सलीम अझीझ दुराणी म्हणजेच ‘ प्रिन्स ‘ याचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी अफगाणिस्तानमधील काबुल येथे पठाण परिवारात झाला. त्यांचे लहानपण जामनगर येथे गेले. त्यांचे वडील देखील क्रिकेट खेळलेले होते. ते राजस्थानच्या टीममधून बराच काळ रणजी ट्रॉफी खेळले होते. सलीम दुराणी याना जबरदस्त फॅन्स लाभले होते. मैदानात ते जेव्हा खेळण्यास येत तेव्हा लोक अत्यंत उत्स्फूर्तपणे ‘ वुई वॉन्ट सिक्स ‘ म्हटले की ते दणकून षटकार ठोकायचे परंतु त्यांना लोकांची ही मागणी करताना विकेट फेकली जायची म्हणजे ते बाद होत असत. परंतु त्या कालखंडात सलीमभाईच्या मागे असंख्य फॅन्स लागत त्यामध्ये अर्थात मुलींचा भरणा अधिक असे. त्यांचे ह्याबद्दलचे अनेक किस्से चर्चेत आहेत परंतु एवढे असून त्यांच्या नावाला बट्टा लागला नाही हे विशेष. निदान त्याबद्दल वेडेवाकडे एकावयास मिळाले नाही.
सलीम दुराणी यांनी 1953 मध्ये सौराष्ट्र्मधुन क्रिकेट खेळले. त्यानंतर 1954 ते 1956 गुजराथ क्रिकेट टीममधून क्रिकेट खेळले तर 1956 ते 1978 पर्यंत राजस्थान क्रिकेट कडून क्रिकेट खेळले.
सलीम दुराणी त्यांनी त्यांचा पहिला कसोटी क्रिकेट सामना 1 जानेवारी 1960 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता तो मुंबईमध्ये , त्यावेळी पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी १८ धावा काढल्या होत्या त्यावेळी त्यांची विकेट रिची बेनॉ यांनी घेतली होती दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांना खेळण्यास मिळाले नव्हते कारण तो सामना अनिर्णित राहिला होता. १९७३ मध्ये कानपुरच्या कसोटी सामन्यात त्यांना जेव्हा वगळण्यात आले होते तेव्हा सगळीकडे बोर्ड आणि बॅनर झळकत होते ‘ नो दुराणी , नो टेस्ट ‘ इतकी त्यांची लोकप्रियता अफाट होती. आजही त्याचे अनेक किस्से सांगितले जातात . मध्यंतरात काही वर्षांपूर्वी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला असताना अजित वाडेकर , बी बापू नाडकर्णी , चंदू बोर्डे , माधव आपटे अशा अनेक क्रिकेटपटूंनी त्यांच्या आठवणी आणि त्यांचे धमाल किस्से सांगितले होते. सलीम दुराणी त्यांनी एक चित्रपटामध्ये भूमिकाही केली होती ती परवीन बाबी यांच्याबरोबर, त्या चित्रपटाचे नाव होते ‘ चरित्र ‘ अर्थात त्यावेळी अनेक वावड्या उठल्या होत्या. त्यात काही अर्थ नव्हता .
सलीम दुराणी याचे क्षेत्ररक्षण म्हणजे धमाल चर्चेचा विषय असे कारण जेथे सहसा कोणी चेंडू मारत नसे त्या बाजूला त्यांना क्षेत्ररक्षण करण्यास ठेवत कारण साहेबाची वाकायची पंचायत होत असे कारण वाकणार कोण अर्थात त्यांना थोडासा पायाला प्रॉब्लेम होता असेही म्हटले गेले होते. त्यांच्याबद्दल खूप काही सांगता येईल. एकच सांगावेसे वाटते अत्यंत धमाल आणि प्रेक्षकांनी कदर करणारे व्यक्तिमत्व त्यावेळी मेंदानावर वावरत असे. आजही कधी कार्यक्रमात आले की त्यांचे किस्से त्यांच्या तोडून ऐकण्यास खूप मजा येत असे . वय झाल्यामुळे ते फारसे कार्यक्रमात दिसत नव्हते , ते जामनगर येथे रहात होते . सलीमभाई यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना ६ फेब्रुवारी १९७३ रोजी इंग्लंडविरुद्ध मुंबई येथे खेळला .
सलीमभाईनी 29 कसोटी सामन्यात 1202 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी एक शतक आणि 7 अर्धशतके केली. तसेच त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती 104 धावा आणि त्यांनी 75 विकेट्सही घेतल्या. त्यांनी 73 धावांमध्ये 6 विकेट्स घेतल्या आणि 14 झेलही पकडले. त्यांनी 170 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 8,545 धावा केल्या त्यामध्ये त्याने 14 शतके आणि 45 अर्धशतके केली त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद 137 धावा तसेच त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 484 विकेट्स घेतल्या होत्या . ते स्लो लेफ्ट आर्म ओर्थोडॉक्स गोलंदाजी करत असत. सर गॅरी सोबर्स सलीम दुराणी यांना मानतात कारण त्यांना दुराणीने क्लीन बोल्ड केलेले होते. तर त्याआधीच्या चेंडूवर क्लाईव्ह लॉईडला अजित वाडेकर यांच्याकडून झेलबाद केले होते. तो त्या सामन्याचा टर्निग पॉईंट होता. खऱ्या अर्थाने सलीम दुराणी हे त्यावेळी ऑल राऊंडर खेळाडू होते आणि त्यांच्या गोलंदाजीचा वापर अजित वाडेकर यांनी पुरेपूर करून घेतला होता. टोनी ग्रेगची विकेट ही त्यांची ७५ विकेट होती आणि अजित वाडेकर याना सांगून त्यांनी घेतली होती. अजित वाडेकर म्हणतात की सलीमभाई ज्या स्पॉटवर अचूक गोलंदाजी करतात तो चेंडू खरोखर फलंदाजाला अनप्लेएबल असे . १९७२ साली त्यांनी दुलीप ट्रॉफी एकट्याच्या जीवावर घेतली होती. त्यावेळी त्या ट्रॉफीला ‘ दुराणी ट्रॉफी ‘ असेही म्हटले गेले होते.
सुदैवाने मला अनेकवेळा सलीमभाईना यांना बऱ्याच वेळा भेटता आले , त्यांची भाषणे ऐकण्याचा योग आला होता. कधीकधी गप्पाही होत असत. महत्वाचे म्हणजे ते पहिले क्रिकेटपटू आहेत की ज्यांना पहिले अर्जुन अवॉर्ड मिळाले होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ते मिळाले खरे परंतु त्यांनी ते जाऊन घेतले ते बऱ्याच वर्षांने असे म्हटले जाते.
-सतीश चाफेकर
Leave a Reply