माझ्या लहानपणी सट्खूळ हा शब्द मी आईकडून, आज्जिकडून अनेक वेळा ऐकलाय. सट्खूळ म्हणजे शब्दशः सांगायचं तर, मुल सहा सात वर्षांचं झाल्यावर त्याला लागणारं खुळ. आता खुळ म्हणजे वेड लागणं किंवा खरोखर वेडं होणं असा अर्थ करून घेऊ नका अगदी.
पूर्वी कोकणात एखादा अनाकलनीय किंवा आपल्याला न समजणारं काही बोलू लागला, सांगू लागला की त्याला किंवा त्याच्या म्हणण्याला समजून घेण्याऐवजी,
“खुळ लागला हा मेल्याक,कायव बोलता” किंवा
“मेल्याचा काय ऐकणार ? आमका खुळो करून सोडतलो”
“रे, खुळ्यासारखो नको वागू ”
“खुळावलस की काय ?”
अशा शब्दात त्याची संभावना केली जायची. कोकण भूमितले ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार जयवंत दळवी यांच्या सारे प्रवासी घडीचे या पुस्तकात त्यांनी चितारलेली, त्यांच्या गावातली एक व्यक्तिरेखा आहे. त्या व्यक्तीला औषधी मुळ्यांचं ज्ञान असतं. कुणाला पोटाचा काही आजार झाला, की बोलावण्याची वाटही न पहाता, त्याच्या घरी जाऊन मात्रा उगाळून त्याला देत असे, आणि त्याच्या औषधी मुळ्यानी लोकांना बरंही वाटत असे. पण तरी कुणीही त्याचं कौतुक केलं नाही, इतकंच नव्हे तर त्याच्या मुळ्यानी बरी झालेली माणसं म्हणायची,
“खुळ्याचा औषध, मी जिवंत रवलय ह्याच खूप झाला.”
पण आज मी म्हणतोय ते सट्खूळ लागलेली त्या वयातली मुलं मी पहिलीयत.
सहा सात वर्षाच्या वयात अचानक मुलांच्या वागण्यात अनाकलनीय बदल दिसू लागतात. हे बदल आजूबाजूला असलेल्या आपल्या कुटुंबातील लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी असू शकतात. आपण बारकाईने आठवलं तर प्रत्येकाच्या घरात हे घडून गेलेलं असतं, हा अनुभव अनेकांना आलेला असतो. या वयात, मुलं अचानक वेड्यासारखी वागू बोलू लागतात, उलट उत्तरं देऊ लागतात, फालतू काहीतरी बोलून आणि मोठ्याने हसून सगळ्यांकडे पहातात, उदा.
“अरे, असं वेड्यासारखं नाही करायचं”
असं हळूच बजावल्यावर,
“तू वेडा”. असं बिनधास्तपणे मोठ्याने म्हणतात.
घरी आलेल्या कुणी कौतुक केलं, किंवा येतोस का आमच्याकडे खेळायला असं सहज विचारलं, की उत्तर म्हणून त्यांना वेडावून दाखवतात, आणि घरच्या मंडळींची स्थिती विचित्र करून ठेवतात. मग त्यावर त्याची आई बिचारी सारवासारव करते,
“असा नाही वागायचा तो, अगदी शांत असायचा. हल्ली काय झालंय कोण जाणे, असाच खुळावल्यासारखा वागतो. मग आलेल्या मंडळींमधली कुणी ज्येष्ठ व्यक्ती हसत विचारते,
“किती वर्षाचा झाला ग हा ?”
“सहा पूर्ण झाली की दोन महिन्यांपूर्वी.” त्याची आईच उत्तरते.
हे ऐकून ती व्यक्ती आपला होरा बरोब्बर ठरला या आनंदाने म्हणते,
“मग बरोबर, सट्खूळ लागलंय. फार लक्ष नको देऊस. अगं या वयात जरा वेडेपणा करतात मुलं. आपल्याकडचं सगळ्यांचं लक्ष कमी झालंय असं वाटतं त्यांना, म्हणून वागतात अशी विचित्र लक्ष वेधून घेण्यासाठी. सगळं ठीक होईल.
थोडक्यात काय ? की या वयात मुलांच्या वागण्यात, बोलण्यात एक खुळेपणा येऊ लागतो. आता कुणी म्हणेल याला शास्त्रीय पुरावा आहे का ? तर काही नाही. काही मुलांच्या बालपणात ही फेज येतही नसेल. चंदेरी दुनियेतले तारे तारका नाही का, विचित्र तोकडे कपडे घालतात,किंवा काही विचित्र बोलून एखाद्या घटनेवर अनाकलनीय प्रतिक्रिया देतात. उद्देश तोच असतो, आपल्याकडे साऱ्यांचं लक्ष वेधून घेणं. फक्त ते समजून उमजून असे वागतात तर लहान मुलं असमंजसपणे न समजून तसं वागतात इतकंच.
बरं, ” असा वागत नाही, शांत असतो नेहमी” हा मुद्दा मात्र मला कळलेला नाही. मुलांनी शांत का असायचं ? ती मस्ती नाही करणार तर कोण आपण करणार का ? विषय आला आला म्हणून सांगतो, जुनी गोष्ट आहे. माझ्या एका परीचयातल्या व्यक्तीने त्याचा मुलगा खूपच मस्ती करतो, म्हणून कुणाला तरी विचारून त्याची शांत करून घेतली होती. आता बोला ? सांगणारा आणि ऐकून ते करणारा दोघंही ग्रेट.
माझा भाचा याच वयाचा असताना, एकदा मी आणि माझी बहिण त्याला घेऊन, एका नातेवाईकांकडे गेलो होतो. त्याला ते घर तसं नवखच होतं. पण त्यांच्याकडे गेल्यावर हा इतकी मस्ती करायला लागला, की काही विचारू नका. त्यांच्या दिवाणावर चढ, उड्या मार, घरभर धाव, वर ठेवलेलं खाली पाड असं सुरू झालं. घरात आजी आजोबा दोघेच होते. याच्या मस्तीने त्यांचाही संयम संपू लागला. अखेर याला आवरून आम्ही एकदाचे बाहेर पडलो. बाहेर आल्यावर त्याला म्हटलं,
काय रे, काय झालं होतं तुला ? किती मस्ती करत होतास ?
यावर दात काढून फक्त खुळ्यासारखा हसला. बहीण म्हणाली, अरे फार लक्ष देऊ नकोस सट्खूळ लागलंय त्याला.
मध्यंतरी महाराष्ट्राची हास्यजत्रा मधल्या एका स्किटमध्ये हाच विषय दाखवला होता. अर्थात प्रत्यक्षात काम करणारे कलाकार वयाने मोठे असले तरी त्या स्किटमधून त्यांना सहा सात वर्षातल्या मुलांनाच दाखवायचं होतं.
एक गुरुजी गावातल्या शाळेत मुलांना मराठी भाषेची माहिती देण्यासाठी येतात. मुलांना, एक अद्याक्षर घेऊन त्यावरून वाक्य बनवायला सांगतात. मुलं मात्र आपली हुशारी दाखवण्यासाठी अक्षरशः वेड्यासारखी काहीही वाक्य बनवून खुळ्यासारखी हसत खिदळत रहातात. हे पाहून अनेक प्रेक्षकांना वाटलं असेल हे काय फालतू विनोद दाखवतात. पण हे त्या वयातलं वास्तव आहे, जे त्यांनी नाटूकल्यामधून दाखवलं होतं.
तर असं हे सट्खूळ, ठराविक वयात लागतं आणि निघूनही जातं. मुलं मोठी झाल्यावर त्यांना हे सांगितलं की, आपले प्रताप ऐकून ती खूप हसतात…..पण खुळावल्यासारखी नाही बरं…..
प्रासादिक म्हणे
-प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply