मध्यप्रदेश आणि मराठी अस्मिता या विश्वनाथ शिरढोणकर लिखित पुस्तकाला मराठी साहित्य अकादमी, सांस्कृतिक विभाग, मध्यप्रदेश शासन यांचे निर्देशक श्री अश्विन खरे यांनी लिहिलेली प्रस्तावना
साधारणत: असे मानले जाते की, उत्तर दिग्विजयाच्या मोहिमेवर निघालेल्या मराठी सेनेसमवेत अनेक कुटुंब बृहन्महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थायिक झाली. महाराष्ट्राच्या सीमारेषेच्या अवतीभोवती असलेले राज्य म्हणजे मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश. बृहन्महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या लोकसंखेच्या १८ टक्क्यांपेक्षाही जास्त लोकसंख्या आहे. त्यात या वरील राज्यात मराठी माणूस प्रामुख्याने राहतो. मध्यप्रदेशात मराठी भाषिक माणूस भाषेच्या आधारे दुसऱ्या क्रमांकावर येतो. इंदूरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे, धार व देवासचे पवार राजवंश स्थापित झाले तर संपूर्ण नर्मदेच्या दोन्ही काठी मराठी सरदारांचे स्थायिक वास्तव्य झाले. मध्यप्रदेशच्या इंदूर शहरात अंदाजे ४ लक्ष मराठी माणसं वास्तव्यास आहेत; तर ग्वाल्हेर, भोपाळ, जबलपूर, उज्जैन, देवास, धार, महू, रतलाम, बऱ्हाणपूर, खांडवा, होशंगाबाद, टेंभूर्णी, हरदा, छिंदवाडा, बेतुल, इटारसी, विदिशा इत्यादी ठिकाणी मराठी माणसाचे चांगलेच वास्तव्य असून तेथे महाराष्ट्र मंडळ व इतर सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक संस्था अस्तित्वात आहेत. प्रत्येक महाराष्ट्रीय कुटुंब आपले संस्कार, साहित्य आणि सांस्कृतिकतेचा वारसा जोपासण्याचे काम करत आहे.
कै. कृ. गं. कवचाळे यांनी इंदूरमध्ये संपन्न झालेल्या २० व्या मराठी साहित्य संमेलनाच्या वेळेस १९३९ साली, ‘मध्यभारतीय मराठी वाङ्मय (१८६१ ते १९३६) हे पुस्तक प्रकाशित केले होते. यानंतर महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरतर्फे १९३७ ते २०१० पर्यंतचा एकूण मराठी साहित्याचा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले गेले. कथा, कविता, कादंबरी, ललित लेखनाचे काम बहुतांश पूर्ण झालेले असून नाटकांच्या इतिहासाचे काम सध्या अपूर्ण आहे.
विश्वनाथ शिरढोणकर हे आपल्या पुस्तकात मध्यप्रदेशच्या मराठी साहित्याचा संपूर्ण इतिहास असल्याचा दावा करत नाहीत; पण त्यांचे हे पुस्तक मध्यप्रदेशात गेल्या दोनशे वर्षात मराठी माणसाने जी भरारी घेतली आहे. त्यात विविध साहित्यात, नाटकांमध्ये, संगीतात, चित्रकलेत, मूर्तीकलेत, उद्योग व्यवसायात, राजकारणात व सामाजिक क्षेत्रात वैयक्तिकरित्या आणि सामाजिक संस्थांसकट विविध क्षेत्रातदेखील अत्यंत कौतुकास्पद कामं झालेली आहेत, त्याची नोंद जमेल तशी माहिती गोळा करून या पुस्तकात दिलेली आहे.
खरंतर महाराष्ट्रात, बृहन्महाराष्ट्रातल्या कोणत्याही गोष्टींची योग्य ती दखल घेतली जात नाही ही अनेक वर्षांची बृहन्महाराष्ट्रात राहणाऱ्यांची खंत आहे आणि आमची नाळ महाराष्ट्राशी जुळलेली असल्याने ही खंत कैकपटीने जाणवते. मध्यप्रदेशातील मराठी माणसाच्या प्रगतिची महाराष्ट्रात देखील ओळख व्हावी या दृष्टीने विश्वनाथ शिरढोणकर यांचे हे पुस्तक मध्यप्रदेशातील मराठी माणसाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वाटचालीची ओळख करून देण्यात नक्कीच यशस्वी ठरेल अशी मला खात्री आहे.
-अश्विन खरे
निर्देशक
मराठी साहित्य अकादमी, सांस्कृतिक विभाग, मध्यप्रदेश शासन,
भोपाळ, मध्यप्रदेश
Leave a Reply