ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीतला एक अद्भुतरम्य चमत्कार आहे. चमत्कारंच! त्यांचं भिंत चालवणं, रेड्यामुखी वेद वदवून घेणं हे चमत्कार कुणी श्रद्धेनुसार मानावेत वा न मानावेत.. सोळाव्या वर्षी एखादी व्यक्ती गीतेवर इतकं रसोत्कट, सखोल आणि सामान्य सकळांना आपलंसं वाटणारं, जीवनोद्धार करणारं भाष्य लिहिते, अभंग रचते, अखिल विश्वासाठी पसायदान मागते, वारकरी पंथाचा पाया रचते, एकविसाव्याच वर्षी संजीवन समाधी घेऊन आपल्या कार्याची इतिश्री सुद्धा करते आणि साक्षात सर्वनाशी काळ त्या व्यक्तीचा मोरपीस आपल्या माथ्यावर अभिमानाने धारण करतो तेही अनंत काळासाठी!! यापरता दुसरा चमत्कार कुठला? हा चमत्कार नक्कीच कुणालाही अमान्य करता येत नाही!
अगदी कोवळ्या वयात, आज आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या हालअपेष्टा सोसून सामाजिक क्षोभाला तोंड देऊन सुद्धा माऊली आपल्या लेखनात समाजाविरुद्ध तिरस्कार वा दुःख दाखवणारा उद्गार काढत नाहीत याचं कारण म्हणजे त्यांची जन्मसिद्ध करुणा, याचं कारण म्हणजे त्याचं माऊलीपण, याचं कारण म्हणजे तुकोबांच्या शब्दात सांगायचं तर ‘बुडते हे जन पहावेना डोळा’ हेच. सगळे अपराध पोटी घेऊनसुद्धा असलेल्या कळवळ्याचं कारण, मातृप्रेमाचं सहृदय प्रयोजन ही माऊलींच्या नम्रतेची एक लोकविलक्षण खुण आहे.
सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ सिद्ध करून इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकमान्यता मिळूनही माऊलींचा समाजाप्रती हेटाळणीचा उद्गार नाही. इथे या नम्रतेचं विशेष वाटतंच पण त्याचसोबत या वयात थोडं जरी वेगळं आणि मोठं काम केलं तरी सामान्यपणे असलेली एक अभिमानाची जाणीव, तो मिरवण्याची तहान माऊलींनी केव्हाच सोडून दिलेली पाहून किंबहुना ती प्रकटलेलीच नाही हे पाहून आश्चर्य वाटलं नाही तर नवलच! गीताभाष्याचं इतकं अलौकिक कार्य तितक्याच समर्थपणे पार पाडून माऊली म्हणतात काय? ‘रचिली धर्मनिधाने । निवृत्तीदेवे’ असं म्हणून माऊली सारं श्रेय आपल्या गुरूंना देऊन मोकळे होतात. हे देशीकार लेणं निर्माण करताना देखील आरंभी आपली ओळख ‘म्हणे निवृत्ती दासु । अवधानी जोजी’ अशीच करून देतात माऊली. बोली अरुपाचे रूप दाखवून देण्याची, अतींद्रिय इंद्रियांकरवी भोगवून देण्याची माऊलींची प्रतिज्ञा त्यांनी सार्थ सुफळ केली आहे हे आपण जाणतोच. पण तसं केल्यानंतरही त्यांचा निर्वाळा काय? तर ‘म्हणे निवृत्तीदासु। ज्ञानदेवो’ ग्रंथारंभी हे नमन आणि विनम्रता आजच्या काळात एक वेळेस स्वाभाविक वाटेलही. पण इतकं विलक्षण आपल्या हातून घडलं असताना, शेवटी देखील तितकीच समर्पित विनम्रता असणं या माऊलींच्या शालीनतेला विशेषणच नाही! ही अभिजात शालीनता आपण जेव्हा जेव्हा म्हणून पाहतो तेव्हा ती अध्यात्मचाच नव्हे तर आयुष्याच्या एकूण कोणत्याही क्षेत्रात कुठल्याही मार्गावर माणसाला नम्रच ठेवते. माऊलींची गुरूंप्रति, पांडुरंगाप्रति आणि तोच ‘जळी स्थळी भरला’ म्हणून प्रत्येक ठिकाणी दिसणारी ही बहुपदरी शालीनता म्हणजे भक्ती योगाचं निधानच वाटतं!
खरंतर सर्वच संतांमधे हा नम्रपणा दिसतो. गुरूंना अर्पण केलेलं श्रेयस आणि प्रेयस दिसतं. पण ज्ञानदेव याबाबतीत कुठेतरी अधिक महत्त्वाचे वाटतात. कारण ज्ञानदेव या सर्वांचेच पूर्वासुरी, आणि प्रत्येक संतांच्या अभंग निर्मितीवर, स्व-भावावर परंपरेतील पूर्वासुरींचा प्रभाव पडणं, संस्कार होणं स्वाभाविक आहे. ही नम्रता ही परंपरेतून प्रवाही झालेली दिसते आणि प्रत्येक संताच्या ठाई वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विलास झालेला दिसतो. या नम्रतेचं मूळ देखील माऊलीच आहेत. निवृत्तीनाथ निश्चित आहेतच, पण अधिक मोठ्या प्रमाणात आणि माऊली म्हणजे संप्रदायाचा पाया असल्यामुळे हा निर्देश माउलींकडेच अधिक जातो.
साक्षात शारदा जिव्हेवर असताना, ज्ञानसंपन्नता ओथंबून वाहत असताना देखील माऊलींची गुरुनिष्ठा सुटत नाही की विठ्ठलभक्तीचे पाझर आटत नाहीत. इथेच या शालीनतेची महती कळते. ‘ज्ञान गिळूनि गावा गोविंदा रे’ असा उद्गार म्हणूनच त्यांच्या आतून येतो, नव्हे तो भावनिक मानसिक वर्तवणूक या सर्वच पातळ्यांवर अखंड असतो.
माऊली एका ठिकाणी म्हणतात की ‘बहु जन्म आम्ही, बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले, कृपा केली’ सहज वाटतं, की माऊलींकडे थोडीच शब्दांचा दुष्काळ होता? इंदिरा संतांच्या शब्दांत सांगायचं झालं तर कवीकडे शब्दांची रांजणं भरलेली असतात आणि माऊली तर परतत्त्वाचा अमृतरस शब्दांत पेलणारे कवी! त्यांना कसली शब्दांशी वानवा? वाटतं की या ओळींमध्ये ते सहज लिहू शकत होते की ‘बहु जन्म आम्ही, बहु पुण्य केले, तेव्हा मिळविले, विठ्ठलास’ किंवा ‘तेव्हा हे लाभले, संतपण’ वगैरे वगैरे.. पण ते तसं लिहीत नाहीत. त्यांना तसं वाटतही नाही, कारण त्यांच्यासाठी आम्ही बहुजन्मांमध्ये बहु पुण्य केले म्हणून आम्ही त्याची कृपा मिळविली असं म्हणण्यापेक्षा तेव्हा त्याने कृपा केली हे म्हणणं अधिक अर्थपूर्ण आहे. त्यातून आपोआप अहंकार लोक पावतो. स्वतःचं महत्त्व कमी होत नाही, पण ‘त्या’ला निश्चित आपल्यापेक्षा अधिक महत्त्व दिलं जातं, त्याच्या कृपेने आपलं महत्त्व वाढतं, आपल्यामुळे नाही! माऊलींची हीच शालीनता त्यांच्या ललितरम्य शैलीतून जागजागी खुणावत राहते.
म्हणूनच त्यांच्या आरतीमध्ये यथार्थपणे ‘महा कैवल्यतेजा’ असं म्हटलं असलं, तरी हे तेज आपल्याला दाहक किंवा भिववून टाकणारं वाटत नाही. सामान्यातल्या सामान्यांना सुद्धा ते अगदी आपलंसं वाटतं. कारण, माऊली ‘चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन’ असेच तर आहेत! म्हणूनच, तेज होऊन तेजाला शब्द देणं असंच वाटतं माऊलींच्या बाबतीत! आपण खरे कुणीच नसताना आपला ‘मी’ मात्र इतका ताठ उभा असतो त्याला अंतर्बाह्य लाजवून टाकणारी ही अभिजात शालीनता म्हणजे माऊली! म्हणूनच तर माऊली अमृतानुभावाची फुलं वेचू शकले.. आधी त्यांचा बहर सबाह्य फुलारला होता म्हणूनच ही शालीनताही उत्फुल्ल होती.
आपल्याला किमान त्यांच्या अभंगाची फुलं अशी वेचता आली, आस्वादता आली, तरी देखील थोडीफार नम्रता अधिक वाहू लागेल रक्तातून. त्या फुलांचे सुगंधी लाभ तर थेट आपल्या देठात रुजणारे! माऊलींच्या अशा अगणित अ-भंग फुलांपैकी ओंजळभर जरी वेचता आली तरी सार्थक होईल आयुष्याचं! ज्या भूमीत ‘माऊली’ नावाचा शीतल मोगरा सर्वांगी फुलून आला तिथे जन्मल्याचं केवढं आपलं भाग्य!
फुले वेचिता बहरु..
-पार्थ जोशी
28parthjoshi@gmail.com
Leave a Reply