(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ प्रतिभा नेरलेकर ह्यांनी लिहिलेला हा लेख)
देश-विदेशात गणपतीची लाखो मंदिरे आहेत. एकट्या बंगलोर शहरात तर १० हजारावर मंदिरे आहेत. महाराष्ट्रात तर एकही गाव असे नसेल की जेथे गणपतीचे मंदिर नाही. पण श्रीगणेश कुटुंबाचे मंदिर तुम्ही पाहिले आहे का? असा प्रश्न केला तर अनेकांचे उत्तर मात्र नकारार्थी येईल. श्रीगणेशाच्या पत्नी सिद्धी आणि बुद्धी व त्यांची मुले लक्ष आणि लाभ. याची माहितीच अनेकांना नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबाचे एकत्रित असे मंदिर असेल याबद्दल फारसे कुणाला ठाऊक नाही. पण आपला महाराष्ट्र त्यादृष्टीने भाग्यवान म्हणावा लागेल. रायगड जिल्ह्यातील कनकेश्वर येथे अलिबागपासून साधारण आठ कि.मी. अंतरावर हे श्रीगणेश कुटुंबाचे मंदिर अस्तित्वात आहे. ‘श्री रामसिद्धी विनायक’ असे या मंदिराचे नाव आहे.
• १००० फूट उंचीवर मंदिर
कनकेश्वर येथील श्रीगणेश कुटुंबाच्या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्याच्या नावापासूनच या वैशिष्ट्याची सुरुवात होते. देश-विदेशात अनेक नावांची गणेशमंदिरे प्रसिद्ध आहेत. पण श्री रामसिद्धी विनायक अशा नावाने श्रीगणेश कुटुंबाचे मंदिर जगात अन्यत्र कुठेही नाही. इ.स. १८७६ मध्ये या मंदिराची स्थापना झाली. तब्बल १४० वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना लंबोदरानंद स्वामींनी केली. पूर्वाश्रमीचे त्यांचे नाव रामचंद्र जोशी. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथील ते रहिवासी होते. ते अत्यंत गणपतीभक्त होते. त्यांचा जन्म १८१८ सालचा. औंदुबर येथे गुरुदत्तात्रयांचे पूजन, प्रदक्षिणा अशी नित्य गुरुसेवा सुरू असतानाच त्यांना स्वप्नदृष्टांत झाल्यामुळे ते मोरगावला गेले. तेथे त्यांनी श्री ब्रह्मानंद स्वामींकडून गणेशदीक्षा ग्रहण केली. आपल्या गुरुंकडून त्यांनी दंडग्रहण केले. इ.स.१८८४ मध्ये त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. संन्यासाश्रमातील त्यांचे नाव श्री लंबोदरानंद असे आहे. कनकेश्वर येथील श्रीगणेश कुटुंबाचे मंदिर समुद्रसपाटीपासून १००० फूट उंचीवर असून तेथे जाण्यासाठी ७५० पायऱ्या चढून जावे लागते. डोंगरावरील आरक्षित जंगलात हे श्रीगणेशाचे स्थान असून ती जागा छत्रपती शिवरायांचे आरमार प्रमुख सरखेळ कान्होजी आंग्रे यांच्या वंशजांकडून मंदिर उभारण्यासाठी बक्षीस पत्राद्वारे श्री लंबोदरानंद स्वामींना मिळालेली आहे. जंगलात हे ठिकाण असल्याने हवा थंड असते. डोंगरावर बऱ्यापैकी वनराई असल्याने उन्हाचा त्रास होत नाही. अन्य काही तीर्थ क्षेत्रांमध्ये आढळणारी गर्दी, भिकाऱ्यांचा उपद्रव, अस्वच्छता, बाजारुपणा, दक्षिणा उकळणे आदि अनेक गोष्टींपासून हे गणेशस्थान पूर्णपणे दूर आहे. शांत, शीतल वातावरण, एकांत, पावित्र्य, मांगल्य आणि भक्तीमय आस्वादात श्रीगणेश कुटुंबाचे दर्शन घेताना मन हरवून जाते.
• वैशाख महिन्यात गणेशोत्सव की
वाजत-गाजत साजरा होणारा भाद्रपदातील गणेशोत्सव सर्वांनाच ठाऊक आहे. माघी गणेशोत्सवही अनेकांना माहीत आहे. पण कनकेश्वर येथील श्री गणेशाचा जन्मोत्सव मात्र वैशाख शुद्ध पौर्णिमेस साजरा होतो. वैशाख महिन्यात गणेशोजन्म हे या स्थानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणावे लागेल. जगामध्ये अन्य कुठेही वैशाख महिन्यात गणेशोत्सव साजरा होत नाही. वैशाख शुद्ध १२ ते वैशाख वद्य १ असा पाच दिवसाचा उत्सव सोहळा संपन्न होतो. भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, काकड आरती, अथर्वशीर्षपठण, सहस्त्रावर्तन, सहस्त्र मोदकांचे हवन, पालखी आदि अनेक कार्यक्रमांची धामधूम पाच दिवस चालू असते. दरवर्षी ३०० ते ३५० भक्तगण उत्सवासाठी आवर्जून उपस्थित असतात. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कऱ्हाड, अहमदाबाद, मनमाड आदि अनेक ठिकाणाहून हे भक्तगण रंगून जातात. मंदिरात असलेली सिध्दीबुध्दी लक्ष लाभासहित श्रीगणेशमूर्ती साधारणपणे दोन फूट उंचीची असून ती गुजराथ प्रांतातील बडोद्याचे नवकोट नारायण श्रीमान गोपाळराव मैराळ यांजकडून प्राप्त झालेली आहे. मूळातच सुबक असलेल्या या मूर्तीला उत्सव-सोहळ्याच्या काळात अधिकच तेज आल्याचे जाणवते. गेली अखंड १४० वर्षे वैशाख महिन्यातील श्रीगणेश उत्सव सोहळा पूर्वीच्याच भक्तीभावाने जोशात सुरू आहे. पहाटे काकड आरतीच्या वेळी नैवेद्यास लोणीसाखर असते. द्वारयात्रा हे ही या उत्सवाचे आगळेवेगळेपण आहे. पूर्वद्वार, दक्षिणद्वार पश्चिमद्वार आणि उत्तरद्वार अशी चार दिवस यात्रा, ह्यावेळी होणारे पूजन, अष्टके, सवाया, भजनादि कार्यक्रम, आरती, दहीपोह्याचा नैवेद्य वैश्वदेव, बलिहरण, अन्नपूर्णापूजन, ब्राह्मण भोजन, अन्नसंतर्पण, पुराणवाचन, मंत्रपुष्प, कीर्तन, शेजारती आदि अनेकविध कार्यक्रमांचा आस्वाद पाच दिवसाच्या उत्सव काळात घेता येतो.
भगवान परशुरामांचा ‘कृपा प्रसाद
लंबोदरस्वामींनी श्रीक्षेत्र मोरगावी गणेशदीक्षा घेतल्यानंतर प्राण आपल्या तीर्थाटनाला प्रारंभ केला. गणेशभक्तीचा वारसा असलेले विनायक नारायण बापट हे त्यांचे पट्टशिष्य. श्री स्वामींनी आपल्या या शिष्यासमवेत प्रथम माहूरगड येथे जाऊन श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले व नंतर नर्मदा प्रदक्षिणेस प्रारंभ केला. श्रीनर्मदा परिक्रमा करीत असताना लंबोदरानंद स्वामींना भगवान श्री परशुरामांनी दर्शन देऊन श्रीऋद्धी, सिद्धी, लक्ष, लाभ सहित लक्ष्मी विनायकाची पीतवर्णाची संगमरवरी मूर्ती प्रसाद म्हणून भेट दिली. ही मूर्ती त्यांचा ध्यानधारणेसाठी होती. तिचा पूजेसाठी वापर करू नकोस असेही त्यांना सांगण्यात आले. कनकेश्वर येथे निर्मनुष्य जागी स्वामींनी अखंड तपश्चर्या करून वास्तव्य केले. भगवान परशुरामांनी त्या मूर्तीच्या रूपाने स्वामींना दिलेला कृपाप्रसादच मानला जातो. या मूर्तीचे दर्शन घेण्याचे महापुण्यही उत्सवकाळात भक्तगणांना तेथे मिळते. भगवान परशुरामाने दिलेली कोरीव मूर्ती पावणेपाच इंच उंचीची असून साडेसहा इंच रूंद आहे. त्याची जाडी सव्वातीन इंचाची आहे.
उत्सवकाळात भक्तगणांना चहापाणी, भोजन, राहण्याची सोय, आवश्यकतेनुसार प्रथमोपचाराची सुविधा देवस्थानाकडून विनामूल्य केली जाते. कनकेश्वर येथील शिवमंदिर हे त्रेतायुगातील स्वयंभू स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या दगडी बांधकामाचे मंदिर ७०० वर्षापूर्वीचे आहे. रा.स्व. संघाचे सरसंचालक गोळवळकर गुरुजींनी नवीन मंदिरे बांधण्यापेक्षा जुन्यांचा जीर्णोद्धार करावा असे सूचविल्यावरून त्यांच्या प्रेरणेने १९५७ मध्ये तेथील सभामंडपाचे नूतनीकरण श्री. श्रीधर स्वामी (सज्जनगड) यांचे शिष्य श्रीगुरूपादस्वामी (शिमोगा कर्नाटक) यांनी केले. या शिवमंदिरापासून साधारणपणे १५ ते २० फूट अंतरावर श्रीराम सिद्धी विनायक मंदिर आहे.
पुणे-मुंबई व कोकण परिसरातील भक्तगणांना जवळचे असणारे हे श्री रामसिद्धी विनायक मंदिर दुर्मिळ स्वरूपाचे आहे. तेथे गेल्यावर केवळ श्रीगणेशाचे नव्हे तर श्रीगणेश कुटुंबाचे दर्शन होते. शिवाय त्रेतायुगातील ७०० वर्षापूर्वीची पुरातन शिवमंदिराचेही दर्शन व त्याची ओळख होते. ‘एक आदर्श देवस्थान’ अशी श्री रामसिद्धी विनायकाची किर्ती दूरवर पसरलेली आहे. १९८५ ते २००० या काळात मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याने आधुनिक सोयी-सुविधा भोजनाची सोय करण्यात येते. कनकेश्वर सारख्या निर्जन व एक हजार फूट उंचीवर असलेले श्रीगणेश कुटुंबाचे मंदिर हा ऐतिहासिक ठेवा असून एक अध्यात्मिक ऊर्जा केन्द्र म्हणून त्याचं महत्त्व वादातीत आहे. या स्थानावर येताना ७५० पायऱ्यांचा डोंगर चढून येण्याचा देहदंड सोसावा लागत असल्याने भक्तगणांची एका परीने कसोटीच लागते. पण जनसंपर्कापासून दूर, बहुतांशी निर्जन, परंतु अत्यंत शीतल व निसर्गरम्य ठिकाणी आल्याने आपण परमेश्वराच्या अधिक निकट आल्याचा प्रत्यय येतो. तर मग चला कणकेश्वरी पाहण्या मंगलमूर्ती !…
• पुण्याचे लंबोदरानंद स्वामी
कऱ्हाड येथील रामचंद्र जोशी यांचे संन्यासाश्रमातील नाव श्री लंबोदरानंद स्वामी असे आहे. लंबोदरानंद स्वामी हे पुण्यवान महात्मा आणि साक्षात्कारी महापुरुष होते. रामचंद्र जोशी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास गेले असता त्यांना स्वामींनी ‘लंबोदर’ असे सर्वप्रथम संबोधिले. एवढेच नव्हे तर अवधूत उपासनेचा प्रसाद देऊन पुढे श्री परशुरामाचे दर्शन होईल असा आशीर्वाद दिला. विशेष म्हणजे श्री परशुरामाचे दर्शन होण्यासाठी श्री रेणुका देवीची कृपा असावी लागते. त्यानुसार त्यांना श्री रेणुकादर्शनही झाले. पुढे श्री नर्मदा परिक्रमा करीत असताना लंबोदर स्वामींना भगवान श्री परशुरामांनी दर्शन देऊन श्रीऋद्धी, सिद्धी, लक्ष, लाभ सहित लक्ष्मी विनायकाची पीतवर्णाची संगमरवरी मूर्ती प्रसाद म्हणून भेट दिली. केवळ ध्यानधारणेसाठी दिलेली ही मूर्ती असून तिचे दर्शन कनकेश्वर येथील श्रीराम सिद्धी विनायक उत्सव सोहळ्यात भक्तगणांना घेता येते. लंबोदर स्वामींची कर्मभूमी कनकेश्वर आहे. तेथे त्यांनी अखंड साधना व तपश्चर्या केली. इ.स. १९०२ मध्ये गणेश मंदिराशेजारीच वयाच्या ८४ व्या वर्षी समाधी घेतली. ज्यांना स्वामी समर्थांनी आशीर्वाद दिला व भगवान परशुरामाने दर्शन दिले ते लंबोदर स्वामी किती पुण्यवान असतील?
बापटांची पाचवी पिढी सेवेत कार्यरत
सातघरचे विनायक नारायण बापट हे लंबोदरानंद स्वामींचे पट्टशिष्य. बापटांची पाचवी पिढी आज कनकेश्वर येथील श्रीरामसिद्धीविनायक मंदिराच्या सेवेत कार्यरत आहेत. श्रीराम गजानन बापट (९८२०९०१८८०) आज देवस्थानचे एकपंच म्हणून काम करीत आहेत. पुण्याचे डॉ. रामकृष्ण मोरेश्वर बापट यांच्याशी झालेल्या संवादचर्चेतून या लेखाची निर्मिती देवस्थानातील काकड आरती व देव पालखीत ठेवणे हे मान स्वामींनी त्यांना दिले आहेत.
-जा श्री. वा. नेर्लेकर, ठाणे
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply