आपल्या आयुष्यात काही माणसं अशी भेटतात की, ज्यांच्या सहवासाने आपलं जीवनच बदलून जातं.. सुमारे बारा वर्षांपूर्वी मला देखील एक पुणेरी ‘रावसाहेब’ भेटले आणि त्यांच्या सहवासाने माझ्यात आमूलाग्र बदल झाला..
त्या कालावधीत मी ‘संस्कृती प्रकाशन’चं काम करीत होतो. तेव्हा सुटाबुटात एक प्रोफेसर तिथे यायचे, गप्पा मारायचे. त्यांनी त्यांचं ‘व्यवस्थापनाकडून यशाकडे’ हे पुस्तक छापण्यासाठी ‘संस्कृती’कडे दिलं.. सहाजिकच त्याचं मुखपृष्ठ करण्याचं काम माझ्याकडे आलं. त्या निमित्ताने प्रोफेसरांशी माझ्या भेटी होऊ लागल्या.. आणि मला या प्रोफेसरांमधील ‘पुलं’चा ‘रावसाहेब’ हळूहळू उलगडू लागला..
यांना ‘रावसाहेब’ म्हणून संबोधण्याचं कारण असं की, “पुलं” यांचं ‘दैवत’! ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील सर्व व्यक्तिचित्रं यांना तोंडपाठ! विशेषतः ‘रावसाहेब’ हे यांच्या तोंडूनच ऐकत रहावं!! ते कर्नाटकातलं, ‘रावसाहेब’ जसं सांस्कृतिक कलेचं भोक्तं, तसंच हे पुण्याचं प्रोफेसर, साहित्य, कला व संस्कृतीचं भोक्तं!! साहित्य, कला, राजकारण, सामाजिक, सांस्कृतिक विषयाचा अभ्यास असणारे रावसाहेब एकदा गप्पा मारायला बसले की, दोन चार तास कधी निघून जातात हे कळतही नाही…
हे रावसाहेब म्हणजे, पुण्याचा इतिहास, भूगोल व नागरिक शास्त्र कोळून प्यायलेले दिलीप येवलेकर!! भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे पुण्याच्या शनिवार पेठेतील एका ‘टिपिकल’ वाड्यात अवतरले.. लहानपणापासूनच त्यांनी ‘वाडा संस्कृती’ अनुभवलेली असल्याने ते ‘हाडाचे पुणेकर’ घडले. माध्यमिक शिक्षण ज्या शाळेत झाले, त्याच रमणबाग शाळेत त्यांना शिक्षक म्हणून काहीकाळ ‘विद्यादान’ करण्याचा सुवर्णयोग लाभला! मी देखील याच शाळेत अकरावीला होतो, मात्र त्याआधीच येवलेकरांना तिथून महाविद्यालयात ‘प्रोफेसर’ म्हणून बढती मिळालेली होती.
व्यवस्थापन या विषयावर प्रोफेसरांनी व्याख्यानं देणं सुरु केलं आणि पुढे हाच त्यांच्या जीवनाचा, अविभाज्य असा उपक्रम झाला. याच कालावधीत त्यांचा विवाह, मुंबईतील दिपा पिंगळे यांच्याशी झाला. त्या मुंबईत नोकरी करीत होत्या. सौ. दिपा यांनी दिलीप यांना जीवनाच्या वाटेवर भक्कम साथ दिली. अडीअडचणीला पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या, म्हणूनच त्यांचा संसार सुखाचा झाला. त्यांची मोठी मुलगी मुग्धा व धाकटा संकेत हे दोघेही जात्याच हुशार! मुग्धा, शाळेत नेहमीच स्काॅलर होती.. वयाच्या एकविसाव्या वर्षी तिला कॅनडाला शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली. या ‘दमलेल्या बाबा’नं भगीरथी प्रयत्न करुन तिला कॅनडाला पाठवले. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न झाले व ती पतीसह अमेरिकेत गेली. तिथे ती रावसाहेबांसारखीच प्रोफेसर झाली. दोन नातवंडांच्या जन्माचे वेळी, रावसाहेब सपत्नीक अमेरिकेत राहून आले…
काही वर्षांपूर्वी रावसाहेबांनी लिहिलेल्या व्यवस्थापनावरील पुस्तकाच्या एकूण बारा आवृत्या निघाल्या. या पुस्तकाची विक्रमी विक्री झालेली आहे. पुस्तकाचं मार्केटिंग कसं करावं, याचा वस्तुपाठ रावसाहेबांनी अनेकदा माझ्यासमोर दिलेला आहे. ठरवून एखाद्या अपरिचित माणसाला पुस्तक खरेदी करण्यास उद्युक्त करणे, ही सोपी गोष्ट नाहीये… ‘चंद्रविलास’मध्ये चहा घेताना अनेकांना त्यांनी ठरवून, पुस्तक रोखीने विकलेलं मी अनुभवलंय…
‘व्यवस्थापनातून यशाकडे’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ‘सापशिडी’चे चित्र आहे. व्यवस्थापनात योग्य निर्णय घेतले तर शिडीवरुन, यश सहज गाठता येते.. आणि निर्णय चुकला तर सापाच्या तोंडातून, शेपटीच्या टोकाकडे अपयशाला सामोरे जावे लागते.. प्रत्यक्षात रावसाहेबांनी, माझ्यासारख्या अनेकांना ‘शिडी’ देऊन अडचणीतून वरती काढलेले आहे… जे सध्याच्या काळात, कोणीही कुणासाठी करीत नाही.. एकवेळ तुम्हाला ढकलून देतील, पाय ओढतील.. मात्र हात देऊन कोणीही बरोबर घेणार नाहीत.. रावसाहेबांनी अनेकांना मोलाचा सल्ला दिला आहे, आर्थिक संकटात मदतही केली आहे, अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शनही केलेलं आहे. त्यांच्या सोबत राहून माझ्याही मित्रपरिवारात भर पडली.
मी ‘संस्कृती’त असतानाच एका नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मला प्रोफेसरांनी सांगितले की, ‘सुरेश, तुला माझ्याविषयी जे काही वाटत असेल ते तू लिहून काढ.’ मी माझ्या परीने दोन फुलस्केप पेपरवर ‘रावसाहेब’ लिहून काढले. ते लेखन ज्यांनी ज्यांनी वाचले, त्यांना ते मनापासून आवडले.. आणि इथंच माझ्यातल्या लेखकाला रावसाहेबांनी ‘परीसस्पर्श’ केला.. व मी फेसबुकवर लिहू लागलो..
‘संस्कृती’ दिवाळी अंकासाठी जाहिराती मिळवून देण्याची रावसाहेबांनी जबाबदारी घेतली. तेव्हा त्यांच्यासोबत मी डीएसकेंच्या आॅफिसवर अनेकदा चकरा मारल्या.. आणि माझ्या मार्केटिंग ज्ञानात भर पडत गेली. एकदा त्यांनी मला ‘गॅस सेव्हर’ उपकरणाच्या ‘एमएलएम’ मध्ये गुंफलं.. त्यासाठी कॅम्पमधील एका आॅफिसवर घेऊन गेले. एक उपकरण विकलं तर ‘इतका नफा’.. हे गणित मांडून मला प्रोत्साहित केलं. प्रत्यक्षात माझ्याकडून एकही ‘गॅस सेव्हर’ची विक्री झाली नाही.. शेवटी, मीच ते वापरले… एकदा त्यांनी मला ‘शेंगदाणा लाडू’ची विक्री व होणारा फायदा यांची आकडेमोड करुन दाखविली. खूप उपद्व्याप करुन एकाच लाडूंच्या बरणीची विक्री केली.. त्या हाॅटेलवाल्याने लाडू चांगले नसल्याची तक्रार केल्याने, एका भावी उद्योजकाला महाराष्ट्र मुकला! काही दिवसांनी रावसाहेबांनी मला इस्टेट एजंट होण्यासाठी घोड्यावर बसवले.. काही जणांच्या ओळखी करुन दिल्या. मी कार्ड छापून घेतले. अनेकांना भेटलो, जागा दाखवल्या.. पण एकही व्यवहार झाला नाही.. या सर्व धंद्याची खलबतं, चंद्रविलास हाॅटेलमध्ये किंवा ओंकारेश्वर जवळील ‘राज रेस्टॉरंट’ मध्ये व्हायची. तिथे ‘वन बाय टू’ चहाचे, दोन-चार राऊंड हमखास व्हायचे..
असेच एकदा ‘चंद्रविलास’ मध्ये बसलेलो असताना रावसाहेबांनी मला ‘राजा रविवर्मा कलापीठ’ या बॅनरखाली बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन आयोजित करण्यास प्रोत्साहित केले. त्यासाठी त्यांनी हवी ती मदत करण्याची तयारी दर्शवली. परिणामी या कलापीठाने तीन वर्षे प्रदर्शन भरवून अनेक नवोदित चित्रकारांना, व्यासपीठ मिळवून दिले.
नवीन काम मिळावे म्हणून अनेक ठिकाणी रावसाहेब मला सोबत घेऊन गेले. मग त्या घोले रोडवरील, दीक्षित मॅडम असतील तर कधी शनिपार जवळील, सुरेखा माने मॅडम.. कधी शिवाजी नगर गावठाणातील शहा असतील तर कधी धनकवडीतील, रोहिणी देशमुख मॅडम! उद्देश एकच, नावडकरला काम मिळावं..
आता ‘रावसाहेबां’नी वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेली आहे. तरीसुद्धा उत्साह पंचविशीलाही लाजवेल असा आहे.. पूर्वी त्यांच्या स्कुटीवरुन मी अनेकदा फिरलो आहे, आता अॅक्टिव्हा आहे.. गाडीवरुन जाताना कोणी आडवं आलं की, रावसाहेब ‘ए भुईनळ्या’ असं ओरडून त्याचा उद्धार करतात..
आज रावसाहेबांनी आपल्या सौभाग्यवतींचे पंच्याहत्तरीत पदार्पण व स्वतःच्या पंच्याहत्तरी पूर्ततेनिमित्त एक छोटं स्नेहसंमेलन आयोजित केलेलं होते.. अर्थात या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी संकेत व मुग्धाने पेलली होती.. जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींसमवेत सोहळा संपन्न झाला..
असेच ‘रावसाहेब’ मला पुढील जन्मी देखील लाभावेत, हीच ‘छोटीसी आशा’!!!
– सुरेश नावडकर २३/७/२३
मो. ९७३००३४२८४
Leave a Reply