हवा प्रदूषण हे अनेक रोगांना कारण ठरणारे आहे. जागतिक ‘आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात. प्रदूषकांची हवेतील पातळी मोजून ती हवा श्वसनास योग्य की अयोग्य ते ठरवले जाते. यात एअर-गोचे एक एअरमीटर येते त्यात हवेतील हानिकारक घटक मोजले जाते. त्यानंतर एलईडी प्रकाशतात. जेवढे एलईडी प्रकाशित होतील त्या प्रमाणात हवा प्रदूषित समजली जाते. कमी एलईडी प्रकाशित झाले तर हवा कमी प्रदूषित आहे असे समजतात व जास्त एलईडी प्रकाशित झाले तर हवा जास्त प्रदूषित आहे असे समजले जाते.
कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण मोजण्याच्या यंत्राला कार्बन मोनॉक्साईड मीटर असे म्हटले जाते. जवळपास सर्वच जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून कार्बन डायॉक्साईड वायू तयार होतो. हा वायू वातावरणात साठून राहिल्याने त्याचा एक थरच तयार होऊन पृथ्वीचे तपमान वाढते. जेव्हा एखाद्या पदार्थाचे ऑक्सिजनमुळे होणारे ज्वलन व्यवस्थित होत नाही, तेव्हा कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होतो. जेव्हा आपण न्हाणीघरात बॉयलर वापरतो, त्या वेळी तो ज्वलनासाठी लागणारा ऑक्सिजन त्या खोलीतून घेतो. खोली बंदिस्त असेल तर त्याला ज्वलनासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू तयार होऊ लागतो. वाहनांच्या इंधनाचे योग्य प्रकारे ज्वलन झाले नाही तरी त्याची निर्मिती होते.
हवेतील कार्बन मोनॉक्साईडपासून वाचण्यासाठी बायोमिमेटिक व इलेक्ट्रॉनिक अलार्म वापरले जातात. ब्लॉब डिटेक्टरमध्ये मध्यभागी एक जो रंगीत भाग असतो तो कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढल्यास काळा पडतो. इलेक्ट्रॉनिक अलार्म मॉनिटर, मेटल ऑक्साईड डिटेक्टर व इलेक्ट्रोलिटिक डिटेक्टर असेही प्रकार यात उपलब्ध आहेत. काही डिटेक्टरर्समध्ये कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण थेट आकड्यांच्या रूपात दाखवले जाते.. प्रदूषण करणाऱ्या वायूचे प्रमाण हे पार्ट्स पर मिलियन (पीपीएम) या एककात मोजले जाते. ३५ पीपीएमच्या वर, असलेले कुठलेही प्रमाण हे धोकादायक मानले जाते. कुठल्याही शहरात जेव्हा वाहनांचे प्रमाण वाढते, त्यावेळी हवेत कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण वाढत असते. चीनमधील, बीजिंग येथे तर दर दिवसाला एक हजार मोटारींची विक्री होत असल्याने प्रदूषणाचे प्रमाण फार वाढले होते. त्यामुळे शेवटी स्थानिक प्रशासनाला मोटारींच्या विक्रीवर नियंत्रण घालावे लागले यावरून कार्बन मोनॉक्साइडमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात येते.
Leave a Reply