अलिकडच्या काळात कुठल्याही वस्तूचे डिझाईन कसे असावे याला बरेच महत्त्व आहे. संगणकावरही अशा प्रकारे डिझायनिंग करता येते. त्याला संगणक आरेखन असे म्हणतात. ग्राफिक्स हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. संगणकावर आपण ज्या प्रतिमा पाहतो तो काही रंगबिंदूंचा समुच्चय असतो.
काही लाख रंगबिंदू मिळून संगणकावरची प्रतिमा साकारत असते. संगणकाच्या पडद्यावर जेव्हा एखादी प्रतिमा दिसते तेव्हा बायनरी म्हणजे ०,१ स्वरूपातील माहिती ही सीपीयूकडून घेतली जाते व त्याचे रूपांतर हे चित्रात केले जाते. हे रूपांतर करण्याचे काम ग्राफिक कार्ड करीत असते. ग्राफिक कार्ड हा एक प्रकारचा संस्कारक असतो व तो प्रिंटेड सर्किट बोर्डवर बसवलेला असतो.
जेव्हा एखाद्या कंपनीत आर्टवर्क करायचे असते तेव्हा तशी सूचना आर्ट विभागाला दिली जाते व नंतर हवी तशी प्रतिमा तयार करून ती कागदावर साकारली जाते. म्हणजे कुणाच्या तरी मनातले कल्पनेचे मूर्त स्वरूप कागदावर येते. ग्राफिक कार्ड यांत्रिक पातळीवर हेच काम याच पद्धतीने करते. यात सीपीयू हे सॉफ्टवेअरच्या समन्वयाने काम करते व प्रतिमा कशी असावी याची माहिती ग्राफिक कार्डकडे पाठवते, मग तेथे रंगबिंदूंचा वापर कसा करायचा हे ठरवून संदेश केबलमार्फत मॉनिटरकडे पोहोचवला जातो.
त्रिमिती चित्र तयार करताना वायर्सची सरळ रेषांवर आधारित फ्रेम बनवली जाते व त्यातून प्रतिमा साकार होते. यात रंग, पोत व प्रकाश यांचाही अनोखा खेळ करता येतो. संगणकाला ग्राफिक कार्ड नसेल तर त्याच्यावर कामाचा ताण वाढतो. ग्राफिक कार्डचे काम चार टप्प्यात चालते. मदरबोर्ड हा डेटा आणि पॉवर यांची सांगड घालतो. प्रोसेसर म्हणजे संस्कारक प्रत्येक रंगबिंदूचे काय करायचे ते ठरवतो. मेमरी म्हणजे स्मृती रंगबिंदू साठवून अंतिम चित्रही संग्रहित करते. मॉनिटर म्हणजे पडद्यावर दृश्य प्रतिमा दिसते. मोनोक्रोम डिस्प्ले अॅडॉप्टर या नावाने १९८१ मध्ये आयबीएमने पहिले ग्राफिक कार्ड बाजारात आणले. त्यात हिरवा रंग होता व काळ्यावर पांढरी अक्षरे एवढेच शक्य होते.
नवीन व्हिडिओ ग्राफिक कार्डमध्ये २५६ रंग शक्य आहेत. क्वांटम एक्सटेंडेड ग्राफिक्स ॲरे या कार्डमध्ये लाखो रंगांची उधळण आहे. यात २०४० बाय १५३६ इतके रंगबिंदू आहेत, त्यामुळे स्पष्ट प्रतिमा मिळते. ग्राफिक्स कार्डसाठी जो सीपीयू वापरतात त्याला जीपीयू म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट असे म्हणतात. हा जीपीयू अतिशय अवघड अशी गणितीय व भौमितिक गणने करतो, जी संगणक आरेखनासाठी आवश्यक असतात. या जीपीयूमध्ये सीपीयूपेक्षा जास्त ट्रान्झिस्टर्स वापरलेले असतात. यात फुल सिन अँटी अलायन्सिंग हे तंत्र त्रिमिती चित्रांना अधिक सरस बनवते, तर ॲनिसोट्रॉपिक फिल्टरिंगमुळे चित्र अधिक रेखीव व सुस्पष्ट दिसते. अनेक कंपन्यांकडे त्यांच्या गरजांना अनुरूप कामे करणारे ग्राफिक कार्ड्स असतात.
Leave a Reply