समुद्राच्या पाण्यापासून पांढरंशुभ्र मीठ कसं बनतं? मिठाचे इतर प्रकार आहेत का?
समुद्राचं पाणी छोट्या वाफ्यांमध्ये जमा करून सूर्यप्रकाश व वारा यांच्या साहाय्याने त्याचं बाष्पीभवन केलं जातं. सर्व पाणी निघून गेलं की खाली जाड मीठ उरतं. पूर्वी असं मीठ खडे मीठ म्हणून विकल जाई. समुद्राच्या पाण्यात फक्त सोडियम क्लोराइडच नाहीतर मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांची संयुगेही अल्प प्रमाणात असतात. या खडे मिठात हे सर्व असतं. हे मीठ मिठाच्या संपृक्त द्रावाने धुतलं जातं, स्वच्छ केलं जातं. मीठ पांढरं शुभ्र बनविण्यासाठी मिठाच्या पाण्याचं बाष्पीभवन करावं लागतं. ही प्रक्रिया जलद करण्यात येते, त्यामुळे मिठाच्या स्फटिकांना वाढायला न वेळ मिळत नाही आणि अगदी बारीक स्फटिकांचा समूह असलेलं पांढरंशुभ्र मीठ तयार होतं. मीठ शिंपडण्याच्या बाटलीत ठेवण्यासाठी मीठ सरसरीत असावं लागतं. म्हणून या मिठात गुठळ्या होऊ न देणारी कॅल्शियम सिलिकेट, मॅग्नेशियम कार्बोनेट यासारखी रसायने घातलेली असतात. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या थायरॉइड ग्रंथींच्या रोगांपासून बचाव करण्याकरिता आयोडिनयुक्त मीठ बनवलं जातं. त्यासाठी मिठात अल्प प्रमाणात पोटॅशियम आयोडाइड घातलं जातं. अशा मिठाला आयोडाइज्ड मीठ असं म्हणतात. शेंदेलोण (सैंधव) व पादेलोण (काळं मीठ) ही खनिज मीठं आहेत. मिठाचे खडक फोडून चूर्ण करून ती बनवलेली असतात.
त्यामध्ये सोडियम क्लोराइडशिवाय अत्यंत अल्प प्रमाणात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांची संयुगे असतात. मॅग्नेशियम सल्फेट आणि अॅल्युमिनियम सल्फेट यांचं मिश्रण म्हणजे टाकणखार या खनिज मिठांमध्ये असतो. काळ्या मिठामध्ये औषधी गुणधर्म असतात असं मानलं जातं.
परदेशात जमिनीखालच्या खाणींमधून मीठ काढलेलं असतं. खाणीत खोलवर असलेल्या साठ्यांमध्ये पाणी पाठवून हे मीठ विरघळवून मीठयुक्त पाणी वर आणलं जातं. मग या पाण्याचं निर्वात जागेत बाष्पीभवन करून त्यापासून शुद्ध मीठ मिळवलं जातं.
डॉ. वर्षा जोशी (पुणे)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply