सध्या मुक्काम पोस्ट अमेरिका. इथे हव्या त्या गोष्टी करायला वेळ नेहमी पेक्षा अधिक मिळतो. दहा बारा दिवसांपासून f b वर एक add येत होती. online कोर्स उपवास पदार्थ, मुखवास, इन्स्टंट मसाले.इ.हे सगळे free कोर्स होते. मात्र त्यांची भारतीय वेळ होती दुपारी 3. मला ते कोर्स करणे शक्य नव्हते.याचे कारण इथे या वेळेस मध्य रात्रीचे अडीच वाजलेले असतात.म्हणून तो नाद सोडून दिला.तीन चार दिवसांपूर्वी हाॅटेलच्या चवी प्रमाणे भाज्या घरच्याघरी बनवा अशी add आली. हा कोर्स ही फ्री होता. भारतीय वेळ होती दुपारी एक वाजता. मला वाटले अमेरिकेत रात्री साडेबारा पर्यंत जागे रहायला काही problem येणार नाही. तेव्हा मी माझे नाव दिले.नवे काही तरी शिकता येईल याचा आनंद आणि उत्सुकता होती.शेवटी ती वेळ आली.एक एक जण join होत होते.मग कोण कुठे रहातो नाव गाव वगैरे वगैरे.यात अजून काही वेळ गेला.मग असे सांगण्यात आले की जर तुम्ही हा कार्यक्रम शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला आजच्या पदार्थांचा pdf मिळेल. एक surprise gift पण मिळेल.
तुम्ही स्वतः कागद पेन्सिल घेऊन लिहण्याची गरज नाही. नंतर एका पदार्थाची अर्धी रेसिपी दाखवली गेली. मग पुढची “चंमत ग” सुरु झाली.झुम मिटींग होस्ट करणारे एक जण पुढे आले.बोलू लागले बघा आजच्या या महागाईच्या दिवसात तुम्हाला घर बसल्या हे व असे अनेक टेस्टी पदार्थ शिकायला मिळणार आहेत. यातले काही तर कांदा लसूण टोमॅटो न वापरता शिकणार आहात. हे शिकून झाले की तुम्ही भविष्यात व्यवसाय पण करु शकाल तुम्ही बाहेर जाऊन जर हे शिकलात तर किती खर्च येईल वगैरे वगैरे.( बाहेर शिकणार नाही म्हणून तर घरीonline शिकतोय ना ! असो) मग सुरु झाले आता मी एक link देणार त्या linkवर पुढच्या काही मि.त अमुक पैसे भरा…आहे की नाही “चंमत ग”.एकीकडे म्हणायचे free.आणि दुसरीकडे असे गोड गोड बोलून गुंडाळायचे.
बायकांना तर या free या शब्दाची काय भुरळ पडते देव जाणे.माझ्या मुलीच्या मैत्रिणीचा एक दिवस सकाळी सकाळी फोन आला. ती वेळ फोन करणार्या आणि फोन घेणाऱ्या दोघींनाही गडबडीची. नमनाला घडाभर तेल न घालता ती मैत्रिण म्हणाली अग मी काल ग्रोसरी करायला गेले होते तेव्हा अंडी आणली एक ङझन वर एक डझन फ्री मिळाली.आत्ता असे लक्षात आले की उद्या माझे सासु सासरे India तून येणार आहेत आणि त्यांना फ्रिज मधेच नव्हे तर घरात ही अंडी चालणार नाही.मला आजच ती कोणाला तरी द्यावी लागणार आहेत.
मुळात हे घडले का ? असा विचार करतांना लक्षात आले एक ङझन वर एक डझन फ्री म्हणता मैत्रिणीची सारा सार विचारशक्ती कुठे तरी दूर कोपर्यात जाऊन पडली.येणाऱ्या सासु सासऱ्यांना हे चालणार नाही हे ती पार म्हणजे पारच विसरली. जेव्हा लक्षात आले तेव्हा उशीर झाला होती.फ्री ची ‘चंमंत ग”अशी अंगलट आली होती.
पूर्वी किराणा माल खरेदी करतांना पर्स मधे एक यादी असे त्याप्रमाणे खरेदी होई.नंतर झगमगाट असलेली mall संस्कृती उदयास आली.तिथे जातांना ना यादी बरोबर असते ना पिशवी.( हे सर्व सामान्य विधान आहे.याला काही अपवाद ही असणारच !) भव्य mall मधले ते भव्यदिव्य दुकान. हारी ने मांडून ठेवलेल्या अनेक वस्तु. तिथेही एकावर एक फ्री चा भला मोठ्ठा आकर्षक बोर्ड. सून व नातवंडा बरोबर आलेली एखादी आज्जी. काय हवे ते घ्या म्हणणारी व त्याच वेळी फोन वर व्यस्त असलेली सून.अशा वेळेस नातवंड आज्जीला बरोब्बर गुंडाळतात.दहा च्या जागी नको असलेल्या चाळीस एक गोष्टी ट्राॅलीत येऊन पडतात.आज्जी आपली म्हणत असते हे नकोय आपल्याला.हे किती महाग आहे. हे इथे नको आपण नंतर घेऊ.मी आणून देईन.पण ती ऐकतात थोडीच ! सामानाने खचाखच भरलेली ट्राॅली ओढत आणून रांगेत लागतात सुध्दा.सून खुणेने विचारते “झालं?” आज्जी थोडं सांगायचा प्रयत्न करते अग मुलांनी खूपच खरेदी केलीय. नकोय इतकं.वाया जात मग बरचसं सामान. सून फोन वर बोलता बोलता कार्ड स्वाइप करते. सगळे बाहेर पडतात. मुलं आज कशावर काय फ्री मिळालं याचा हिशेब करुन आता पुढच्या visit ला नवीन काय घ्यायचं याची यादी करून एकमेकांना टाळी देतात. या “फ्री ची चंमत ग” आजीच्या डोक्यावरुन जाते.अशा वेळी तिचा भोळा चेहरा अधिकच भाबडा होतो.
एक गोष्ट आठवली.एक जोडपं असतं.एकदा त्यांच्या मनात येतं की आता आपण सगळी सुखं भोगली आहेतच तर आता थोडी (?) ईश्वराची आराधना केली पाहिजे. ती कशी करावी याचे मार्गदर्शन करणारा एखादा गुरु, साधुपुरुष यांचा मग शोध सुरु होतो.त्यांचे नशीब बलवत्तर असते असा एक साधु पुरुष त्यांच्या गावी आलेला आहे हे त्यांना कळते.ते जातात.नमस्कार करुन तिथे येण्याचा उद्देश सांगतात.साधू म्हणतो हा चांगला विचार आहे.परमेश्वराची आराधना करायचा एक साधा सोप्पा मार्ग मी तुम्हाला सांगतो.कुठल्याही गोष्टीचा हव्यास ठेवू नका.त्यात मन गुंतवू नका. मन फक्त ईश्वरातच गुंतवा.जमेल ना ? दोघेही होकार देतात.साधू म्हणतो मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. ती केली की मला भेटा.मी तुम्हाला पुढचा मार्ग दाखवेन.आता घरी गेल्यावर दारात ठेवलेले चपलांचे जे कपाट आहे त्यातली फक्त एक चप्पल ठेवा. बाकीच्या पिशवीत भरुन ती पिशवी दाराबाहेर ठेवून द्या.एवढे केलेत की मला येऊन भेटा.जोडप्याला वाटते ही तर खूपच सोप्पी गोष्ट आहे.दोघे घरी येतात एक पिशवी पुढ्यात ठेवून एक एक जोड बाहेर काढतात.तो पिशवीत भरायला सुरवात करतात. बराच वेळ जातो. शेवटी असे होते की रिकामी पिशवी दारा बाहेर ठेवली जाते आणि चपलांचे सगळे जोड परत कपाटात ! घडते असे की उत्साहाने चपला पिशवीत भरायची जेव्हा वेळ येते तेव्हा ही खूप महाग आहे ही नको ठेवूया.हिचा रंग.. हिची छान लेस.. ही परदेशातून आणलेली.. हिचे डिझाईन.. ही एकावर एक फ्री…असे करता करता त्यांचे मन चपलात इतके गुंतलेले असते की एकही जोड दाराबाहेर जात नाही.दाराबाहेर ठेवलेल्या चपलांच्या पिशवीच्या बदल्यात ईश्वर आराधना फ्री हे सुंदर गणित ते पार विसरुन जातात.
500 रु.ची भाजी खरेदी केल्यावर पाच रुपयांचा कढीलिंब फ्री मिळावा, हजारो रुपयांची खरेदी केल्यावर तीस चाळीस रुपयांच्या bags फ्री मिळाव्यात या साठी वाद घालणारे लोक जेव्हा मी बघते तेव्हा जाणवते या फ्री च्या चक्रव्यूहात आपण किती अडकलो आहोत. इथे लौकिक सुखाची आसक्ति इतकी की आपल्याला त्यापुढे पारलौकिक सुख नगण्य वाटते.म्हणून तर एका वर एक फ्री च्या जमान्यात पारलौकिक सुखाची “चंमत ग” अनुभवताच येत नाही.
-शोभा गोडबोले जोशी.
Leave a Reply