समजा तुम्ही युद्धसदृश किंवा जिथे दंगल चालू आहे अशा ठिकाणी गेलात तर तुम्हाला केव्हाही गोळी लागण्याचा धोका असतो. गोळी थेट तुमच्या शरीराचा वेध घेऊ शकते. मग यावर उपाय काय पळून जाणे पण पळता पळता गोळी लागतेच. बंदुकीच्या गोळीपासून बचाव करण्यासाठी असे एखादे आवरण तुमच्या शरीरासमोर असले पाहिजे, की ज्यावर ती गोळी लागेल व तिची गतीज ऊर्जा विखुरली जाईल.
त्यातूनच बुलेटप्रूफ ग्लास म्हणजे सुरक्षित काचेची कल्पना पुढे आली, पण तरीही ती काच पूर्णपणे सुरक्षित असतेच असे नाही कारण अमेरिकी हवाई दलाने घेतलेल्या काही चाचण्यांमध्ये शक्तिशाली रायफलने केलेल्या गोळीबारात शी बुलेटप्रूफ काच फुटल्याचे दिसून आले आहे. तुम्ही क्रिकेटचा चेंडू बघितला असेल तो वेगाने फटकावल्यानंतरही क्षेत्ररक्षक उडालेला झेल टिपताना किंचित मागे जातो व हातही मागे घेत घेत चेंडू टिपतो असे करताना तो चेंडूची गतिज ऊर्जा कमी करीत असतो.
चेंडू ज्या दराने त्याचा संवेग बदलतो त्याच्या समप्रमाणात त्याचा जोर किंवा बल असते, त्यामुळे संवेग कमी करणे गरजेचे असते. पण येथे काच स्थिर आहे ती मागेपुढे होऊ शकत नाही मग वेगाने आलेल्या बंदुकीचा संवेग कमी करणे शक्य नसते. जेव्हा साध्या काचेवर गोळी मारली जाईल तेव्हा ती काच काही वाकवता येत नाही त्यामुळे ती गतिज ऊर्जा शोषून घेऊ शकत नाही त्यामुळे ती फुटते.
बुलेटप्रूफ काच वेगळी असते तिला बुलेट रेझिस्टंट काच म्हणावे लागेल कारण तिच्यातही पूर्ण संरक्षण नसते. ही काच पॉलिकार्बोनेट नावाचे प्लास्टिक कडक काचेच्या थरांमध्ये बसवून तयार केली जाते. या थरांच्या सँडविचला लॅमिनेट असे म्हणतात. साध्या काचेपेक्षा ती दहापटींनी जाड असते. जेव्हा बंदुकीची गोळी वेगाने या बुलेटप्रूफ काचेवर आदळते, त्या वेळी तिची गतिज ऊर्जा ही या थरांच्या बाजूने विखरून टाकली जाते. गतिज ऊर्जा ही काच व प्लास्टिकच्या अनेक थरांमध्ये म्हणजे मोठ्या भागात विखुरल्याने शोषली जाते, त्यामुळे ती आरपार जाऊ शकत नाही. बँकामध्ये कॅशियरच्या समोर लावलेली काच बुलेटप्रूफ असते. पोलिसांच्या गाड्यांच्या काचा बुलेटप्रूफ असतात किंवा त्याला त्याच्याही वरती जाळ्या लावून अधिक सुरक्षित करता येते. या काचेचे वैगुण्य म्हणजे ती जाड असल्याने पुरेशी पारदर्शक राहत नाही त्यामुळे ती वजनानेही जास्त असते.
Leave a Reply