नवीन लेखन...

मध्यप्रदेश आणि मराठी अस्मिता – 2

महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या अंदाजे १८ टक्के मराठी माणूस हा बृहन्महाराष्ट्रात वास्तव्यास असतो. मराठ्यांच्या साम्राज्याला टिकविण्यासाठी आणि एकेकाळी त्यांचा झेंडा अटकेपार फडकविण्यासाठी, निमूटपणे मराठ्यांच्या सैन्याबरोबर बृहन्महाराष्ट्रात गेलेला हा मराठी माणूस गेल्या २५० पेक्षा जास्त वर्षांपासून त्या त्या प्रांतात आपापल्यापरीने स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत आनंदी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजानंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी नर्मदेपारचा मुलूख पादक्रांत करून थेट दिल्लीपर्यंत भरारी मारली. त्याच सुमारास (आजच्या मध्यप्रदेशमध्ये व बुंदेलखंडात) मराठा साम्राज्याच्या स्थायीत्वासाठी ग्वाल्हेरला शिंदे, इंदूरला होळकर, धार व देवासला पवार यांची राज्ये स्थापित झाली. या सर्वांसोबत मराठी फौज, दिवाण-दरबारी कारकून, शिक्षक, मोठे वैदिक शास्त्री, धर्माचार्य, कवी, लेखक, गायक इत्यादी आपल्या कुटुंबियांसोबत या प्रांतात आले व आपल्यासोबत मराठी संस्कृती घेऊन इथेच स्थायिक झाले.

माळव्यातल्या होळकर राज्यात लोककल्याण व सर्वधर्मसमभाव या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे नाव संपूर्ण भारतात मोठ्या आदराने घेतले जाते. त्याचप्रमाणे ग्वाल्हेरचे पराक्रमी महादजी शिंदे यांचा दरारा दिल्लीपर्यंत होता. स्वाभाविकरित्या या दोघांच्या कारकिर्दीत मराठी संस्कृती व साहित्याला प्रोत्साहन देण्याच्या काळाची सुरूवात देखील म्हणता येईल.

आमची नाळ महाराष्ट्राशी जुळली आहे. भावनिकदृष्ट्या आम्ही त्या मातीशी जुळलेले आहोत. आमचे सुतक सोयरे संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. आमचे कुलदैवत महाराष्ट्रात आहे व त्याप्रमाणे आम्ही सर्व रीती, परंपरा मानतो. महाराष्ट्रातलेच सर्व सणवार आम्ही आनंदाने साजरे करतो. आम्ही महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना, कलावंताना, संगीतकारांना, नाटकांना महाराष्ट्रातून आपुलकीने बोलावून त्यांना नेहमी उचित आदर सत्कार देतो.

इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की, भारतात लोकशाहीसाठी घटनेचे जनक भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म याच प्रांतातल्या महू (डॉ. आंबेडकरनगर) मध्ये झाला व गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्म इंदूरमध्ये झालेला आहे. देशाला दोन भारतरत्न दिल्याचा आम्हा मध्यप्रदेशवासीयांना अभिमान आहे.

