मी दी सांगली बँक लि. अंधेरी शाखेत टेलर ह्या पदावर कार्यरत होते. टेलरला पाच हजार रुपयेपर्यंतच ग्राहकाला पैसे देण्याची परवानगी होती. आमच्या बँकेत आणि प्रथम अंधेरी शाखेतच ही टेलर पद्धत सुरू झाली होती. मीही टेलरच्या पदावर नवीनच होते. त्यामुळे प्रिकॉशन म्हणून विड्रॉलचे, चेकचे आधी लेजर पोस्टिंग करून माझ्याकडे पेमेंटला येत असे. मी सही बघायची विड्रॉल किंवा चेकबरोबर लिहिला की नाही बघून पेमेंट करीत होते. त्यामुळे कुठल्या अकौंटला ओव्हरड्राफ्ट वगैरे कधी झाला नाही. पण… एकदा चांगलीच पाचावर धारण बसली माझी.
एक ग्राहक महिला पैसे काढायला आल्या. त्या निवृत्त मुख्याध्यापिका होत्या. त्यांची माझी बऱ्यापैकी ओळख झाली होती. आम्ही दोघी एकमेकींची विचारपूस करायचो. त्या बाईंनी विड्रॉल पोस्टिंग करून माझ्याकडे पैसे घ्यायला आल्या. त्यांची विड्रॉल चार हजार रुपयांची होती. मी त्यांना चार हजार दिले, त्यांनी घेतले व समोरच्या खुर्चित बसल्या. बहुतेक पैसे मोजायलाच बसल्या असतील. मला फक्त त्यांचे डोकेच दिसत होते. अशा एका साइडला होत्या.
साधारण अर्ध्या तासाने त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, ‘मॅडम तुम्ही मला कमी पैसे दिलेत.’ मी एकदम घाबरले. मी तर ह्या बाईंना बरोबर चार हजार दिले. विड्रॉल बघितली. मागे नोटांचा तपशील बघितला. तोही बरोबर. त्या म्हणाल्या, ‘मॅडम मी चाळीस हजार रूपये काढले आणि मला तुम्ही हे एवढेसेच पैसे दिलेत.’ त्यांच्या हातात चार हजार पण दिसत नव्हते. साधारण दोन हजारच त्यांच्या हातात दिसत होते. मी त्यांना म्हणाले, ‘मी पाच हजारांच्यावर पेमेंट करूच शकत नाही; चाळीस हजार असते तर तुम्हाला कौंटरला टोकन दिले असते आणि तुम्हाला कॅशियरनी पेमेंट केले असते.’ पण त्या ऐकण्याच्या मनःस्थितीतच नव्हत्या. मी केबीन बंद करून बाहेर आले. बरं तर बरं, तोपर्यंत कॅश अवर्स बंद झाले होते. मी त्यांना विचारले, ‘पैसे खाली पडले नाही ना? पर्समध्ये बघा नीट.’ पण कसलं काय नी कसलं काय. त्या बाई रडायलाच लागल्या, ‘आता मी घरी तोंड कसं दाखवू? माझं घरी हसं होईल, माझी छी थुं होईल वगैरे वगैरे’ आणि खूप रडायला लागल्या. त्यांचं रडणं ऐकून सर्व स्टाफ, मॅनेजर सर्वजण बाहेर आले. प्रत्येक जण त्यांची समजूत काढतोय पण त्यांचं रडणं काही थांबेना. शेवटी त्यांना त्यांच्या घरी सुखरूप सोडून यायचं असं ठरलं. मी माझे एक सहकारी रिक्षाने त्यांना घेऊन निघालो. थोडं अंतर गेल्यावर त्यांना एकदम आठवलं आणि म्हणाल्या, ‘मॅडम मॅडम मी पैसे मोजत असताना माझ्या बाजूच्या खुर्चीवर एक लंबू माणूस बसला होता तो मला म्हणाला आणा मी मोजून देतो पैसे, मी पण त्या माणसाच्या हातात पैसे दिले हो, त्याने तर नसेल लांबवले?’ हे ऐकलं आणि माझा आणि माझ्या सहकाऱ्याचा जीव भांड्यात पडला. ह्या बाईंना हिप्नॉटिझम केले हे लक्षात आले.
आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो त्यांच्या यजमानांनी दार उघडले तेही बँकेत येत असल्याने माझी त्यांची पण चांगली ओळख होती. त्यांना आम्हाला पाहून आनंद झाला. म्हणाले, ‘अरे व्वा, आज आमच्या घरी आमच्या सौ. घेऊन आल्या वाटतं तुम्हाला.’ आम्ही फक्त हसलो.त्यांनी आम्हाला बसायला सांगितलं पाणी वगैरे प्यायलो.आणि येण्याचे प्रयोजन सांगितले.
बँकेत घडलेला प्रसंग सांगितला. त्या बाईंना खूप ओशाळल्यासारखे झाले. त्यांच्या यजमानांनी त्यांची छान समजूत काढली. त्या म्हणाल्या, ‘अहो मला तुम्ही चाळीस हजार काढायला सांगितले होते ते मी पार विसरूनच गेले आणि ह्या मॅडमना उगाचच दुखवले.’ मी म्हणाले, ‘अहो तुम्ही मुद्दाम नाही केलंत. मला बिलकुल वाईट वाटले नाही. उलट थोडेच पैसे त्या भामट्याने लांबवले.’ त्यावर त्यांचे यजमान म्हणाले, ‘बरं झालं तू चाळीस हजार काढायचं विसरलीस नाहीतर त्या भामट्यानी वीस हजार नेले असते. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे नेहमी लक्षात ठेव. जा ह्या बँकेतल्या लोकांसाठी चहा कर.’ मॅडमनी चहा बरोबर लाडू चिवडा पण दिला.
आम्हाला हायसे वाटले देवा जवळ मी प्रार्थना केली देवा अशी वेळ कुणावरही आणू नकोस.
-सीमा हरकरे
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply