टळटळीत दुपारी जेव्हा माझी बहीण आणि आमच्या इतर मैत्रिणी घराबाहेर गोट्या खेळायच्या तेव्हा केवळ मला ऊन सहन व्हायचे नाही म्हणून मी घरातच काहीतरी करण्याचा उद्योग केला. ‘आई आणि बाळ’ यांची चित्रे काढायला सुरुवात केली. आई आणि बाळ एकत्रितपणे कधी वर्तमानपत्रात, कधी मासिकात दिसायचे ते बघून बघून मी काढायचे आणि चक्क तीस दिवसात मी तीस चित्रे काढली. विषय एकच असला तरी प्रत्येक चित्र वेगळं होतं. शेवटची दोन-तीन चित्रे तर मी अगदी स्वतःच्या मनाने काढू शकले. ती वही मी कायमची जपून ठेवली. तेव्हा कदाचित मी चौथीत असावी. त्यामुळे ‘मानसिक आनंद’ किंवा ‘मेडिटेशन’ किंवा ‘टेंशन रिलिज’ असे काही शब्द खिजगणतीतच नव्हते. अशा सकारात्मक उद्देशाने मी माझा छंद जोपासलेला नव्हता. इतकेच काय तर छंद म्हणजे काय? हेही कळण्याचे ते वय नव्हते.
त्याच्या पुढच्या वर्षी मी माझ्या शाळेतल्या एका मैत्रिणीकडे गणपतीसाठी गेले; तर गौरीपुढे तिने मण्यांची खेळणी मांडली होती. ती खेळणी मला खूप आवडली. मी तिला सहज म्हटले, ‘ही कोणी केली आहेत? ‘ तर ती म्हणाली, ‘माझ्या मोठ्या बहिणीने.’ ती आमच्या शेजारीच बसली होती म्हणून मी लगेच तिला विचारले,
‘तू मला शिकवशील का?’
तर तिने लगेच होकार दिला. इतकेच नव्हे तर त्याच दिवशी तिने घरातले काही मोती आणि तंगूस घेऊन शिकवायला सुरुवातही केली. त्यानंतर एक दिवस तिच्याकडे येऊन मी एक खेळणं शिकले आणि मला इतर खेळण कशी बनवायचा याचा अंदाज आला. आणि त्यानंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्याकडून संपूर्ण खेळण्यांचा सेट मी घेऊन आले आणि महिनाभरात मण्यांची बाहुली, बदक, हत्ती, उंट, जिराफ, मोर, पोपट, तुळशी वृंदावन अशा खूप वस्तू बनवल्या. माझ्या शोकेसमध्ये त्या फार सुंदर रचून ठेवल्या. आमच्याकडे कोणी पाहुणे आले की त्याचे खूप कौतुक व्हायचे. माझ्या आईच्या शोकेसमध्ये अजूनही ती सर्व खेळणी आहेत! मी या खेळणी माझ्या इतर मैत्रिणींना ही बनवायचे शिकवले!
त्यानंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी वायरच्या पिशव्या बनवल्या. एका वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या कॉलनीतल्या सगळ्या मैत्रिणींच्या बाहुल्यांचे सुंदर सुंदर फ्रॉक शिवून दिले. मग कदाचित मला व्यसनच लागले की प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी कोणता नि कोणता प्रोजेक्ट हातात घ्यायचे.
एका वर्षी दिवाळीच्या सुट्टीत आम्ही आईबाबांबरोबर अजिंठा-वेरूळ इथे फिरायला गेलो होतो तर तिकडच्या नदीकाठी आम्हाला खूप सारे शंख आणि दगडं मिळाली. ही दगडं वेगळी होती, त्याच्यावर काही क्रिस्टल होते. काही दगडांवर छोटे छोटे खड्डे होते त्या खड्ड्याच्या आत पांढरा-हिरवा-लाल असे काहीतरी चमकणारे होते. त्या दगडांनी आमची बॅग खूप जड झाली. ती बॅग आईलाच उचलावी लागली, कारण आम्ही लहान होतो. त्याबद्दल आईने खूप कटकट केली, पण माझ्या हट्टापुढे तिनेही ती घरापर्यंत आणली. त्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आमच्या व्हरंड्यात संपूर्ण अंधार करून हे सगळे दगडं शंख-शिंपले मांडले. कशाच्या पुढे दिवे, कशाच्या पुढे मेणबत्ती लावून एक प्रदर्शन भरवले. त्या प्रदर्शनाची फी ठेवली: पाच पैसे. माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर त्यांचे आईवडील, आजीआजोबा इतकेच काय तर उन्हाळ्याच्या सुट्टीत यांच्या घरी आलेले पाहुणेसुद्धा माझ्या प्रदर्शनाला भेट देऊन गेले. खूप कौतुक करून गेले.
इथे मला खरंच सांगायला आवडेल की या सगळ्या गोष्टींना ‘छंद’ म्हणतात, छंदातून आपल्याला काही मिळते, याचा अजूनही गंध नव्हता. पण या सगळ्या कृतीतून मला खूप आनंद मिळायचा. आता हे आठवलं तरी मला तो आनंद अनुभवता येतो. या सर्वच छंदातून मी खूप काही शिकले, समृद्ध झाले. आणि एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की या छंदासाठी लागणारे सर्व साहित्य म्हणजे वही, रंगपेटी, ब्रश, तंगूस, मणी, वायरी, विविध प्रकारच्या सुया इत्यादी शेवटी आईवडिलांनीच आणून दिल्या असणार ना! शिवाय प्रत्येक कृतीनंतर कौतुकही झाले असेल, त्यामुळेच मी हे सगळे छंद जोपासू शकले!
पण कॉलेजमध्ये गेल्यावर या सगळ्या गोष्टींना वेळ मिळेना. झाला कारण मी सायन्स घेतले होते. कॉलेजचा वेळही जास्त होता आणि जर्नल वगैरे लिहिण्यातही जास्त वेळ जात होता. आम्ही जेव्हा एस. वाय. बीएस्सीला होतो तेव्हा आमच्या कॉलेजच्या केमिस्ट्रीच्या इसरानीसरांनी सांगितलं की तुमच्याकडे काही चांगलं लिहिलेलं असेल, पेंटिंग, ड्रॉइंग असेल तर तुम्ही नक्की घेऊन या. आपण आपल्या कॉलेजच्या बोर्डवर लावूया! त्याप्रमाणे मी माझे काही पेंटिंग्स सरांकडे घेऊन गेले. ते त्यांनी ठेवून घेतले. सर दर आठवड्याला बदलून बदलून माझे पेंटिंग्स बोर्डावर लावायचे. वर्ष संपत आले आणि सर एकदा शिकवता शिकवता माझ्याकडे चालत आले आणि मला म्हणाले,
‘प्रतिभा, आपल्या कॉलेजच्या मासिकासाठी तू एक कविता देऊ शकशील का? ‘
मला लहानपणापासून ‘कविता’ हा प्रकार कधीच आवडला नव्हता कारण पहिल्या आणि
शेवटच्या दोन ओळी देऊन मधल्या ओळी लिहायला सांगायचे किंवा तोंडी परीक्षेत कविता म्हणायला सांगायचे! माझ्यात एक दोष होता की मला कोणतीही गोष्ट पाठ होत नव्हती. कदाचित त्यामुळेच मी सायन्स घेतलं होते. डेरिव्हेशन किंवा गणित मला उत्तम प्रकारे जमायचे आणि तिथे फार पाठांतराची गरज लागत नाही, अशी कुठेतरी माझी भावना होती.
इकडे मी सरांना चक्क नकार दिला परंतु मी माझ्या पुढच्याच तासाला म्हणजे गणिताच्या तासाला वहीवर काही तरी खरडले आणि विसरूनही गेले. दुसऱ्या दिवशी केमेस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला सरांनी विचारले,
‘प्रतिभा लिहिलीस का कविता? ‘
मी म्हटले,
‘नाही सर…नाही जमलं.’
इतक्यात माझ्या मैत्रिणीने सुषमाने पटकन माझ्या बॅगेतली वही काढून सरांच्या हातात दिली, अगदी पान उघडून!
सरांनी ती कविता वाचली. सर सिंधी भाषिक होते. त्यामुळे त्यांना ती कळली की नाही, माहीत नाही पण एकाखाली एक अशा छोट्या छोटया ओळी होत्या त्यामुळे त्यांना कवितेसारख्या वाटल्या असाव्यात. त्यांनी ते पान फाडून घेतले आणि ते जाऊ लागले. मी त्यांच्या मागे पळत पळत गेले आणि त्यांना सांगितले,
‘सर, प्लीज ही कविता छापू सरांनी प्रश्नांकित नजरेने माझ्याकडे पाहिले.
मी म्हटले,
‘नाही सर… माझी या कॉलेजमध्ये काही इज्जत आहे आणि कवींची खूप टर उडवली जाते. त्यांची लग्न होत नाहीत……
मी पुढे खूप काही बोलत राहिले. ते हसायला लागले. ते म्हणाले,
‘ठीक आहे, ही कविता मी तुझ्या नावाने छापत नाही. मग तर झालं?’
आणि खरोखरीच जेव्हा कॉलेजचे मासिक हॉरिझॉन माझ्या हातात आले तेव्हा ती कविता
सरांनी ‘अनामिका’ नावाने छापली होती. छोटसे कॉलेज होते त्यामुळे नाही म्हटले तरी सगळ्यांना कळले की ही कविता मी लिहिलेली आहे. कॉलेजचा लायब्ररियन, शिक्षक,
ऑफिस स्टाफ सगळ्यांनी कौतुक केले. माझ्या मित्र-मैत्रिणींनीही खूपच आनंद झाला. त्यानंतर असे घडले की मला कविता सुचू लागल्या. त्या वर्षी उन्हाळ्याची सुट्टी आली आणि या दीर्घ सुट्टीमध्ये मी माझ्या कवितांनी पूर्ण दोनशे पाणी वही भरून टाकली. काही वर्षात कॉलेजचे शिक्षण संपले. ‘भौतिकशास्त्र’ या विषयाची प्राध्यापक म्हणून रुजू झाले. लागलीच संसार सुरू झाला. त्यात अनेक वर्ष अशीच निघून गेली. अधूनमधून माझ्या कवितांकडे मी कधीतरी प्रेमपूर्वक पाहायचे इतकेच. पस्तिशी ओलांडली मुलगी मोठी झाली होती. एकदा मुलीला घेऊन मी माझ्या आईकडे गेले होते तेव्हा आई म्हणाली,
‘अगं… आजच वर्तमानपत्रांमध्ये मी कवितास्पर्धेची जाहिरात पाहिली. भाग घे.’
माझ्याही मनात आले, काय हरकत आहे? आणि मी सासूबाईंना विचारले की मी जाऊ का? त्यांनीही परवानगी दिली आणि त्या स्पर्धेत चक्क मला पारितोषिक मिळाले तेही कविवर्य शंकर वैद्य यांच्या हस्ते! त्यानंतर मी दोन-तीन कविता स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. सगळ्या स्पर्धांमध्ये मला बक्षीसं मिळाली; कदाचित वासरात लंगडी गाय शहाणी ठरली असेल! माहीत नाही पण यादरम्यान कधीतरी माझ्या स्पर्धेचे परीक्षक असलेले ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी मला दोन-तीन कार्यक्रमांमध्ये आवर्जून बोलावले आणि तिथे मी माझ्या कवितांचे उत्तम सादरीकरण केले.
मात्र एका ठिकाणी माझे सादरीकरण फार खराब झाले. मी हिरमुसले आणि मी परत थोडेसे कवितेपासून बाजूला झाले. आयुष्यातील चढउतारांबरोबर साहित्यातील चढउतार अनुभवले.
अगदी विंदा करंदीकर ज्या व्यासपीठावर होते तेथून कविता सादर करण्याची संधी मिळाली. कविता अनेक संधी मिळवून देत होती, आनंद देत होती!
आणि अचानक आयुष्यात असा काही प्रसंग आला की मला जगणे मुश्किल झाले तेव्हा सर्वार्थाने कवितेने तारले. स्वतःच्या बाहूत घेतले. मला जिवंत ठेवले. मी या कवितेच्या कायम ऋणातच राहू इच्छिते!
आज मी जेव्हा आयुष्याकडे वळून पाहते तेव्हा लक्षात येते की कोणत्यातरी छंदाची असतेच! ते कधीच माणसाला आवश्यकता एकाकीपण येऊ देत नाहीत. कायम हात देतात. उभे करतात. आत्मविश्वास देतात आणि कधी भरघोस पैसाही मिळवून देतात! माझी नोकरी अजूनही चालू आहे पण कविता आतून उमलतात. काही क्षण मला फुलवतात. ‘स्त्री’ म्हणून छंद जोपासण्याची संधी मिळाली नाही, असे काही माझ्या आयुष्यात घडले नाही. या लेखाच्या निमित्ताने मला संधी मिळाली हे सांगण्याची की ‘छंद कधीकधी माणसाला एक नवे कोरे आयुष्यही मिळवून देतात!”
– प्रा. प्रतिभा सराफ
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
Leave a Reply