दर रविवारी वडिल घरात तास दोन तास पेटीवादन करत ,मला फार आवडत असे.ते स्वतः अनेक वाद्ये वाजवत..पेटी,व्हायोलिन, बासरी, सतार, तबला..आणि उत्तम गातही .तो काळ, ती वेळ म्हणजे माझा त्यात तल्लीन होणे. होण्याचा .त्यावेळी आईने काही कामासाठी हाक मारली तरी माझं तिकडे लक्ष नसे..त्याचा अर्थ सगळ्यांनी पुढे ..मला कमी ऐकू येतं असा घेतला..घरात ते कोणीतरी बोलताना मी ऐकलं..आणि खरं तर ते माझ्या पथ्य्यावरच पडलं…पण कोणाच्याही हे लक्षात आलं नाही की हे फक्त “त्या वादनावेळीच” होतंय.
…आम्ही हुबळीला होतो तेव्हां मी चौथीत होते.,त्यावेळी शाळेत नुकताच गाण्याचा क्लास सुरु झाला होता..पण पाचवीपासून ,त्यामुळे मला सामील होता आलं नाही. एक मोडक नावाचे शिक्षक होते..मी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत त्यांना जाऊन भेटले आणि मला पेटी शिकवाल का म्हणून विचारले होते..ते ” हो..हो” म्हणाले , पण जेव्हां मी पिच्छा सोडला नाही तेव्हां त्यांनी मला ” सा रे ग म…” वाजवून कोणतं बोट कुठे ठेवायचं वगैरे सांगितलं.,मी ते लक्षात ठेवून मनगटावर त्याची प्रॅक्टिस करु लागले.मनगटावरील पाच बोटे बरोब्बर जमतात.येथे लिहिणं जरा कठिण आहे.,मला छानपैकी जमतं पाहिल्यावर त्यांनी मला त्यावेळी गाजत असलेल्या नागिन सिनेमातील “मन डोले” गाण्याच्या बीनचं नोटेशन सांगितलं..जेवणाच्या सुट्टीत हा उपद्व्याप मी सुरु केला होता.माझी आवड आणि मला जमतं हे बघून ते मला कधीकधी वाजवू देत.
..त्यानंतर वडिलांची सोलापूरला बदली झाली आणि माझ्या त्या अत्यंत आवडत्या छंदात खंड पडला. पण सोलापूरला मला गाणं शिकायला मिळालं..माझ्या एका शिक्षकांनीच वर्गात माझं गाणं ऐकून मला शाळेतील क्लासमध्ये पाठवलं.
त्यावेळी मी पाचवीत होते. सहावीत गेले..
…शाळा सुरु झाली त्याच दिवशी माझं टाॅन्सिल्सचं आॅपरेशन झालं. दुसर्या दिवशी घरी आले.भावंडं शाळेत गेली, मी घरी एकटीच ..बोलता येत नव्हतं..मी वडिलांची हार्मोनियम काढली आणि हात फिरवत राहिले..नागिनची ती बीन वाजवून झाली.(आईचा ओरडा चालू होता.,बाबांना न विचारता पेटी काढलीस, ते चिडतील…वगैरे वगैरे , मी कागदावर लिहून तिला सांगितलं..मी सांगेन त्यांना )….त्यानंतर दिवसभर बसून मी “झनक झनक पायल बाजे” सिनेमातील ” नैनसो नैन नाही मिलाओ” हे गाणं बसवलं..अगदी मस्त जमलं होतं. मीच माझ्यावर खूष झाले होते.
…संध्याकाळी वडिल घरी येताच आईने त्यांना खबर दिलीच..”ही तुमची पेटी काढून दिवसभर वाजवत बसली होती ” त्यांचं चहापाणी झाल्यावर ते अगदी शांतपणे आले आणि त्यांनी मला विचारले..मी त्यांना लिहून सांगितले, हलकेच हसून मला म्हणाले…”ठीक, काढ पेटी आणि दाखव मला वाजवून”..मी वाजवून दाखवलं ..ते माझ्याकडे बघत ऐकतच होते..,वाजवून होताच मला पाठीवर शाबासकी देऊन म्हणाले..” अगं अगदी बरोब्बर आणि छान वाजवलंस, बसवलंस की….ठीक आहे, आजपासून तुला पेटी वाजवण्याची मुभा..जेव्हां पाहिजे तेव्हां काढ आणि वाजव ..फक्त अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही “…
..मी आश्चर्यचकितच..वडिल न रागावता आपलं कौतुक करताहेत पाहून…माझ्यापुढे इंद्रधनुष्यच साकारलं होतं..खरं तर ते थोडे तापट..घरात सगळे त्यांना घाबरुन…पण गुणांची कदर करायचे..आणि संगीत त्यांच्या आवडीचाच विषय.
..आणि मी हळूहळू इतर गाणी बसवण्याची प्रॅक्टिस करु लागले..आधी वाजवून गाणं जमत नसे..गाणं म्हणायला सुरवात केली की पेटी थांबत असे..मग हळूहळू त्याचा सराव सुरु केला..,वेळ लागला पण जमू लागले..त्याचा फायदा पुढे झाला..बाहेर माझे स्वतंत्र कार्यक्रम करताना मला पेटीची साथ लागत नसे..मी सोबत फक्त तबलजींना घेत असे. आणि मला नोटेशनची गरज लागत नव्हती आणि लागत नाही. कोणतंही गाणं वाजवू शकते..फक्त ऐकलं की वाजवता येतं ..ही आई-वडिलांकडून मिळालेली देणगी आहे…दोघंही गात, पेटी वाजवत. आणि माझ्यात ते आलं आहे…खरंच त्याबाबतीत मी नशीबवान आहे म्हणायला हवे .
आता मी विद्यार्थ्यांना ही घरी शिकवते..गाणं आणि हार्मोनियमही. खूप लहानपणापासूनची आवड आणि इच्छा पूर्ण झाली एवढे खरे.
आणि ज्या पेटीवर शिकले ती वडिलांची पेटीही आज माझ्याकडे आहे..अगदी उत्तम आवाज असलेली..खाली फोटो टाकला आहे.८० वर्षाहूनही जुनी हार्मोनियम आहे ही…
-देवकी वळवडे
छान , जिद्द ,