आयुष्यात अशा काही घटना घडून गेलेल्या असतात, ज्यांची पुन्हापुन्हा उजळणी करावीशी वाटते. काही हक्काची ठिकाणे असतात_ मनाला उभारी देणारी, जगण्याची नवी उमेद देणारी… ज्यांच्या आठवणीत आपण रमून जातो, कधी अभिमानाने उर भरून येतो..प्रसंगी हळवेही होतो. माझ्यासाठी माझी बँक ही त्यापैकीच एक.
वयाच्या 19 व्या वर्षी बँकेत कॅशियर म्हणून मी रुजू झाले. माझा बँकेतील पहिला दिवस. स्टाफ कमी होता म्हणून पहिल्याच दिवशी मी नवखी असून सुद्धा थेट कॅश काउंटरलाच बसावे लागले. मालवण ब्रँच म्हणजे ट्रेझरी ब्रँच.. भरपूर कॅश व्यवहार.. प्लास्टिक मनी तेव्हा नव्हताच.. पॉकेट मनीसुद्धा कधी न पाहिलेली मी. प्रचंड दडपण आणि ताण आला होता माझ्यावर… माझे एक सीनिअर सहकारी काम समजविण्यासाठी 15 मिनिटे माझ्या शेजारी उभे राहिले. पण नंतर सर्व मी एकटीनेच सांभाळायचे होते. मी फक्त पत्ते पिसावेत तसे 1 ते 100 मोजत होते. ड्रॉवर भरून वाहत होते. सेंटर टेबलचा स्फाफ ती कॅश घेऊन मागे बंडल बनवीत होता. एकदाचे 3 वाजले. काउंटर बंद झाले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे एकाही पैशाचा फरक न लागता 20 लाखांची कॅश बॅलन्स झाली होती. सर्वांनी एकच जल्लोष केला. सर्वांनी खूप कौतुक केले माझे. माझ्या कॅश ऑफिसरने तर सर्व स्टाफला बटाटे वडा आणि चहाची पार्टी दिली.. माझा आत्मविश्वास पहिल्याच दिवशी दुणावला. खूप उभारी आली.
बँकेची नोकरी म्हणजे सतत जनसंपर्क. उत्तम ग्राहक सेवा हा मूलमंत्र. लोकांच्या अपेक्षा न संपणाऱ्या. ग्राहक सेवा हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय बनला.
अनेक आठवणी आहेत, पण एक अविस्मरणीय आठवण सांगावीशी वाटते.
मी कॅश काउंटरला होते. रांगेच्या बाहेर एक तरुण मुलगा खूप टेन्शनमध्ये उभा असलेला दिसला मला.. खूप अस्वस्थ वाटत होता तो.. इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. त्याला मला काहीतरी सांगायचे होते बहुतेक.. मी त्याला पुढे बोलावून घेतले आणि विचारले, ‘काय काम आहे? बराच वेळ तुम्ही उभे आहात.’
तर म्हणाला, ‘मॅडम, माझ्या बाबांचे तुमच्या शाखेत खाते आहे, पण ते एकट्याच्या नावावर. बाबा खूप आजारी आहेत आणि ते सही देऊ शकत नाहीत. त्यांच्या उपचारासाठी पैशाची खूप गरज आहे.’
मी म्हटलं, ‘आमच्या साहेबाना भेटा. डॉक्टरनी बाबांचा अंगठा प्रमाणित केला तर तुमचे काम होईल. टेन्शन नका घेऊ.’
त्यावर तो उत्तरला, ‘मी साहेबाना भेटलो. पण ते तयार नाहीत. काहीतरी अडचण आहे.’
मला याचा उलगडा होईना. मी साहेबांना जाऊन भेटले.
ते म्हणाले, ‘मॅडम, डॉक्टर सर्टिफिकेट देतील. पण रक्कम मोठी आहे. 5 लाख. त्याचे बाबा अतिदक्षता विभागात आहेत आणि बेशुद्ध आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा अंगठा घेणे रिस्क वाटते.’
साहेबांच्या बोलण्यात तथ्य होते. मी थोडावेळ विचार केला आणि म्हटले, ‘सर, मी एक सुचवू का. मी या मुलाबरोबर हॉस्पिटल मध्ये जाते. डॉक्टरांना भेटून त्यांच्या उपचारासाठी खरंच 5 लाखांची गरज आहे का, याची खातरजमा करते आणि असेल तर तसे डॉक्टरांकडून सर्टिफिकेट घेते. मी स्वतः बाबांची ओळख (identity) पटवून घेते आणि अंगठा ही डॉक्टर समोर घेते. मग तर काही हरकत नाही ना. एवढे आयुष्यभर कमावलेले पैसे त्यांच्याच गरजेच्या वेळी उपयोगी नाही आले तर काय उपयोग.. आपण मदत करू शकतो.’
साहेबांनी यावर संमती दिली.
तुम्ही स्वतः जात असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही म्हणाले.
मी लगेच हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांशी बोलून घेतलं… बाबांचा अंगठ्याचा ठसा घेऊन मी तो स्वतः प्रमाणित केला.. डॉक्टरांचे सर्टिफिकेट घेतले आणि बाबांच्या उपचारासाठी त्यांचे पैसे त्यांच्या मुलाच्या स्वाधीन केले..
तो मुलगा एवढा भारावून गेला की मला थँक्यू म्हणताना त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली.
मी म्हटलं, ‘अहो, हा आमच्या कामाचाच एक भाग आहे. फार काही विशेष केले नाही मी. बाबांचे पैसे बाबांना मिळवून दिले.. बाबांची काळजी करू नका हा.. ते नक्की बरे होतील.. आणखी काही मदत लागली तर नक्की सांगा.’
एक दिवस पुन्हा तो आमच्या ब्रँचला आला. हातात मिठाईचा पुडा आणि सोबत बाबांना घेवून.
‘मॅडम, ओळखलंत का? बाबा बरे झालेत.. त्यांनाच घेऊन तुम्हाला भेटायला आलो आहे. तुम्ही माणुसकीच्या नात्यातून जे आमच्यासाठी केलंत ते आम्ही कधीही विसरणार नाही.’
बाबांनी थरथरत्या हातांनी माझा हात हातात घेतला. डोळ्यावरचा चष्मा हळूच नाकावर घेतला. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि हाताचा स्पर्श बरंच काही सांगून गेला.
‘पोरी, आयुष्यात सुखी रहा.. एवढंच म्हणेन…’
माझेही डोळे नकळत पाणावले.
मी नॉमिनेशन फॉर्म आणि संयुक्त खाते फॉर्म त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाले, ‘बाबा हे फॉर्म भरून द्या आणि तुमचे खाते संयुक्त खाते बनवा. पुन्हा ही वेळ तुमच्यावर येणार नाही.. आणि हो ..तुम्ही सुशिक्षित आहात.. इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी पण करून घ्या तुमच्या खात्यासाठी.. म्हणजे वारंवार बँकेत यायची गरज नाही.. तुमचे बँकिंग व्यवहार तुम्ही घरबसल्या करू शकता.’
त्यांनी लगेच फॉर्म भरून दिले आणि त्यासोबत इतर बँकांमध्ये असलेल्या त्यांच्या ठेवी आमच्या बँकेत ट्रान्स्फर करण्यासाठी विनंती अर्ज सुद्धा.
एका चांगल्या ग्राहक सेवेमुळे आमच्या बँकेचा सुद्धा फायदा झाला.
असे अनेक छोटे मोठे आनंदाचे क्षण खूप अनुभवता आले.अनेक प्रेमळ माणसे मनात घर करून राहिली. सहकाऱ्यांच्या रूपाने अनेक मित्र-मैत्रिणी मिळाल्या.
तत्पर आणि आपुलकी, जिव्हाळा असलेली ग्राहक सेवा देऊन जो आनंद मिळविता आला त्याला तोड नाही. शेवटी आनंद हा मनात असतो आणि मनाची श्रीमंती हीच सर्वात मोठी श्रीमंती, नाही का?
आणि म्हणूनच बँकेची नोकरी करून मी खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे.
-माधवी मसुरकर
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply