पी.व्ही.राजेश आणि बी.एन.गोस्वामी यांचं हे संशोधन अमेरिकेतील नोआ, भारतीय हवामान खातं, इंग्लंडमधील मेट ऑफिस, अशा जगातल्या विविध स्रोतांकडून गोळा केलेल्या, गेल्या काही दशकांतल्या पावसासंबंधीच्या माहितीवर व सागरी माहितीवर आधारलेलं आहे. या माहितीवरून, भूतकाळातील आणि भविष्यकाळातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी, हवामानाशी संबंधित विविध प्रारूपांचा वापर केला आहे. मॉन्सूनवरचं त्यांचं हे सर्व संशोधन विविध टप्प्यांत विभागलं आहे. आपल्या संशोधनात प्रथम या संशोधकांनी दक्षिण आशिआतल्या मॉन्सूनच्या पट्ट्यात काय बदल होत आहेत, ते शोधून काढलं. त्यानंतर मॉन्सूनच्या वाऱ्यांची निर्मिती करणाऱ्या, हिंदी महासागरातील सागरी तापमानाचा त्यांनी अभ्यास केला. या दोन गोष्टींवरून नंतर या संशोधकांनी, भारतातील मॉन्सूनमध्ये जो बदल होत आहे, त्यामागचं कारण शोधून काढलं. आपल्या संशोधनात, या विविध गोष्टींचा जागतिक हवामानबदलाशी असलेला संबंधही त्यांनी स्पष्ट करून दाखवला. या सर्व संशोधनासाठी या संशोधकांनी विविध ठिकाणचं, पावसाचं एकूण प्रमाण, पावसाचा एकूण कालावधी, सर्वसाधारण तापमान, समुद्राच्या पाण्याचं तापमान, वारे, इत्यादी हवामानविषयक विविध घटकांचा अभ्यास केला. हे त्यांचं संशोधन त्यांना अखेर, थरच्या वाळवंटाच्या भविष्यातील स्थितीकडे घेऊन गेलं.
भारतातील पाऊस हा मुख्यतः मॉन्सूनच्या वाऱ्यांमुळे पडतो. हा जो मॉन्सूनच्या पावसाचा पट्टा आहे, तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या वायव्येकडची (म्हणजे राजस्थानकडची) बाजू ही पावसाच्या दृष्टीनं कमी पावसाची, तर ईशान्येकडची (म्हणजे आसाम, मेघालयाकडची) बाजू भरपूर पावसाची आहे. नैऋत्येकडचे मॉन्सूनचे वारे आणि हिंदी महासागराचा (या वाऱ्यांच्या) दक्षिणेकडचा भाग, यांच्यातील अन्योन्य क्रियेमुळे भारतीय उपखंडातील वायव्येकडचा भाग, आर्द्रतेच्या अभावी रुक्ष झाला आहे. मात्र पी.व्ही.राजेश आणि बी.एन.गोस्वामी यांच्या संशोधनातून, मॉन्सूनच्या पट्ट्याची व्याप्ती पश्चिमेकडे वाढत असल्याचं दिसून आलं. त्यामुळेच आता वायव्येकडच्या भारतीय आणि पाकिस्तानी प्रदेशात पावसाचं प्रमाण वाढत आहे. अलीकडच्याच काळात, भारतातील गुजरात आणि राजस्थानमध्ये, तसंच पाकिस्तानातील दक्षिणेकडील प्रांतात, निर्माण झालेल्या तीव्र पूर-परिस्थितीला, हाच वाढता पाऊस कारणीभूत ठरला. पी.व्ही.राजेश आणि बी.एन.गोस्वामी यांनी केलेल्या संशोधनानुसार, १९०१ ते २०१५ या सुमारे एक शतकाच्या काळात, भारतीय उपखंडातील वायव्येकडील रुक्ष प्रदेशात अनेक ठिकाणी, पावसाच्या वार्षिक प्रमाणात ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. पश्चिमेकडील पावसाचं प्रमाण वाढत असताना, पूर्वेकडचा पाऊस काही प्रमाणात कमी होऊ लागला आहे. मात्र हा परिणाम काहीसा क्षीण आहे. ईशान्येकडील भागातील पावसात, या काळात सुमारे १० टक्क्यांनी घट झाली आहे.
हिंदी महासागरातील विषुववृत्तालगतच्या काही भागातील सागरी पाण्याचं तापमान हे २७ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. म्हणजे इथल्या इतर सागरी प्रदेशातील तापमानाच्या तुलनेत बरंच जास्त! या उष्ण सागरी प्रदेशातील तापमानाचा, मॉन्सूनच्या वाऱ्यांतील आर्द्रता आणि त्यांच्या प्रवाहाचं स्वरूप ठरवण्यात, मोठा सहभाग असतो. या उष्ण सागरी प्रदेशाचं क्षेत्रफळ वार्षिक ऋतुचक्रानुसार कमी-जास्त होत असतं. पी.व्ही.राजेश आणि बी.एन.गोस्वामी यांच्या संशोधनातून, या उष्ण सागरी प्रदेशांच्या क्षेत्रफळात होणारे हे वार्षिक बदल असमान असल्याचं दिसून आलं आहे. किंबहुना या प्रदेशाची दरवर्षी पश्चिमेकडे वाढ होते आहे. उष्ण सागरी प्रदेशाच्या आकारात होणाऱ्या बदलांतील हीच असमानता मॉन्सूनच्या वाऱ्यांवरही परिणाम घडवून आणते आहे. त्यामुळेच मॉन्सूनच्या पावसाच्या पट्ट्याची व्याप्ती पश्चिमेकडे वाढू लागली आहे.
पी.व्ही.राजेश आणि बी.एन.गोस्वामी यांनी वापरलेली हवामानविषयक प्रारूपं, भविष्यातल्या येत्या काळात, मॉन्सूनचा पट्टा हा पश्चिमेच्या बाजूला असाच वाढत राहणार असल्याचं दर्शवतात. या वाढीला जागतिक तापमानवाढीचा मोठा हातभार लागलेला असेल. या शतकाच्या अखेरपर्यंत या पट्ट्याची पश्चिमेकडची व्याप्ती सुमारे पाचशे किलोमीटरनं, तर वायव्येकडची व्याप्ती सुमारे एक हजार किलोमीटरनं वाढलेली असेल. तसंच आज रुक्ष असलेल्या वायव्येकडच्या प्रदेशातील पावसाचं प्रमाण दुपटी-तिपटीपर्यंत वाढू शकतं. हा परिणाम थरच्या वाळवंटावरही अर्थातच होणार असल्यानं, तिथलं वार्षिक पर्जन्यमान या शतकाच्या अखेरपर्यंत दुपटीपेक्षाही अधिक झालेलं असेल. कदाचित त्या काळापर्यंत थरचं वाळवंट नष्टही झालं असेल. कारण या वाढलेल्या पावसाची परिणती थरचं वाळवंट हिरवं होण्यात होऊ शकते.
या वाढत्या पावसामुळे थरच्या वाळवंटी प्रदेशाला वारंवार अतिवृष्टीला तोंड द्यावं लागेल. कारण पी.व्ही.राजेश आणि बी.एन.गोस्वामी यांनी वापरलेल्या प्रारूपांनुसार, हा पाऊस थोडा-थोडा न पडता, अचानक आणि जोरदार पडेल. त्यामुळे या भागात पाणी तुंबून आपत्कालिक परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र या पावसाचा दुसरा फायदा अर्थातच उघड आहे – तो म्हणजे अन्नधान्य उत्पादनातील वाढीचा. हा पाऊस थरच्या वाळवंटातही शेती फुलवू शकतो. मात्र त्यासाठी इथल्या पावसाचं पाणी फुकट जाऊ न देता, ते व्यवस्थितरीत्या साठवण्याची व्यवस्था करावी लागेल. दूरदृष्टीनं आणि योग्यरीत्या हे पुढचं नियोजन केलं गेलं, तर थरच्या वाळवंटातील हे बदल फक्त राजस्थानसाठीच नव्हे तर, एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेसाठीही पोषक ठरू शकतील.
(छायाचित्र सौजन्य – Pawar Pooja / Wikimedia / Vedjoshi1/Wikimedia)
Leave a Reply