पूर्वइतिहास
तक्षशिला हे भारतातली व जगातील प्राचीन विद्यापीठापैकी एक विद्यापीठ होते. त्याकाळात भारतीय संस्कृती किती पुढारलेली होती, हे समजून येते. या विद्यापीठाचा काळ सुमारे १००० वर्ष ख्रिस्तपूर्व ते इसवि ५०० मानला जातो.
विद्यापीठाचे नाव भारताचे दोन पुत्र तक्ष व पुष्कल या दोन पुत्रावरून पडले. या विद्यापीठाचे स्थान साधारण सिंधु नदीच्या पूर्वेस आठ योजने ( साधारण ५५ मैल) होते. उत्खनन विभागाच्या अंदाजानुसार विद्यापीठ ६ मैलात पसरले होते. भारतातील इतके प्राचीन वैभवशाली विद्यापीठ असूनही दुर्दैवाने आज हा भाग भारतात नाही.
भाग १ तक्षशिला विद्यापीठाचे प्रशासन व शिक्षण पद्धती —
विद्यापीठात वेगवेगळ्या विषयातील पारंगत अनेक गुरु राहत असत. म्हणून त्याला गुरुकुल पद्धती म्हटली जात असे.या विद्यापीठात भारतातीलच नव्हे तर भारतीय उपखंडातील अनेक विद्यार्थी शिकायला येत.इथे येण्याचा मार्ग खडतर व धोकादायक असे. विद्यापीठांबाहेरील कोणतीही संस्था अगदी राजादेखील प्रशासनात ढवळाढवळ करीत नसे.प्रत्येक गुरुला स्वताचे स्वातंत्र्य असे.प्रत्येक गुरुला आपला विषय ठरवायची मुभा असे. कोणत्या विद्यार्थ्याला निवडायचे यांचे त्याला स्वातंत्र्य असे.विद्यार्थी तेव्हाच परिपूर्ण मानला जाई,जेव्हा गुरूला त्याच्या परिपूर्णतेच समाधान होई. साधारण विद्यार्थी दशेचा काळ आठ वर्ष असे.त्यामुळे सोळा ते बावीस वयाची मुले आश्रमात दाखल होत ,पण विद्यार्थ्याच्या आकलन शक्ति नुसार विद्यार्थी दशेचा काळ कमीजास्त होई. विद्यार्थी गुरूच्या घरीच राही.निपुण झाल्यावर त्याला कोणतेही प्रमाणपत्र दिले जात नसे. गुरूचे समाधान हाच एक निकष होता आणि त्याला कोणीही आव्हान देत नसे,अगदी राजपुत्र शिकत असला तरी राजा सुद्धा दखल देत नसे. इथे फक्त उच्च शिक्षणासाठीच विद्यार्थी येत.या विद्यापीठाची ख्याती इतकी होती की विद्यार्थी आपल्या घरातील सुरक्षितता बाजूला ठेऊन व दूरच्या मार्गातील धोके पत्करून शिकायला येत,आणि पालक सुद्धा पाठवत.अनेक संदर्भ दाखवतात की बनारस,राजगढ, मिथीला,उज्जैन, कोसला अश्या दूरच्या भागातून विद्यार्थी येत. तक्षशिला देशाची बौद्धिक राजधानी होती. अश्या प्रकारे तक्षशिला देशावर शैक्षणिक आधिपत्य गाजवत होती. देशांच्या इतर भागात शिकवले जाणारे अभ्यासक्रम तक्षशिलाशी संलग्न होते.
– रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply