पूर्वीच्या मुंबई प्रांतातील अथणी (आता कर्नाटकात) येथे जन्मलेल्या कोकटनूर यांनी बीएस्सी केल्यावर पुण्याच्या रानडे औद्योगिक संस्थेत रसायनतज्ज्ञ म्हणून एक वर्ष काम केले. नंतर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली व ते कॅलिफोर्निया राज्यातील ओकलंड शहरी पुढील शिक्षणासाठी गेले. बटाट्यावर संशोधन करण्यासाठी ते तेथे गेले होते. पण त्या वर्षी पीक बुडाल्याने त्यांना करता संशोधन आले नाही आणि शिष्यवृत्ती परत करावी लागली. मग भारतात परत ते येण्याऐवजी तेथील ‘कॅलिफोर्निया फ्रुट केनर्स’ या कंपनीत संशोधक म्हणून कामाला लागले.
तेथे त्यांनी अनेक प्रयोग केले. नंतर त्यांनी मिनेसोटा विद्यापीठात एमएस्सी आणि पीएचडी केली. ते शिकत असताना त्यांनी लिहिलेले शोधनिबंध अमेरिकन केमिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. त्यांचा पीएचडीचा प्रबंधही त्यात प्रसिद्ध झाला. १९२२ साली त्यांनी रसायनशास्त्रातील औद्योगिक सल्लागार म्हणून स्वतःची कंपनी काढली. १९२८ साली क्लोरिन आणि कॉस्टिक सोड्यातील तज्ज्ञ म्हणून रशियन सरकारच्या पंचवार्षिक योजनेला सल्ला देण्यासाठी ते गेले. नंतर भारतातील ‘श्रीशक्ती अल्कली’ कारखान्यात सल्लागार व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले. १९३३ सालापर्यंत भारतातील अमेरिकन ट्रेड कमिशनवर सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले.
डॉ. कोकटनूर यांच्या नावावर डझनभर शोध आणि ३० पेटंट्स आहेत. हे सर्व शोध औद्योगिक क्षेत्राला उपयोगी पडणारे आहेत. विमानाच्या पंख्याला डोप नावाचे द्रव्य लागते. त्याची निर्मिती धोकादायक
समजली जाई. पण कोकटनूर यांनी ती निर्धोक करून दिली. रेड डाय हा रंग कापसाच्या आणि लोकरीच्या कापडात मिसळण्यासाठी लागे. ही ख़र्चीक प्रक्रिया त्यांनी स्वस्तात उपलब्ध करून दिली. स्वयंपाकघरातील प्रेशर कुकिंगचे ते एक संशोधक आहेत.
‘मॅन ऑफ सायन्स’ म्हणून त्यांचा अमेरिकेत गौरव झाला. युनायटेड स्टेट्स पेटंट ऑफिसात त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
Leave a Reply