हेडफोनने श्रवणाच्या क्षेत्रात मोठीच क्रांती केली आहे यात शंका नाही. आजकाल आपण मोबाइल फोन, एमपी ३ प्लेयर यातही हेडफोनचा वापर करतो त्यामुळे फोन कानाला लावायची गरज राहात नाही. १९३० मध्ये बेयेरडायनमने हेडफोनची निर्मिती केली. आता त्यात बरेच बदल झालेले आहेत.
आपल्याला एखाद्या ध्वनीचे ज्ञान होते त्यावेळी कानाचा पडदा इयरड्रम (पातळसे पटल) कंप पावते. स्पीकर्सही त्याच पद्धतीने काम करतात. या स्पीकरमध्ये एक कोन असतो, तो शंकूच्या आकाराचा कोन ड्रमसारखी भूमिका पार पाडतो. यात एक कागद, प्लास्टिक किंवा पातळ कापडाचा पडदा धातूच्या रिंगवर ताणून बसवलेला असतो.
शंकूच्या निमुळत्या भागाच्या शेवटी एक लोखंडी कॉईल असते, त्याखाली चुंबक असतो. जेव्हा ध्वनिस्त्रोताकडून ध्वनि येतो तेव्हा तो विद्युत संदेशात रूपांतरित होऊन आलेला असतो, तो चुंबकाकडे आकर्षित होतो त्यामुळे कॉईल मागेपुढे हलते व त्या गतीमुळे पडदा हलतो व त्यातून ध्वनीची जाणीव आपल्या कानापर्यंत येते. हे मोठ्या स्पीकर्सचेच तत्त्व कानाला लावण्याच्या हेडफोनमध्ये आहे. त्यात फक्त प्लास्टिकचा वापर केलेला असतो, त्यातही चुंबक असतो. म्युझिक प्लेयरकडून आलेल्या लहरी चुंबकाकडे येतात व त्यामुळे कॉईल हलते व पडदा हालचाल करतो त्यातून ध्वनी आपल्या कानापर्यंत येतो. अनेकदा आपण कानाजवळ गादीसारखे मऊ अस्तर असलेले हेडफोन पाहतो त्यात अनावश्यक आवाज येत नाहीत, तुम्हाला हवा तेवढाच आवाज ऐकू येतो, त्यांना नॉईज कॅन्सलिंग हेडफोन असे म्हणतात. बोस कार्पोरेशनचे अमर बोस यांनी या हेडफोनचा शोध लावला त्यात डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्सचा वापर केला जातो. कॉल सेंटरमध्ये काम करताना, पीसीवर गेम खेळताना जे हेडफोन वापरतात त्याला हेडसेट असे म्हणतात त्यात हेडफोन व मायक्रोफोन यांचा समन्वय असतो.
हेडफोन सतत वापरल्याने कानाला बहिरेपणा येऊ शकतो, त्यासाठी आवाज नेहमी अगदी कमी ठेवावा. वायरलेस हेडसेट हे वायरींच्या जंजाळापासून मुक्त असतात. वायरी असलेल्या हेडसेटमध्ये मानेच्या हालचालींवर परिणाम होतो, त्यासाठी अत्यंत सुटसुटीत प्रकार असलेला वायरलेस हेडसेट जास्त उपयुक्त असतो. ब्लू टूथ हेडसेट एरिकसन, आयबीएम व इंटेल या कंपन्यांच्या प्रयत्नातून तयार झाला. एफएम, वायफाय माध्यमातूनही वायरलेस हेडसेट रेडिओ किंवा इन्फ्रारेड ट्रान्समिशन लिंकवर चालतात.
Leave a Reply