरघळतो आणि घेतो कांद्याना चीरायला. इतक्यात चहा समोर येतो.
“आधी गरमागरम चहा घे, याची घाई नाहीय.”

दाखवलेल्या आपुलकीने आणि प्रेमाने मला अगदी गहिवरून येतं. चहा छानच झालेला(केलेला)असतो. आणि हिच्या हातचा चहा फक्कडच होतो. अहो, हे मी अगदी मनापासून वेळोवेळी बोलून दाखवतो. आणि याचा फायदा नेमका कसा करून घ्यायचा हे बायकांना (प्रत्येकाच्या) बरोब्बर कळतं. चहा ढोसून मी पुन्हा कांद्यांकडे वळतो. अजूनही टोमॅटो का काढलेयत याचा उल्लेखही हिने केलेला नसतो. ते आपले माझ्याकडे पहात असतात. अखेर न राहवून मीच विचारतो,
“अगं, टोमॅटो का काढलेयस ? ते ही चिरायचेत का?”
यालाच म्हणतात आपणहून पायावर धोंडा पाडून घेणे.
यावर प्रश्न न समजल्यासारखी आधी ही रिॲक्ट होते,
“कुठले टोमॅटो”?
तरीही मी बावळटपणाने उत्तरतो,
“हे ओट्यावर ठेवलेयत ते ?”
“ते होय ? चीरायचे आहेत खरं म्हणजे. तुला होत असेल तरच चिर, नाहीतर मी चिरीन. चारच तर आहेत.”
कांद्यापेक्षा टोमॅटो चिरणं खूपच सोप्पं. फार न बोलता मी कांद्यांकडून त्यांच्याकडे वळतो. टोमॅटो चिरत असतानाच, अचानक ही येऊन ओट्यावर दोन बटाटे ठेवून जाते. त्यांच्या बाजूलाच तासणी ठेवते. माझं टोमॅटो चिरकामावरून लक्ष उडतं आणि ते सारखं बटाट्यांकडे जाऊ लागतं. तेव्हढ्यात ही म्हणते,
“तुझं आटोपलं का ? मला फक्त दोनच बटाटे चिरायचे आहेत. तू सगळं करत बसू नको उगाच. तुझं आटोपलं की सांग रे”
दोनच, चारच हे चं फार विचारपूर्वक वापरले जातात बरं.

या सगळ्याला म्हणतात कृष्णनिती.
मी टोमॅटो चिरतो, त्यानंतर बटाटे तासून त्याच्या फोडी करतो. इतक्यात ही येते,
“बटाटे कशाला चिरलेस तू ? मी चिरले नसते का? सालं टाकून दे डस्टबिनमध्ये जाता जाता.”
आपण नवरे बिचारे सरळ मनाचे आणि हुकूमाचे ताबेदार.
आमच्याकडे फक्त झडूपोता (की पोछा) करायला बाई येतात. भांडी आम्ही i.e. ही – मी – लेक यापैकी कोणीही आणि कपडे(वॉ.मशिन एक लावणे) धुणे ही सर्वस्वी माझी मक्तेदारी झालीय. भांडी धुण्यापेक्षा ती जागच्या जागी लावणे हे काम मला अजिबात आवडत नाही. हिच्या जागा आणि माझ्या जागा चुकतात आणि भांड्यांचा आवाज उगीचच वाढतो. माझ्या लेकाचं अनेकदा माऊली प्रेम( आपल्या आईचं त्याने केलेलं नामकरण)जागृत होतं आणि आपल्या कामातून मोकळा असेल तर तो या कामाला उभा रहातो . इथे गंमत म्हणजे, हिला मी भांडी धुतलेली चालतात, पण लाडका लेक आला की मात्र,
“अरे तू कशाला ? तू जा बरं तुझ्या कामाला, पप्पा धुतोय ना ?”
? अरे काय आहे हे ?
बरं, हा भांडी धुताना, साबणाच्या बाउलमध्ये इतकं पाणी जमा होतं की त्यामध्ये आणखीन वीसेक भांडी धुतली जातील. इतकं करून तो थांबत नाही. माऊलीला पूर्ण मदत करायची असते ना. मग तो जागा दिसेल, मिळेल तिकडे ती लावून टाकतो. सकाळी चहाचं भांडं शोधता शोधता माझी पुरेवाट होते. पण त्याला मात्र सगळं माफ असतं.
दुधी हलव्यासाठी दुधी किसणं आणि गाजर हलव्यासाठी गाजरं, हे एक काम माझ्याकडे असतं. आता दुधी किसणं तसं सोपं असतं. पण गाजरं किसणं आणि ते ही किसणीवर हे एक हातातली ताकद जाणारं काम आहे. अहो, गाजरं किसून झाल्यावर उजवा हात शक्तिहीन झाल्यासारखा वाटू लागतो. पण पुढचा गोडवा चाखायचा असतो ना, त्यामुळे करतो सहन सगळं बापडा. आणि हिच्या हातचा गाजर आणि दुधी हलवा म्हणजे काय सांगू महाराजा ?????
आता, ही सगळी मदत मी आपला हीच्यावरच्या प्रेमापोटीच तर करत असतो. उगाच बाहेरच्यांना कशाला हे दाखवायचं? पण अनेकदा मी वॉशिंग मशिनमध्ये कपडे टाकत असतो, किंवा भांडी वगैरे धूत असतो, अगदी त्याचवेळी शेजारच्या फ्लॅट मध्ये राहणारी आमची शेजारीण बेल वाजवते. मुख्य दरवाजाच्या समोरच्याच खोलीत आमचं वॉशिंग मशिन असतं. हिने थोडं किलकिलं दार उघडायचं की नाही? पण ही सताड उघडते. ती शेजारीण हिच्याशी बोलताना, माझ्याकडे पहात असते. मी दुसऱ्या खोलीत जाऊन हिला शुक शुक करून, खाणाखुणा करून सांगायचा प्रयत्न खूप करतो, की अगं दार आड कर नाहीतर तिला हॉलमध्ये तरी घेऊन जा म्हणून, पण परिणाम शून्य. कधी मी भांडी धुताना टपकते. बोलता बोलता ही सहज सांगते,
“बेटा बाहर गया है movie देखने”
मी अगदी कमीतकमी आवाज करून भांडी धूत असतो. तरी शेजारणीला शंका येतेच, बेटा बाहर गया है, सहेली बात कर रही है आणि आमच्याकडे भांड्यांना कामवाली येत नाही. मग भांडी कोण धुतय????
आता ती सांगत नाही का जाणार सोसायटीत,
“वो मिसेस कुळकर्णीका husband ही धोता है घरका बर्तन और कपडा.”

आता कपडा, याच्यापुढे वॉशिंग मशिनमे हे शब्द ती बोलली नाही तर लोकांचा काय गैरसमज होणार, सांगा बरं?
तर असा हा घरातल्या मदतीचा हातभार. गंमतीचा भाग सोडा, पण प्रत्येक नवऱ्याने थोडीफार तरी करायला हवीच हो आपल्या ही ला मदत. बरं वाटतं, आणि वयोपरत्वे सगळंच जमत नाही उरकायला आता. जरासा भार हलका झाला आणि तो ही नवऱ्याच्या हातून की ती ही मनातून सुखावते. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे तुकोबांनी व्यापक अर्थाने सांगितलेलं वचन आपल्या संसारातून तरी प्रत्यक्षात येतं.

आपलं घर, आपला संसार, आपलं कुटुंब आणि आपली घट्ट प्रेमाची ही अर्धांगिनी, मग मदतीचा हातभार आपलेपणाने लावायलाच हवा की.

प्रासादिक म्हणे 

प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..