मध्यप्रदेशच्या मराठी माणसाने, राजकारणात, खेळात, उद्योग आणि व्यवसायात व शिक्षण क्षेत्रातदेखील बरीच भरारी घेतली आहे. त्यांचा सर्वांचा उल्लेख देखील कुठे तरी व्हायला हवा. तरी काही ठळक नावं घ्यायची झाली तर वर्तमान लोकसभा अध्यक्ष सुमित्राताई महाजन, ज्यांचे नाव आदराने संपूर्ण भारतात घेतले जाते अशा प्रदेशात युती शासन आणणाऱ्या ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे, त्यांचे पुत्र केंद्रात अनेक वर्ष यशस्वी मंत्रीपद शोभविणारे कै. माधवराव शिंदे, ग्वाल्हेरचे लोकसभा खासदार राहिलेले कै. नारायण कृष्ण शेजवलकर, काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षे जिल्हा अध्यक्षपदी राहणारे ग्वाल्हेरचे प्रसिद्ध समाजसेवी शतायू आयुष्य जगणारे, कै. (डॉ.) रघुनाथराव पापरीकर, ग्वाल्हेरहून अनेक वर्षे भाजपचे आमदार असलेले कै. माधव शंकर इंदापूरकर, कै. भाऊसाहेब पोतनीस, प्रचंड मतांनी जिंकून आलेले एकेकाळी असलेल्या लोकसभा जबलपूरचे खासदार कै. बाबुराव परांजपे, राज्यात मंत्रीपद शोभविणारे कै. कानिटकर, प्रसिद्ध पुरातत्त्व विशेषज्ञ उज्जैनचे विष्णु श्रीधर वाकणकर, उज्जेनचे माजी आमदार हरिभाऊ जोशी, होशंगाबादचे मधुकर हर्णे, बिन्याचे आमदार सुधाकर बापट, खरगोणचे कृष्णमुरारी मोघे! मोघे हे पाच वर्षे इंदूरचे महापौरदेखील होते. ही सर्व नावं गाजलेली आहेत. इतर अनेकांनी आपआपल्या कामांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. यात प्रामुख्याने, बाळकाका उध्वरेषे, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातले इंदूरचे अश्विन खरे, जयंत भिसे, मुकुंद कुळकर्णी, ग्वाल्हेरचे महापौर विवेक शेजवलकर, जबलपूरच्या महापौर सविता गोडबोले, बऱ्हाणपूरचे महापौर अनिल भोसले, गुणाचे (मध्यप्रदेश) खासदार ज्योतिरादित्य शिंदे, धारचे करणसिंह पवार, नगरसेवक असलेल्या प्रसिद्ध समाजसेविका विनिता धर्म, ग्वाल्हेरचे संगीतज्ज्ञ डॉ. प्रभाकर लक्ष्मण गोहदकर, भोपाळचे विवेक सावरीकर आणि ज्योती सावरीकर, जबलपूरचे विवेक टेंबे आणि सौ. शिल्पा ताम्हणे, इंदुरचे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब तराणेकर, चित्रपट सृष्टीत नाव गाजवणारे गीतकार स्वानंद किरकिरे आणि गायिका कीर्ती किल्लेदार अशी फार मोठी यादी आहे. एकूणच मध्यप्रदेशात मराठी कौशल्य आणि प्रतिभेची कमी नाही.

प्रांताच्या विकासात मराठी माणसाच्या लक्ष्यवेधी कामगिरीची नोंद घेत मध्यप्रदेश शासनाने ४० लक्ष मराठी बांधवांच्या भावनांचा आदर राखून मध्यप्रदेश संस्कृती विभागाअंतर्गत मराठी साहित्य अकादमीची स्थापना २००७ साली केली. सध्या इंदूरचे अश्विन खरे हे मराठी अकादमीच्या निदेशक या पदावर असून मराठी साहित्य व सांस्कृतिक वाटचालीत त्यांचा मोठा वाटा आहे.

हे माहितीपूरक, महत्त्वपूर्ण असे पुस्तक लिहिण्यासाठी मला ज्येष्ठ साहित्यिक माधव साठे आणि इंदूरचे अश्विन खरे यांनी बरीच माहिती पुरविली, त्यासाठी मी या दोघांचा मनापासून आभारी आहे. ‘चपराक प्रकाशन’ (पुणे) चे घनश्याम पाटील यांनी आपुलकीने हे पुस्तक प्रकाशित करण्याचे मनावर घेऊन ते प्रकाशित केले यासाठी मी त्यांचा व संपूर्ण ‘चपराक प्रकाशना’च्या टीमचा मनापासून आभारी आहे.

दिनांक: १३ मे २०१७

विश्वनाथ शिरढोणकर

Avatar
About विश्वनाथ शिरढोणकर 7 Articles
मी एक सेवानिवृत्त असून साहित्यिक आहे. माझी हिंदी मराठीत 25 पुस्तके प्रकाशित असून, kUKU FM वर कादंबरी - मी होतो मी नव्हतो - 65भागात(अवधी-6-30 तास) आणि AAVAAJ.COM वर 16 कथा ऑडियो स्वरुपात उपलब्ध आहे. कादंबरी महाराष्ट्र शासन च्या ग्रंथमान्य यादीत सामील असून अनेक विद्यापिठात माझी कथा, कविता पाठ्यक्रमात सामील आहे.100 पेक्षा जास्त कथा,250 पेक्षा जास्त कविता आणि 150 पेक्षा जास्त लेख प्रकाशित. अनेक दिवाळी अंकात नियमित प्रकाशन. अनेक पुरस्कार/सम्मान प्राप्त.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (चंद्रपूर) सकट अनेक शहरात साहित्यिक कार्यक्रमात सहभाग.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन माजी अध्यक्ष, डॉ. श्रीपाल सबनीस आणि श्री भारत सासणे यांच्या प्रस्तावना माझ्या पुस्तकांसाठी लाभल्या आहेत. मी बृहन्महाराष्ट्रांतील एक आघाडीचा साहित्यिक आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..