” राणी लक्ष्मीबाईंचं स्मरण झालं की कृतकृत्य वाटतं .
रणांगणात त्यांनी देह ठेवला .
देह ठेवला असं म्हणायचं , पण प्रत्यक्षात इंग्रजांच्या शस्त्रांनी घायाळ होऊनही , अखेरच्या श्वासापर्यंत देशाच्या स्वातंत्र्याचा विचार करणारा तो विजिगीषू अजरामर आत्मा , क्रुद्ध होऊन या धरेवर त्वेषाने लढला होता .
राणीच्या मनातील अंगार आणि तिचं कर्तृत्व अलौकिक होतं , पण ते कुणाला ठाऊक होतं की नव्हतं असा संभ्रम निर्माण व्हावा असा इतिहास सांगितला जात होता .
माझ्या मनात त्याविषयीचा संताप होता .
खरा इतिहास आणि क्रांतिकारकांचं हौतात्म्य , इतिहासकारांनी जसंच्या तसं मांडायला हवं होतं .पण खऱ्या इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात आलं की पुढच्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याचा दैदिप्यमान इतिहास कळू नये अशीच व्यवस्था केली गेली आहे . खऱ्या खोट्याची भेसळ करून उत्तुंग व्यक्तिरेखांना हिणकस ठरवलं जात आहे . परकीय आक्रमकांना नायक ठरवण्याची घाई झाली आहे .
आपला लिहिला गेलेला इतिहास निर्भेळ नाही . याची तीव्र जाणीव वेदनादायक वाटू लागली आणि मग मलाच आता लेखणी उचलायला हवी , असं वाटू लागलं .
इतिहास काळापासून आपण एक आहोत , भविष्यात सुद्धा आपण एक राहू , ही खरी राष्ट्रीयत्वाची भावना !
पण आत्मभान हरवून जाण्यासाठी , आत्मसन्मान संपविण्यासाठी , न्यूनगंड निर्माण होण्यासाठी , दुही पेरण्यासाठी जाणीवपूर्वक विकृत लिखाण करणाऱ्यांना उत्तर द्यायलाच हवं , असं वाटू लागलं .
परकीय आक्रमकांच्या टाचेखालून राष्ट्रास स्वतंत्र करणाऱ्या , राष्ट्रास पुनरज्जीवित करणाऱ्या विजयशील व्यक्तिमत्त्वांचा इतिहास मांडायलाच हवा होता.
त्यासाठी लेखणी हाती धरायलाच हवी होती .
त्याला समर्पक नावसुद्धा सुचलं .
१८५७ चे स्वातंत्र्यसमर !
त्या युद्धातील एका ज्वलंत समिधेचं नाव होतं , झाशीची राणी लक्ष्मीबाई !
राणी लक्ष्मीबाई म्हणजे अमर्याद आणि उत्तुंग कर्तृत्वाचा महामेरू !
शेवटच्या श्वासापर्यंत रणांगणात तळपत राहणारी रणदुर्गा म्हणजे राणी लक्ष्मीबाई !
स्वतःचं दुःख बाजूला ठेवून, परवशतेचा शाप मिळालेल्या हिंदुभूमीला आणि जुलूम जबरदस्तीच्या दुःखात बुडालेल्या प्रजेला सावरण्यासाठी, स्वतःवर झालेले आघात, झालेल्या जखमा विसरून, स्वभूमीसाठी आयुष्य पणाला लावणारी धीरोदात्त राणी म्हणजे लक्ष्मीबाई !
अबला असणाऱ्या स्त्रियांचा स्वाभिमान म्हणजे राणी लक्ष्मीबाई !
आपल्या अस्तित्वाने, कार्यकुशलतेने, खंबीरपणाने परिस्थिती हाताळणारी हिंमतवान सेनानी , समृद्ध आणि सुरक्षित राज्य देण्यासाठी सदैव धडपडणारी राणी म्हणजे लक्ष्मीबाई !
सुंदर, सुसंस्कृत,धोरणी,चतुर आणि आपुलकीने , जिव्हाळ्याने सर्वाना आपलंसं करून ठेवणारी गृहिणी म्हणजे राणी लक्ष्मीबाई !
हिंदुस्थानच भाग्य म्हणून आदिशक्तीने राणी लक्ष्मीबाईंच्या रुपात जन्म घेतला. हिंदुस्थानच परमभाग्य म्हणून राणीनं १८५७च्या स्वातंत्र्यसमरात आणि त्यापुढं झालेल्या संघर्षात अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा दिली . राणी लक्ष्मीबाईंचे ओजस्वी चरित्र, तेजस्वी नेतृत्व, करारी व्यक्तिमत्व , लढाऊ कर्तृत्व, पुढच्या अनेक पिढ्याना नक्की प्रेरणादायक होईल.
हे मला जगासमोर आणायलाच हवं .
त्यासाठी १८५७ च्यापूर्वी झालेलं समरांगण सर्वांसमोर आणायला हवं. सगळा खरा इतिहास हिंदुस्थानवासीयांसमोर मांडायला हवा .
परदेशी आणि एतद्देशियानी लिहिलेला विकृत , त्यांना हवा तसा ,मोडतोड करून लिहिलेला इतिहास , नीटपणे सांगायला हवा .
तो इतिहास दैदिप्यमान आहे , ओजस्वी आहे , प्रेरणादायक आहे आणि क्रांतिकारकांना कार्यप्रवण बनवणारा आहे .मलाच तो इतिहास सांगायला हवा .
हे आदिशक्ती असणाऱ्या रणरागिणी राणी लक्ष्मी माते माझ्या लेखणीत तू अंगार होऊन ये . खड्गाची धार होऊन ये . तुझ्या मनगटातील अतुलनीय धैर्य होऊन ये, तुझ्या मनातील खंबीरता आमच्या हृदयात उतरू दे , परकीय शत्रूवर तुटून पडतानाचा त्वेष , जोश , हिंमत आमच्या व्यक्तिमत्वात भिनू दे. माते , तुझ्यासारख्या अनेक क्रांतिज्वालांचे स्फूर्तिदायक चरितगान गाण्यासाठी माझ्या कंठात आणि लेखणीत अखंडित बळ दे. मला मांडायचा आहे , १८५७ चा रक्तरंजित स्वातंत्र्यसंग्राम ! ज्याला उद्दामपणे अनेकांनी १८५७ चे बंड म्हणून संबोधले . ते बंड नव्हतेच . बंड असते ते स्वकीय सत्ताधीशांच्या विरोधात , पण तुम्ही सर्वांनी केला तो परकीय आणि इंग्रजांच्या जुलमी , अन्याय्य राजवटीविरोधातील स्वातंत्र्य संग्राम ! ते १८५७ चे स्वातंत्र्ययुद्धच होते . मी ते तसेच मांडणार आहे , आणि तुमचा पराक्रम , तुमचे बलिदान पुढच्या पिढ्यांसाठी ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून जपून ठेवणार आहे .आजवर होऊन गेलेल्या क्रांतिकारकांनो, तुम्हाला , विनायक दामोदर सावरकर नावाच्या , क्रांतियज्ञातील एका समिधेचे कोटीकोटी प्रणाम !!!
वंदे मातरम !!!
( क्रमशः)
नावासह सर्वत्र पाठवा .
श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी,
९४२३८७५८०६
Leave a Reply